श्याम पाठक नाटयगृहाचे भूमिपूजन

0
542

सरकारी किंवा नगरपालिकांच्या इमारतींना पुढारयांच्या खानदानातील एखाद्या व्यक्तीचे नाव देण्याची पध्दत आपल्याकडे रूढ आहे..ही नावं देताना संबंधित व्यक्तीचे योगदान किंवा कर्तृत्व पाहण्याची पध्दत नाही.. त्यासाठी स्पर्धा आणि मोठे राजकारण होते .. त्यामुळे साहित्यिक, कलावंत, पत्रकार, खेळाडूंच्या वाट्याला कायम उपेक्षा येते .. .किंबहुना ही नावं राजकारण्यांना वर्ज्यच असतात.. या पार्श्‍वभूमीवर माजलगाव नगरपालिकेचं विशेष कौतूकच करावं लागेल.. नगरपालिकेने आठवणीने आपल्या प्रस्तावित नाटयगृहाला प्राध्यापक, नाटककार, दिग्दर्शक श्याम पाठक यांचे नाव दिले.. श्याम पाठक यांचे नाव देण्याची कल्पना ज्यांना सूचली आणि ज्यांनी ती अंमलात आणली अशा सर्वांचे मनापासून आभार
मी श्याम पाठक सरांचा विद्यार्थी..माजलगाव महाविद्यालयत ते आम्हाला मराठी शिकवायचे.. भाषा एवढी ओघवती आणि रसाळ की, मुलं तल्लीन होऊन जात.. आम्ही पाठक सरांचा क्लास कधी चुकवायचो नाही.. कविता शिकविण्यात तर त्यांचा हातखंडा होता..मितभाषी पाठकसर तेव्हा विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात..
पाठक सर चांगले शिक्षक तर होतेच होते त्याचबरोबर ते चांगले लेखक आणि नाटककार देखील होते..दरवर्षी गॅदरिंगला ते नवी कोरी एकांकिका किंवा नाटक लिहीत.. त्याचे दिग्दर्शन करून ते गॅदरिंगमध्ये सादर करीत.. तीन वर्षे सरांच्या नाटकात मी काम केले होते.. मला आठवतंय “अर्धविराम” या नाटकात मी काम केले होते.. पुढे हे नाटक आम्ही युथ फेस्टिव्हलमध्ये सादर केले होते.. त्याला दुसरया क्रमांकाचे पारितोषिक मिळाले . त्याची ही सारी नाटकं पुस्तक स्वरूपात आली की नाही माहिती नाही पण बीड जिल्हयातील एक मान्यताप्राप्त नाटककार म्हणून तेव्हा पाठक सरांचा मराठवाडाभर दबदबा होता..माजलगावच नव्हे तर मराठवाडयातील नाट्य चळवळ वाढीत पाठकसरांचे मोठेच योगदान होते.. त्यांच्या निधनानंतर ही अनेक वर्षांनी माजलगावकरांनी त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवले हे विशेष..
पाठकसर मुळचे परभणी जिल्ह्यातील ताडकळसचे.. मात्र त्यांची कर्मभूमी माजलगावच.. माजलगाव सारख्या दुर्गम भागात आणि मागासलेलया भागात राहून त्यांनी नाटयसेवा केली.. साहित्यिक, नाटककार, कलाकार घडविले.. .. संदीप पाठक हा त्यांचा मुलगा आज नाट्य आणि चित्रपटसृष्टी गाजवतो आहे.. त्याला वडिलांकडून हे बाळकडू मिळाले.
कॉलेजला असताना .जवळपास दररोज आम्ही पाठकसरांच्या घरी जात असू.. त्यांचा भाऊ डॉ. के. व्ही. पाठक हा माझा वर्ग मित्र होता.. त्यामुळे श्याम पाठक सरांचे नाव नियोजित नाटयगृहाला देण्यात येणार असल्याची पत्रिका जेव्हा वाचण्यात आली तेव्हा मोठा आनंद झाला..
माजलगाव नगरपालिकेला पुन्हा एकदा धन्यवाद..

एस.एम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here