सुधांशूचं बालपण मी मस्त Enjoy केलं.. त्याच्या बालपणीचे क्षण छोटे छोटेच होते… पण ते कायम माझ्या हृदयाच्या कुपित घर करून बसलेत.. सुधांशूला सकाळी गुदगुल्या करून उठवणं, त्यानं डोळे उघडताच माझ्या गळ्याला मिठी मारणं, मग त्याला अलगत उचलून बाथरूममध्ये नेणं, ब्रश करणं, आंघोळ घालताना “थंडे थंडे पाणी से” सह चांगली गाणं बेसुरात गाण, त्याच्या बुटाला पॉलिश करणं, त्याला शाळेत सोडणं आणि घरी घेऊन येणं.. वगैरे.. केवळ जबाबदारी पार पाडायची म्हणून मी हे सारं कधी केलं नाही… त्यासाठी नोकर चाकर आमच्या दिमतीला होते.. पण हे सर्व करण्यात मला स्वर्गसुखाचा आनंद मिळायचा.. म्हणून मी ते करायचो..
दिवसभर शाळा, सायंकाळी फिरून आल्यावर थकलेला सुधांशू रात्री माझ्या कुशित एक पाय माझ्या अंगावर टाकून बिलगून बिनधास्त झोपायचा… तेव्हा वाटायचं “सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं” ..?

अलिबागला बीचच्या जवळच आम्ही राहायचो..पाच – साडेपाचच्या सुमारास हा पठ्ठ्या तिसरया मजल्यावरील आमच्या घराच्या खिडकीला लावलेल्या ग्रीलमध्ये बसून माझी वाट बघायचा… खाली गाडीचा हॉर्न वाजला की, बीचवर जायच्या तयारीला लागायचा.. टापटीप राहणं त्याला लहानपणापासून आवडतं.. बीचवर जाताना देखील इन वगैरे करून टाईट असायचा.. मग आम्ही सारेच बीचवर जायचो.. हा नित्यक्रम असायचा… बीचवर सागर, सुधांशू सह आम्हा तिघांची दंगामस्ती चालायची.. सुधांशू, सागर बरोबर खेळताना मी ही पोरसवदा व्हायचो.. तेव्हा शोभना म्हणायची “अरे काय चालवलंस हे.. लोक तुला ओळखतात आणि बघताहेत” … मला फरक पडायचा नाही.. कारण हे क्षण आयुष्यात परत येणार नाहीत हे मला पक्क माहिती होतं..तयामुळं माझ्या परिनं ते मी पुरेपूर Enjoy करीत होतो..बीचवर खेळुन झालं की, मग किनार्‍यावर येऊन आम्ही भेळपुरीवर आणि नारळपाणयावर ताव मारायचो..

कधी, कधी बिर्ला मंदीर, नागाव, आक्षी, आवास, माडवा अशी आमची मोटरबाईक राईड व्हायची… छोटा सुधांशू हिरो होंडीच्या समोरच्या टाकीवर मस्त पोटावर पडायचा, मोठा सागर आमच्या दोघांच्या मध्ये असायचा.. आम्हा चौघांना मोटरबाईकवरून फिरताना अलिबागच्या रस्त्यावरून, गल्ली बोळातून जाताना अलिबागकरांनी असंख्यवेळा पाहिलं आहे.. ..कालांतरानं आम्ही अलिबाग सोडलं.. पोरांच्या बालपणीच्या आनंदाच्या क्षणाची गाठोडी घेऊन पुणं गाठलं..

महानगरात आमचं रूटीन बिघडलं आणि अलिबागमध्ये अनुभवलेले क्षण पुन्हा वाट्याला येईनासे झाले… मुलंही मोठी होत होती.. शाळा, कॉलेज, त्यांच्या नोकरया हेच रूटीन झालं.. सुधा शू ही आता जॉबला लागला होता.. एक दिवस त्यांनं स्वकमाईतून महागडी बाईक घेतली.. आणि पहिली राईड मला घेऊन मारली.. स्पोर्ट बाईकवर बसताना हा पठ्ठ्या मला सांगतोय, “पप्पा सावकाश बसा, मला घट्ट पकडा” .. आता बोला? पण तो सांगेल तसं मी करत होतो.. तेही माझ्यासाठी सुखद अनुभूती देणारं होतं.. सुधांशूच्या मागे बसताना आमचे अलिबागचे दिवस आठवले आणि पोरं मोठी झाली.. हे कळलं देखील नाही याची गंमत वाटली..

पोरांना मी कधी मारलं नाही, किंवा रागावलोही नाही.. पण आज हे दोघेही मला दम देताहेत.. . “पप्पा तुम्ही आमचं ऐकतच नाही” ही सुधांशूची काळजीयुक्त कायम तक्रार असते..” कार्यक्रम, बाहेर फिरणं बंद करा” असं त्याचं सांगणं.. . तो सर्व सोशल साईटवर मला फॉलो करतो.. आणि माझ्यावर बारीक नजर ही ठेऊन असतो.. माझा मास्क नाकाच्या खाली दिसला की थेट फोन करून मास्क वर घेण्याची सूचना करणार .. कार्यक्रमात गर्दीत मिसळलो की तंबी देणार .. अर्थात हे सगळे नियम पाळणं अनेकदा शक्य होत नाही.. फोटो काढतानाही लोक मास्क काढायचा आग्रह धरतात.. अशा वेळेस हा धाकटा लंडनला असलेल्या मोठ्या भावाला फोन करून माझं त्याच्याकडं गारहाणं गातो.. .. मग रात्री दोघं भाऊ व्हिडीओ कॉल करून माझी शाळा घेतात.. त्याचं हे दटवणं, दरडावणं देखील माझ्यासाठी आनंद देणारं असतं . आपली मुलं आपली एवढी काळजी घेतात.. यापेक्षा एका बापाला आणखी काय हवं असतं? मग मी दोघांना शब्द देतो… ” बरं बाबांनो, यापुढं सारं बंद” … पण मला आणि त्यांनाही माहिती आहे की .. चळवळ हा माझा श्वास आहे.. अन हे सारं बंद होणं हे शक्य नाही..

अनेकजण मला विचारतात एस. एम. आयुष्यात तुम्ही काय कमविलं..? तुमच्या जागेवर आम्ही असतो तर… असे बोल ही काही जण बोलून जातात.. एक खरंय की, मला व्यवहार ज्ञान अजिबात नाही.. त्यामुळे लौकिकार्थाने मला काही कमविता आलं नाही.. त्याची खंत मला कधीच वाटली नाही.. .. परंतू सुविचारी, सुसंस्कृत अशी दोन्ही मुलं हीच माझी मोठी पुंजी आहे आणि त्याबद्दल मी आमच्या कुलस्वामिनीला कायम धन्यवाद देतो.. यासाठी मी स्वतः ला भाग्यवान ही समजतो..मुलं कर्तृत्ववान निघणं यापेक्षा माझ्या सारख्या एका पत्रकार, कार्यकर्त्यास आणखी काय हवंय?

सुधांशूचा आज वाढदिवस आहे..लता दिदींच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा असल्याने आम्ही तो साजरा करणार नाही.. मात्र आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद त्याला असू द्यावेत..
सुधांशू.. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद

पप्पा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here