पाटण:- पत्रकारांचे न्याय हक्क व पेन्शन यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारकडून मागण्या मान्य करण्यासाठी कार्यरत आहोतच. मात्र शासनाने याची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा. आमचे सरकार आल्यानंतर मंत्री मंडळाच्या पहिल्या बैठकीतच पत्रकारांच्या सर्व प्रलंबित मागण्यांना न्याय देवू, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली.

पाटण (म्हावशी) येथील सुस्वाद मल्टीपर्पज हॉलमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या द्वितीय सत्रात समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीच्या सभापती सौ. उज्वला जाधव, धारेश्वर संस्थानचे मठाधिपती पं. पू. नीलकंठ शिवाचार्य महाराज, ज्येष्ठ पत्रकार तथा बिगुलचे संपादक मुकेश माचकर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, विश्वस्त किरण नाईक, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, पाटण तालुका पत्रकारसंघाचे अध्यक्ष शंकरराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. जयंत पाटील पुढे म्हणाले, पत्रकारांवरील वाढते हल्ले ही पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय गोष्ट असून राज्यातील निर्भीड पत्रकारितेला दहशतीमधून जावे लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. लोकशाहीतील महत्वाचा आणि समर्थ घटक कमकुवत होत चालला असल्याची भिती व्यक्त करून पाटील पुढे म्हणाले, राज्यातील पत्रकारांना संरक्षण मिळावे ही महत्वाची बाब आहे. त्यासाठी राज्यातील निर्भीड पत्रकारिता सक्षमपणे टिकणे गरजेचे आहे. निर्भीड पत्रकारिता करताना वेगवेगळ्या दहशतीच्या वातावरणातून पत्रकारांना जावे लागत आहे. पत्रकार हा जनता व शासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करतो. त्यामुळे जनतेने पत्रकारांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार तथा बिगुलचे संपादक मुकेश माचकर म्हणाले, पत्रकार हा समाजाचा खऱ्याअर्थाने आरसा आहे. ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाची सुख, दु:खे लक्षात घेवून पत्रकार समाजाचे दु:खणे वर्तमान पत्रातून मांडतो. समाजात घडत असलेल्या प्रत्येक घटनांचे वास्तव चित्र निर्भीडपणे तो आपल्या वर्तमान पत्रातून समाजापुढे आणतो. हे करत असताना पत्रकारांना रोषालाही सामोरे जावे लागते. काहीवेळेला पत्रकारांवर हल्ले देखील होतात. अशावेळेस पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणीतरी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पत्रकारांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पाटण तालुका पत्रकारसंघाने मेळाव्याचे उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल आ. जयंत पाटील, एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, वृक्ष भेट देवून पाटण तालुका पत्रकारसंघाचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र पवार व विद्या म्हासुर्णेकर-नारकर यांनी सुत्रसंचालन केले. पत्रकारसंघाचे तालुकाध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे यांनी आभार मानले. मेळाव्यास राज्यातील शेकडो पत्रकार उपस्थित होते.
 
 
LikeShow more reactions

Comment

LEAVE A REPLY