शरद पवारांच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवायचा की नाही…

0
931

“मी पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.”.   

 शरद पवारांच्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवायचा का ? हा प्रश्‍न विचारणारांसाठी…               

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे पहिलेच जिल्हास्तरीय अधिवेशन अविस्मरणीय झालं.95 वर्षांच्या रामभाऊ जोशी यांचा आणि अन्य ऋुषीतुल्य पत्रकारांचा सन्मान करण्याची संधी जिल्हा संघाला मिळाली ही बाब अत्यंत महत्वाची आहे.अन्य क्षेत्राप्रमाणेच पत्रकारितेतही उगवत्या सूर्याला नमन करण्याची पृथा आहे.ज्यांनी पत्रकारितेसाठी सर्वोच्च त्याग केला,ज्यांनी मराठी पत्रकारारिता समृध्द करण्यासाठी मोलाचे योगदान दिले,आणि निष्ठेने पत्रकारिता करीत आपल्या कार्यातून एक नवा आदर्श निर्माण केला अशा ज्येष्ठांचा आपल्याकडेही विसर पडताना दिसतो आहे.या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा पत्रकार संघाने ज्येष्ठाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद,आणि काही तत्वं,पथ्ये पाळत पत्रकारिता करणार्‍यांना बळ देणारा आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे मनापासून आभार.

अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्यासमोर अनंत दीक्षित,तसेच एस.एम.देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनचा मुद्दा उपस्थित केला.त्यावर शरद पवार यांनी या दोन्ही प्रश्‍नांत लक्ष घालण्याचे आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि पत्रकार संघटनांची बैठक लावण्यासाठी प्रयत्न कऱण्याचे आश्‍वासन दिले.नंतर माझ्याशी बोलताना त्यानी,”संसंदेचं अधिवेशन संपल्यावर मला आटवण करा,मी मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठक लावतो” असं त्यांनी सांगितलं.पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा देणारं ट्विटही त्यानी केलं आहे.

शरद पवार यांचं विधान प्रसिध्द झाल्यानंतर दोन अंगानं चर्चा सुरू झाली.शरद पवारांच्या आश्‍वासनावर किती विश्‍वास ठेवायचा ? हा एक सूर होता आणि त्यांनी सत्तेवर असताना कायदा आणि पेन्शन का लागू केला नाही ?.दोन्ही प्रश्‍न चुकीचे नाहीत.मात्र चळवळीमध्ये कोणावरही अविश्‍वास दाखविता येत नाही किंवा कोणावरही विश्‍वास ठेवता येत नाही.चळवळ पुढे नेण्यासाठी सर्वांच्याच मदतीची गरज असते.विरोधी पक्षात असताना श्री.देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यानी किमान तीन वेळा अशीच आश्‍वासने दिली होती.ही मंडळी सत्तेवर येऊन दीड वर्षे उलटली.अजून आश्‍वासनपूर्ती झालेली नाही.तरीही आम्ही पिच्छा सोडलेला नाही.राज्यात असा एकही नेता नाही की,ज्याने आपल्या मागणीस पाठिंबा दिलेला नाही.सारेच पाठिंबा देतात.तरीही प्रश्‍न सुटत नाही.त्यामुळं कोणावरच विश्‍वास ठेवायचा नाही असं म्हणून चालणार नाही.लढाई चालूच ठेवावी लागेल.लढा पुढे नेत असताना चर्चा,संवाद चालूच ठेवावा लागतो.संवाद बंद ठेऊन प्रश्‍न मार्गी लागणे अवघड असते.त्यामुळेच आम्ही ठाण्यातील परिषदेच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांना साकडे घातले.आता शरद पवारांना विनंती केली.8 ऑगस्टला पुन्हा नांदेड अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसमोर गार्‍हाणे मांडणार आहोतच.

दुसरा प्रश्‍न सत्तेवर असताना शरद पवारांनी प्रश्‍न का सोडविले नाहीत हा.मुळात म्हणजे  आघाडीचे सरकार असताना आम्ही एकदाही शरद पवार यांना भेटलो नाहीत.आम्ही 12 वेळा पृथ्वीराज चव्हाण यांचीच भेट घेतली.त्यांनी नारायण राणे समिती वगैरे नेमून वेळकाढू धोरण आखलं.तेव्हा शरद पवारांना भेटलो असतो तर कुणी सांगावं विषय मार्गीही लागला असता.मात्र राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या विरोधातच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला मोठं आंदोलन करावं लागल्यानं आम्ही नंतर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याची या संदर्भात भेट घेतली नाही. स्व.आर.आर.पाटील यांना भेटायचो.ते मनापासून आमच्यासोबत होते.नारायण राणे समितीत केवळ आबाच एकमेव असे सदस्य होते की,त्यांनी ‘कायदा झाला पाहिजे’ अशी भूमिका मांडली होती.नंतरही त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता.मात्र आम्ही शरद पवारांना कधी भेटलो नाहीत.त्यामुळं त्यांनी या विषयात लक्ष घालण्याचाही प्रश्‍न नव्हता,असं म्हणायला जागा आहे.

माझ्यासाठी प्रश्‍न मार्गी लागणं महत्वाचं आहे.तो कोणामुळं लागला हा मुद्दा गौण आहे.शरद पवार मध्यस्थी कऱणार असतील आणि प्रश्‍न सुटणार असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे.समजा पवार यांनी लक्ष घातलं नाही तरीही काही फरक पडणार नाही.आपली लढाई तर सुरूच राहणार आहे आणि ती दोन्ही प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत सुरूच राहणार आहे.परंतू चळवळ पुढे नेण्यासाठी अनेकांची मदत,सहानुभुती,सहकार्य घ्यावे लागते.तसा आम्ही प्रयत्न करीत आहोत.त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल कोणाला चर्चा करायची असेल तर त्यांनी ती जरूर करावी मात्र पवारांच्या विधानानंतर चळवळ एक पाऊल पुढे सरकली हे नक्की.उध्दव ठाकरे,शरद पवारांचाही आमच्या मागणीस पाठिंबा आहे असं आम्ही आता सरकारला सांगू शकतो.हे पुणे अधिवेशनाचं फलित आहे असं मला वाटतं.

अधिवेशन यशस्वी कऱण्यासाठी गेले महिनाभर प्रचंड मेहनत करणार्‍या पुण्यातील सर्व सहकारी पत्रकारा मित्रांचे आभार.- एस.एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here