-
श्रीनगर, दि. २० – कोणत्याही अफवा पसरून काश्मीर खो-यातील वातावरण बिघडू नये यासाठी जम्मू-काश्मीर सरकार कठोर पावले उचलत असून त्याच पार्श्वभूमीवर आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्साठी लायसन्स मिळवावा लागणार आहे. हांडवारा येथे नुकत्याच झालेल्या निदर्शनांदरम्यान ५ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर काश्मीरमध्ये तीन दिवस इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्यासाठी अॅडमिनला येत्या १० दिवसांत सरकारी अधिका-यांकडे अर्ज करून परवाना मागावा लागेल. ‘ एखाद्या ग्रुपवर टाकण्यात आलेल्या कोणत्याही पोस्ट्ससाठी त्या ग्रुपचा अॅडमिन जबाबदार असेल. तसेच कोणत्याही बेजबाबदार पोस्ट्स व शे-यांमुळे अप्रिय घटना घडल्यास त्यासाठी त्या ग्रुप अॅडमीनवर कारवाई करण्यात येईल’ असे कुपवाडा जिल्हाधिका-यांच्या कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
- ऑनलाईन लोकमतवरून साभार