वेदनेचा हुंकार

एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.. मी तणावात कधी नव्हतो .. विषय कुटुंबाचा येतो.. तेव्हा माणूस हळवा होतो.. तणावात येतो.. कोरोनानं सारयांनाच तणावात टाकलंय.. मला आणि माझ्या कुटुंबाला ही सोडलं नाही..

25 एप्रिल रोजी मी आत्मक्लेष आंदोलनाची घोषणा केली.. नियोजन असं होतं की, मी एकट्यानंच हे आंदोलन करायचं.. मात्र “आम्हीही आत्मक्लेष करतो आहोत” असे संदेश राज्यभरातून येऊ लागले.. बघता बघता माझ्या आत्मक्लेषाला राज्यव्यापी आंदोलनाचं स्वरूप मिळालं.. नेहमी प्रमाणे मग तयारी सुरू झाली.. निवेदनं,बातम्या, जाहिरातीचा मारा होऊ लागला. .. मला आंदोलन म्हटलं की, अन्य काही सुचत नाही.. मी सारी कामं सोडून आत्मक्लेषच्या मागं लागलो.. 27 ला शोभनाचा फोन आला घश्यात खवखव होतंय, चव आणि गंध ही नाही.. असं म्हणत होती.. मी फार मोठा तज्ज्ञ असल्यासारखा हळद दुध, काढा पिण्याचा सल्ला दिला.. उपयोग होत नव्हता. एक दिवस अंगावर काढलं .. 29 ला कोरोना टेस्ट केली.. रिपोर्ट संध्याकाळी आला.. शोभना पॉझिटिव्ह आली होती.त्याच रात्री सुधांशू देखील तापानं फणफणू लागला.. सोबत सर्दी देखील होती.. वेळ न घालवता 30 तारखेला त्याचीही टेस्ट केली.. तो ही पॉझिटीव्ह आला.. हे जेव्हा मला कळलं तेव्हा पायाखालची वाळू सरकली.. कारण ही दोघच पुण्यात होती .. मी गावी.. तातडीनं पुण्याला पोहचून त्यांच्यावर उपचार सुरू करणं ही माझी कौटुंबिक जबाबदारी होती.. माझी अडचण अशी होती की, 1 तारखेला म्हणजे दुसरया दिवशीच आमच्या “माणिकबागेत” आत्मक्लेष आंदोलन करायचं होतं.. जीवाची घालमेल सुरू होती.. इकडे आड – तिकडे विहीर अशी स्थिती.. जाणंही आवश्यक होतं, आत्मक्लेष टाळता येणं शक्य नव्हतं.. कारण सारया महाराष्ट्राच्या नजरा आंदोलनाकडे लागल्या होत्या..अशा स्थितीत सेनापतीला रणांगण सोडून पळण्याची मुभा नव्हती.. .. आधी लगीन कोंडाणयाचं हा तानाजींचा संदेश आम्ही दृषटीआड करू शकत नव्हतो..
अलिबागला आमचे कौटुंबिक मित्र आहेत डॉ. प्रशांत जन्नावार.. नांदेडचे आहेत.. गेली 20-25 वर्षे अलिबागलाच आहेत.. एम. डी. आहेत.. हृदयरोग तज्ज्ञ आहेत.. गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे, आम्ही हाक दिली की ते देवदूत बणून येतात.. एक सज्जन, सामाजिक बांधिलकी जपणारा, निष्णात डॉक्टर म्हणून ते रायगडमध्ये परिचित आहेत.. शिंक जरी आली तरी रात्री बेरात्री आम्ही फोन करून त्यांना त्रास देतो .. आमच्या बाबतीत कधी त्यांनी कंटाळा किंवा टाळाटाळ केली नाही.. माझा फोन जायच्या अगोदरच शोभनानं त्यांना फोन केला होता.. त्यांनी माहिती घेतली अन उपचारही सुरू केला.. पण कोरोना झाला या जाणिवेनंच सारे घाबरून जातात.. मी घाबरलो.. पुण्यातले जिवाभावाचे मित्र सुनील लोणकर, तुळशीराम घुसाळकर, संदीप बोडखे, सुनील नाना जगताप, सुनील वाळुंज, प्रमोद गव्हाणे, शरद पाबळे आदिंना फोन केले.. थेट बेडची व्यवस्था करा अशी विनंती केली.. मी घाबरलयाची ही लक्षणं होती.. मी पॅनिक झालो होतो . तसं व्हायचं कारण नव्हतं.. रूग्ण अगदीच नॉर्मल होते.. बहुतेक रूग्णांची अवस्था अशीच होते.. मी दररोज अनेकांना धीर देण्याचं काम करतो .. वेळ आपल्यावर येते तेव्हा माणूस बेचैन होतो.. जसा मी झालो होतो..सर्व मित्रांनी आश्वासन दिलं, “सर तुम्ही इकडची काळजी करू नका तुमचं आंदोलन होऊ द्या.. आम्ही इकडं सर्व व्यवस्था करतो” .. थोडा धीर आला.. तुळशीराम घुसाळकर हा माणूस असाय की, त्यांनी एखादा विषय मनावर घेतला की, मग त्यांना चैन पडत नाही.. आणि ते दुसरयीलाही स्वस्थ बसू देत नाहीत.. संदीप बोडखे यांना बरोबर घेऊन त्यांनी डॉक्टर मोहन वाघ यांना गाडीत घातले आणि घरी दोन पॉझिटीव्ह रूग्ण आहेत याची जराही पर्वा न करता हे तिघेही औषध, गोळ्या घेऊन माझ्या घरी पोहोचले.. रूग्णांना धीर दिला..
इकडे मी रात्रभर जागाच होतो.. फोनाफोनी सुरूच होती …पुण्यातील मित्रांनी सारी मदत केल्यानं सकाळी 8 वाजता ठरल्या प्रमाणे आत्मक्लेष सुरू झालं.. लक्ष लागत नव्हता.. अनिल वाघमारे, हरी पवार, आणि वडवणीचे पाच सहा मित्र मला भेटायला आले.. माझी बैचैनी त्यांच्या लक्षात आली असली तरी मी त्यांना काहीच कळू दिलं नाही. .. शोभनाला दहा दहा मिनिटाला फोन करून ऑक्सीजन लेवल, टेंपरेचर विचारत होतो. सुधांशूचा ताप कमी जास्त होत होता.. डॉ. जन्नावार, डॉ. मोहन वाघ यांच्या सूचनेवरून उपचार चालू होते.. तेवढ्यात आमचे मित्र विभागीय सचिव बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी आणि मुलगा पॉझिटिव्ह झाल्याचे आणि त्यांच्या पत्नीची ऑक्सीजन लेवल कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्याचे बापूंनी सांगितलयानं मी अधिकच अस्वस्थ झालो.. काय करावे सुचत नव्हतं.. बाईट द्यायला मुड नव्हता.. माझ्या आत्मक्लेष चा फोटो ज्यांनी पाहिला असेल त्यांना माझ्या चेहरयावरील तणाव नक्की दिसला असेल.. वडवणीचे पत्रकार मित्र होते तोपर्यंत कसा तरी वेळ गेला.. नंतर आख्ख वावर खायला उठलं.. सायंकाळी 6 पर्यत आंदोलन ठरलं होतं.. मी 4 वाजताच उठलो.. घरी आलो.. आई – वडिलांना सांगून मन हलकं करणं ही शक्य नव्हतं . ते हृदयविकाराचे पेशंट आहेत.. सारखं सुधांशूला व्हिडीओ कॉलवर बोलत राहणं एवढंच हातात होतं…. आमचा हा मुलगा थोडा हळवा.. आई पेक्षा वडिलांचा जास्त लळा.. थोडा मितभाषी, अलिप्त.. आपण आजारी असताना पप्पा नाहीत या जाणिवेनं तो थोडा मलूल झाला होता…त्याच्या चेहरयावर हे दिसत होतं.. शोभना तशी खंबीर, धीट.. कोणत्याही संकटाला निर्धारानं तोंड देण्याची क्षमता असलेली.. स्वतः पत्रकार असल्यानं माझी मानसिक कोंडी ती समजू शकत होती.. ती रूग्ण होती.. मात्र तीच मला हिंमत देत होती.. “काळजी करू नकोस, सारं व्यवस्थित होईल.. सारया महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नजरा तुझ्या आंदेलनाकडे आहेत, त्यांना निराश करू नको” हे तिचे शब्द होते..अर्थात अशा शाब्दिक सांत्वनानं काय होणार.?. कुटुबाला माझी गरज असताना कुटुंब प्रमुख 300 किलो मिटर दूर बसला होता.. हे शल्य मला स्वस्थ बसू देत नव्हतं..
अशा मानसिक घालमेलीतच माझं आत्मक्लेष संपलं .. घुसाळकर मला म्हणाले देखील. सर सारा अनुभव लिहा… मात्र मी लिहिलं नाही, चार – सहा मित्र सोडले तर कुणाला सांगितलंही नाही. मी माझ्या कुटुंबाचा जसा प़मुख आहे तद्वतच मी परिषदेचा देखील कुटुंब प्रमुख आहे.. कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यायची असते.. त्याला आपल्या दुःखाचे कढ काढत बसण्याची मुभा नसते.. त्यामुळे मी माझ्या व्यक्तीगत वेदना, दु:ख, शक्यतो सांगत नाही.. मीच रडत बसलो तर तुम्ही आपलं दुख कोणाला सांगायचं…? असं मला नेहमी वाटतं.. आज पत्नी आणि मुलगा व्यवस्थित असल्यानं हुंकार दाटून आला..
असो शोभनाचं सिटीस्कॅन केलं, दोघांचेही ब्लडटेस्ट केल्या .. आपल्या सर्वांच्या शुभेच्छामुळं सारं नॉर्मल आलं.. आज दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.. डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. विशाखा जन्नावार, डॉ. मोहन वाघ, मित्रवर्य तुळशीराम घुसाळकर, संदीप बोडखे, सुनील लोणकर, शरद पाबळे सुनील वाळुंज या सर्व मित्रांना शतशः धन्यवाद.. याची मदत आणि भावनिक आधार यामुळे आत्मक्लेष आंदोलन पार पडलं आणि आम्ही एका संकटातून सहीसलामत बाहेर पडलो.. घरात दोघेही कॉरंन्टाईन असल्याने आमचे व्याही८अभय चिटणवीस आणि सौ. वेजयंती चिटणवीस यांनी आठ दिवस स्वादिष्ट भोजणाची व्यवस्था केली.. म्हणजे जेवणाची देखील अडचण आली नाही.. आम्ही सारे आता ठीक आहोत, मात्र बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी अजून रूग्णालयातच आहेत.. त्यांना लवकर आराम पडावा यासाठी आपण सारे प्रार्थना करू यात..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here