विवेक पाटील सेनेत जाणार नाहीत हे नक्की पण …

0
1148

“शेकापचे उरणचे आमदार विवेक पाटील शिवसेनेत जाणार” अशी बातमी सकाळच्या मुंबई आवृत्तीत रविवारी प्रसिध्द झाली.सकाळच्या विश्वासार्हतेबद्दल पूर्ण आदर राखून हे स्पष्ट कऱणं भाग आहे की,असं काही होणं शक्य नाही.याची दोन कारणं आहेत,पहिलं स्व.दि.बा.पाटील आयुष्यभर शेकापमध्ये राहिले.आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शिवसेनेला जवळ केले.त्यानंतर त्यांचे जे हाल झाले ते विवेक पाटलांना माहिती आहेत.दि.बां.सारखा ज्येष्ठ नेता शिवसेनेत गेला तरी उरण-पनवेलमधील पक्षाचे सामांन्य कार्यकर्ते शिवसेनेत गेले नाहीत.कारण ते पक्षाशी “कमिटेड”आहेत.उरण-पनवेल-अलिबाग तालुक्यात अशी अनेक घराणी आहेत की,ती शेकापशी चार-चार पिढ्यांपासून जोडली गेलेली आहेत.लाल बावटा हा त्यांचा श्वास आहे.नेता जोवर लाल बावट्याचा आदर करतो तोवर ते नेत्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असतात.नेता पक्षाशी बेईमान झाला तर ते त्याला वाऱ्यावर सोडतात,हा शेकापचा इतिहास आहे.विवेक पाटलांना हा इतिहास माहिती असल्याने ते शिवसेनेत जाणार नाहीत हे नक्की.

– विवेक पाटील शिवसेनेत जाऊ शकत नाहीत याचं दुसरं कारण असं की,ते सेनेत गेले तर त्यांची आमदारकीही धोक्यात येऊ शकते.कारण उरणमध्ये शिवसेना-भाजपची ताकद असली तरी ती स्वबळावर आपला उमेदवार निवडून आणू शकेल एवढी नक्कीच नाही.निवडून यायचं तर शेकापची साथ हवी.जर विवेक पाटील शिवसेनेत गेले तर शेकाप त्यांना पराभूत करण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार हे उघड आहे.मतदारांचं प्रमाणं बघता त्यात ते यशस्वी होणार यातही शंका नाही.हे देखील राजकारण निपून विवेक पाटील यांना माहिती आहे.त्यामुळं ते लगेच पक्ष सोडण्याच्या भानगडीत पडणार नाहीत.शेकपमध्ये त्यांना फारसं भवितव्य नाही ते आमदारकीच्या पुढं जाऊ शकत नाहीत कारण तशी वेळ आलीच तर मंत्रीपदावर पहिला हक्क जयंत पाटीलच सांगतील आणि विवेक पाटील आमदारच राहतील हे ही त्यांना माहिती आहे तरीही ते पक्षांतर करण्याची राजकीय घोडचूक करणार नाहीत हे आजचे चित्र आहे.त्यामुळं सकाळच्या बातमी त्या अर्थानं निराधार ठरते.

याचा अर्थ सध्या रायगडमध्ये जयंत पाटील जे राजकारण करीत आहेत ते विवेक पाटलांना मान्य आहे असं नाही.विशेषतः शिवसेनेबरोबरची युती तोडून मनसेची मदत घेण्याची तसेच अ.र.अंतुलेचे आशीर्वाद घेण्यासाठी शेकापच्या उमेदवारांना मुनलाईटवर घेऊन जाण्याची  जयंत पाटील यांची ़़खेळी  विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांना अजिबात आवडलेली नाही असे त्यांचे समर्थक सांगतात.त्याचंही कारण आहे.जिल्हयात शेकाप आणि शिवसेनेची जी युती झालेली आहे त्याचे शिल्पकार विवेक पाटील हे आहेत.त्याचं कारण पनवेल-उरणच्या राजकारणात दडलेलं आहे.प्रारंभी म्हटल्याप्रमाणं पनवेल -उरणमध्ये शिवसेनेचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. उऱण नगरपालिका भाजप-सेनेच्या ताब्यात आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही युतीचाच पगडा आहे.याशिवाय आता खालापूर तालुक्यातील चौक आणि रसायनीचा परिसर उरणला जोडला गेलेला असल्याने आणि हा परिसर शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला आहे.याउलट उरणमध्ये आणि पनवेलमध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. – पनवेलमध्ये कॉग्रेस भक्कम आहे.पनवेल नगरपालिका,आणि पनवेलची आमदारकी कॉग्रेसकडे आहे. अशा स्थितीत उरणची सुभेदारी पुनश्च मिळवायची तर शिवसेनेशी युती कऱण्यावाचून गत्यंतर नाही हे विवेक पाटील यांनी ओळखले आणि त्यांनी शिवसेनेच्या बबन पाटील यांच्यामार्फत ही युती घडवून आणली.याचा फायदा किमान उरण – पनवेल मध्ये   दोन्ही पक्षांना झाला.जिल्हा परिषदेत सत्ता आली.उरण पंचायत समिती किंवा उरणमधील जिल्हा परिषदेच्या मतदार संघातही युतीने कॉग्रेसला धूळ चाखली.युतीमुळे रामशेठ ठाकूर याचं काही चाललं नाही.विवेक पाटील याचं राजकारण व्यवस्थित चालू राहिलं.मात्र सेनेबरोबरच्या युतीचा जेवढा लाभ विवेक पाटील यांना झाला तेवढा लाभ आमदार  जयंत पाटील यांना झाला नाही.जिल्हा परिषदेत सत्तेत आज अलिबागच्या पाटील घराण्यातील कोणी नाही.शिवाय अलिबाग पंचायत समिती आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आणली असं जयंत पाटील सांगतात आणि ते खरंही आहे.  थळ जिल्हा परिषद मतदार संघात जयतं पाटील याचं चिरंजीव नृपाल पाटील यांचा जो प्रचंड फरकाने पराभव झाला त्याला शिवसेनेचे असहकार्य कारणीभूत आहे असंही जयंत पाटील याचं म्हणणं आहे.विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची मदत शेकापला मिळत नाही हे जयंत पाटील अनेकदा खासगीत सांगत असतात.अलिबाग तालुक्यात सेनेची दहा-बारा हजारच मतं आहेत ती आम्हाला मिळत नाहीत कारण तालुक्यातील शिवसैनिक परंपरागत शेकापचे विरोधक आहेत असा जयंत पाटील यांचा तर्क असतो.त्यामुळं पेण,पनवेल,उरणमध्ये शिवसेनेची जी मदत शेकापला होते त्यावर पाणी सोडत जयंत पाटील यांनी शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची घोषणा केली.लोकसभेला आपला उमेदवारही उभा केला.मात्र असं विधानसभेच्या वेळेस झालं तर तिकडे विवेक पाटील आणि पेणमध्ये धैर्यशील पाटीलही धोक्यात येऊ शकतात.कारण त्यांना सेनेची मदत मिळते.ती त्यांना हवीही आहे.विवेक पाटील यांची पनवेल -उऱणमध्ये बलाढ्य रामशेठ ठाकूर यांच्या कॉग्रसशी लढाई आङे.धैर्यशील पाटील यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशीही लढायचं आहे.त्यासाठी पेण आणि उरणच्या दोन्ही पाटलांना शिवसेनेशी युती हवी आहे.त्यासाठी त्यंाच जयंत पाटील यांच्यावर दबाव आहे.विवेक पाटील असोत किंवा धैर्यशील पाटील असोत या दोघांनाही मनसे किंवा लक्ष्मण जगताप यांचा काही उपयोग होणार नाही.कारण लक्ष्मण जगताप अगदी निवडून आले तरी त्याचं सारं लक्ष पिपरी-चिचवडमध्येच असेल तर मनसेचा विवेक पाटील किंवा धैर्यशील पाटील यांच्या मतदार संघात अजिबात प्रभाव नाङी.उरण आणि पेणमध्ये मनसेची अगदी पाच-पाच हजारमतंही नाहीत अशा स्थितीत शिवसेनेशी युती तोडून मनसेशी घरोबा कऱण्याचा जयंत पाटील यांचा खेळ विवेक पाटील यांच्यासाठी तरी आतबट्टयातला व्यवहार ठरणार असल्याने ते अस्वस्थ आहेत.खाजगीत युती तुटणार नाही असे हे दोन्ही नेते बोलतात.त्यात तथ्यही दिसते.कारण युती तोडायची घोषणा जयंत पाटील यांनी केली असली तरी ते अजून जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडलेले नाहीत.ते लोकसभेपर्यत जिल्हा परिषदेच्या बाबतीत काहीच निर्णय घेणार नाहीत.जयंत पाटील आज खेळत असलेला  राजकीय जुगार हरलेच तर नक्कीच ते शिवसेनेबरोबरची युती तोडू शकणार नाहीत.विवेक पाटील त्यांना कुठल्याही परिस्थितीत तसे करू देणार  नाहीत.विवेक पाटील शिवसेनेच्या विरोधात बोलत नाहीत आणि बबन पाटीलही जयंत पाटील यांच्यावरच हल्ले करीत आहेत,ते विवेक पाटलांच्या विरोधात बोलत नाहीत हे ही रायगडच्या जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही.यातून काय तो योग्य अर्थ घेण्याएवढी रायगडची जनता नक्कीच राजकीयदृष्टया परिपक्व आहे.

– या सगळ्या राजकारणाला अ.र.अंतुले यांनी शेकापच्या उमेदवारांना दिलेला आशीर्वाद हा देखील एक कंगोरा महत्वाचा आहे.उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की,गेले पन्नास वर्षे रायगडात शेकाप विरूध्द कॉग्रेस अशीच लढत झालेली आहे.अनेकदा ही लढाई एवढी तीव्र होती की,दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना रक्तही सांडावे लागले आहे.शेकापच्या नेत्यांनी अंतुलेवर चप्पल उगारण्यापर्यतही तेव्हा मजल गेलेली होती.अशा स्थितीत जयंत पाटील यांनी अंतुलेंचे आशीर्वाद घेण्यासाठी मूनलाईटवर  जाणे म्हणेज बाळासाहेबाच्या स्मारकासाठी शिवसेना नेत्यांनी शरद पवार यांचे दरवाजे ठोठावण्यासारखे होते.जिल्हयात अंतुलेचा प्रभाव पूर्वीसारखा राहिला नाही आणि पक्षातही अंतुलेंच्या शब्दाला आता पुर्वीसारखा मान राहिलेला नाही हे त्यांना डावलून ज्या पध्दतीनं कॉग्रेसने रायगड राष्ट्रवादीला आंदण  दिलाय त्यावरून सिध्द झालं आहे.तरीही जयंत पाटील मुनलाईटवर आपल्या दोन्ही उमेदवारांना घेऊन जातात आणि अंतुलेंचे आशीर्वाद घेतात ही गोष्ट ना कॉग्रेसवाल्यांच्या पचनी पडणारी आहे ना शेकापच्या कार्यकर्त्यांच्या.या आशीर्वाद नाट्याने पुन्हा एकदा विवेक पाटील यांची अडचण करून टाकली आहे.विवेक पाटील यांची उरण आणि पनवेलमधील लढाई प्रामुख्यानं कॉग्रेसशी आहे.रामशेठ ठाकुर यांनी दोन्ही तालुक्यात विवेक पाटील आणि  त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नाकीनऊ आणलेले आहेत हे सर्वश्रुत आहे.अशा स्थितीत विवेक पाटील यांनी कॉग्रेसच्या भांडवलदारी राजकारणावर टीकास्त्र सोडायचे,कॉग्रेस हा पक्ष किती गरीब विरोधी आहे याचे पाढे वाचायचे आणि तिकडे जयंत पाटील यांनी मुनलाईटवर जाऊन एवढे दिवस जिल्हा कॉग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या अंतुलेंचे आशार्वाद घ्यायचे ही गोष्टही विवेक पाटील यांना आवडणे शक्य नाही.विवेक पाटील आणि बाळाराम पाटील मुनलाईटवर गेल्याचे किमान जयंत पाटील यांनी जे फोटो माध्यमांना दिलेत त्यातून तरी दिसून आलेले नाही.लोकसभेचे सोडा पण उद्या विधानसभेच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा कॉग्रेसचे नेते अंतुलें शेकापच्या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद देत आहेत आणि मागे स्वतः जयंत पाटील हास्यविनोद करीत आहेत ही छायाचित्रे नक्की प्रसिध्द करतील तेव्हा विवेक पाटील यांना उत्तर देणे महाकठिण काम होणार आहे.कॉग्रेस नेत्याचे आशीर्वाद खरे की,कॉग्रेसवरची टीका खरी या आम आदमीच्या प्रश्नाला विवेक पाटलांकडे उत्तर नसेल.अंतुलेंनी उद्या कॉग्रेस सोडली किंवा कॉग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली तरी परिस्थिती बदलणार नाही हे उघड सत्य आहे.त्यामुळे खाली शिवसेनेच्या रामदास कदम यांची जी अडचण झाली आहे तशीच अडचण पनवेल-उरणमध्ये विवेक पाटील यांची झालेली असल्याने त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी झाली आहे.मात्र विवेक पाटील हे संयमी नेते आहेत.अनेकदा जयंत पाटील यांचे राजकारण पटले नसले तरी त्यांनी कधी आदळ-आपट केलेली नाही.पक्षातील ऐक्य टिकले पाहिजे ही भूमिका घेतच ते राजकारण करीत आले आहेत.मात्र आता त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने ते या पेचातून स्वतःची कशी सुटका करून घेतात ते येत्या काही दिवसातच दिसणार आहे.

काही वर्षांपूर्वी विवेक पाटील राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी बातमी सागरने प्रसिध्द केली होती,त्यावेळेस सागरच्या कार्यालयावर शेकापच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.आता विवेक पाटील शिवसेनेत जाणार अशी बातमी सकाळमध्ये आल्यानंतर शेकापवाल्यांनी सकाळची होळी केली.असे हल्ले करून होळ्या करून किंवा पत्रकारांना दमदाटी करून प्रश्न संपणार नसतो.मुळात अशा बातम्या का येतात याचा विचार विवेक पाटील यांनी केला पाहिजे.अशा बातम्या वारंवार येत गेल्याने विवेक पाटील यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न निर्माण होईल आणि ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठीही धोकादायक ठरू शकेल.राजकारणात विश्वासार्हता महत्वाची असते ती जपली नाही तर अडचणी येतात.अनेक राजकारण्यांना याचा अनुभव आलेला आहे.

[divider]

-एस.एम.देशमुख

[divider]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here