‘विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमातील अंतर लोकशाहीला घातक’

0
690
SHRES
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांकडे असल्याने दोघांमध्ये अंतर वाढणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. विरोधी पक्षांनी सर्वसामान्यांच्या हिताच्या उचललेल्या प्रश्नांना माध्यमांनी साथ दिली नाही तर सत्ताधारी कोणाचेच ऐकणार नाहीत. यासाठी दोन्ही घटकांमध्ये संवाद असणे आवश्यक असून, दोघांनीही आपल्या भूमिकेत कायम राहावे. राज्यात पत्रकार आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या नात्याची मोठी परंपरा असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.बीड येथे शनिवारी पत्रकार संघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘विरोधी पक्ष व प्रसारमाध्यमे’ या विषयावर आपली भूमिका मांडली. या वेळी  दिलीप खिस्ती, संतोष मानूरकर, नरेंद्र कांकरिया, वैभव स्वामी आदी उपस्थित होते. या वेळी धनंजय मुंडे म्हणाले, सत्ताधाऱ्यांवर माध्यमांचा वचक राहिला नाही तर सत्ताधारी कोणाचेच ऐकणार नाहीत आणि लोकशाहीच उरणार नाही. त्यामुळे माध्यमांनी विरोधी पक्षाच्या जोडीने काम करण्याची गरज आहे. विरोधी पक्ष नेतेपद माझ्याकडे आले तेव्हा काही दैनिकांनी ‘घरात विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद मिळाले’ अशी टिप्पणी केली होती. या बातम्यांतूनही प्रेरणा घेऊन मी राज्यभर आणि विधिमंडळात माझे कर्तृत्व सिद्ध केले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर सावलीसारखा फिरल्याने संघर्षांच्या काळात कोणाला सोबत घ्यायचे, बातमी कशी आली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकलो.

राज्यात पत्रकार आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या नात्याला मोठी परंपरा आहे. स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. आर. आर. पाटील आणि शरद पवार हे नेते विरोधी पक्षात असताना माध्यमांनीच त्यांचे नेतृत्व घडवले. प्रत्येकाने आपल्या भूमिकेत राहिले पाहिजे. उलटसुलट बातमी छापून आली तर राग येता कामा नये. लोकशाहीत माध्यमांना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचा अधिकार असल्याने माध्यमांनी सत्तेशी जुळवून न घेता चुका वेशीवर टांगण्याची गरज आहे. सध्याचे सरकार हे लोकप्रिय निर्णय घेऊन प्रसिद्धी कमविण्यात मश्गूल आहे. मांसबंदी, लालदिवाबंदी आणि नोटाबंदी यामुळे सामान्यांचे कुठले प्रश्न सुटले, असा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. परंतु लोकप्रियतेसाठी हे सरकार काहीही करण्याच्या मानसिकतेत असल्याने उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ रद्द करून एकटेच कारभार करतील अशी शंका येते. त्यामुळे माध्यमांनी दैनिकांचा व्यवसाय सांभाळताना लोकशाहीही सांभाळली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशिद यांनी केले.

सरकारच्या निर्णयाने नेमकं काय साध्य झालं?

तीन वर्षांत सरकारच्या निर्णयाने सामान्यांच्या जीवनात काय फरक पडला, असा प्रश्न करून धनंजय मुंडे म्हणाले, ‘मन की बात’ म्हणत चारशे रुपयांचे गॅस सिलिंडर आठशे रुपयांपर्यंत कधी गेले हे कळलेसुद्धा नाही. कडधान्यांच्या किमती अवाच्या सवा कधी झाल्या, तेही उमजले नाही. मांसबंदीमुळे नेमका काय विकास झाला, नोटाबंदीमुळे किती काळा पसा बाहेर आला काहीच कळायला मेळ नाही. उलट नोटाबंदीमुळे आजही सामान्य जनताच भरडली गेली आहे. अडीच वर्षांत सरकारच्या एक लाख चुका झाल्या असतील, पण त्यावर चर्चा होत नाही, अशी खंत व्यक्त करून लोकशाही अबाधित राहण्यासाठी आता याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here