राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपत आहे.आणखी नऊ आमदारांचाही कार्यकाल समाप्त होत आहे.त्यामुळं पुढील महिन्यात विधानसभा सदस्यातून विधान परिषदेवर निवडून  द्यावयाच्या अकरा जागांसाठी मतदान होत आहे.विजयी होण्यासाठी 25 मतांची गरज असणार आहे.सध्याचं विधानसभेतील पक्षीय बलाबल विचारात घेता भाजपचे सर्वाधिक म्हणजे 5 सदस्य विधान परिषदेवर जाणार आहेत.त्यांचे 123 सदस्य आहेत.63 आमदार असलेल्या शिवसेनेचे दोन सदस्य विधान परिषदेवर निवडणून जाऊ शकतात.त्यानंतरही त्यांचे 13 मतं शिल्लक राहतात.कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.त्यानंतरही कॉग्रेसकडं 17 आणि राष्ट्रवादीकडं 16 मतं शिल्लक राहतात.याचा अर्थ ठरवलं आणि हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर या पक्षांचे तीन उमेदवार विजयी होऊ शकतात.त्यानंतरही दोघांचे मिळून 8 मतं शिल्लक राहणार आहेत .ही आठ मतं ते कोणाला देतात हा कळीचा मुद्दा आहे.अकराव्या जागेसाठी शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे .शेकापचे विधानसभेत केवळ तीनच सदस्य आहेत.यापुर्वी देखील तेवढीच संख्या असताना ते दोन वेळा विजयी झाले आहेत.त्यामुळं तीन मतांच्या जोरावर पंचवीस मतं कशी मिळवायची याचा पुरेसा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे.

जयंत पाटील आणि त्यांचा पक्ष सध्या भाजप विरोधी आघाडीत आहेत.कोकणात तर सुनील तटकरे यांच्याबरोबरचं शत्रूत्व कुंडलिकेत सोडून देत त्यांनी राष्ट्रवादीशी जुळवून घेतलं आहे.बोललं असं जातं की,विधान परिषदेची आपली जागा पक्की करण्यासाठीच राष्ट्रवादीशी त्यांनी दोस्ताना केला आहे.ते चुकीचंही नाही.कारण जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा शेकापच्या असताना केवळ बारा जागा ज्या राष्ट्रवादीच्या निवडून आल्या त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिलं गेलं आहे.सुनील तटकरे याच्या कन्या आदिती तटकरे या सध्या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत.अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्यायला शेकापतील एका गटाचा विरोध होता.परंतू जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय रेटून नेला .जिल्हा परिषद सुनील तटकरेच्या हाती देतानाच जयंत पाटील यांना विधान परिषदेवर पाठविण्याचा सौदा झालेला होता असे बोलेले जाते।  स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी नुकतीच निवडणूक झाली.तेथेही शेकापन सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या पारडयात आपली मतं टाकली होती.त्यामागं देखील जयंत पाटील यांची येऊ घातलेली निवडणूक हेच कारण होतं.अनिकेत तटकरे प्रचंड मताधिक्क्यानं निवडून आले.जयंत पाटील यांनी आपली दोन्ही आश्‍वासनं पाळली.आता आश्‍वासन पाळण्याची वेळ  सुनील तटकरे यांची आहे.एक चर्चा अशीही होती की,पदवीधर मतदार संघात जयंत पाटील आपल्या स्नुषा चित्रलेखा पाटील यांना उभे करतील.पण तशी शक्यता वाटत  नाही.याचं कारण कोकण पदवीधर मतदार संघ हा भाजपचा परंपरागत मतदार संघ आहे.कोकण पदवीधर मतदार संघावर 1988 पासून 2012 पर्यंत भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे.मागच्या वेळेस भाजपचे संजय केळकर याचा जरूर पराभव झाला पण त्याची कारण वेगळी होती.कै.वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव निरंजन डावखरे तेव्हा राष्ट्रवादीकडून मैदानात होते.वसंतराव डावखरे यांचे सर्वपक्षात चांगले संबंध होते.त्याचा फायदा निरंजन डावखरे यांना झाला.डावखरे यांना ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता सर्वच पक्ष्यांची मतं मिळाली होती.आता तेच भाजपमध्ये गेले आहेत.त्यांना भाजपची उमेदवारी देखील मिळत आहे.त्यामुळं ते प्रबळ उमेदवार ठरू शकतात.निरंजन डावखरे यांना तिकीट दिल्यानं संदीप लेले,किंवा विनय नातू यांच्यासारखे इच्छूक नाराज असले तरी त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते.त्यामुळं निरंजन डावखरे यांच्याशी होणारी लढाई सोपी नाही.शिवाय चित्रलेखा पाटील यांना आज निवडून द्या,उद्या पुन्हा जयंत पाटील यांना निवडून द्या,,हे राष्ट्रवादीतील अऩ्य इच्छूकांच्या पचनी पडणार नाही.ते दगाफटका करू शकतात.हे जयंतरावांना नक्की माहिती आहे.जितेेंद्र आव्हाड नजिब मुल्ला यांच्यासाठी आग्रही आहेत.त्यांना डावलून शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना पक्षानं पाठिंबा दिला तर ते जितेंद्र आव्हाड यांनाही चालणार नाही.कारण निरंजन डावखरे यांना ते धडा शिकवायचा निर्धार  करून बसले आहेत.त्यासाठी मोठी झुंज द्यायची त्याची तयारी आहे.

शिवसेनाही आपला उमेदवार उभा करणार असल्याने या तिरंगी सामन्यात पडायला जयंत पाटील किती उत्सुक असतील याबद्दल शंका आहे.या बेभरवश्याच्या निवडणुकीतला धोका विकत घेऊन पुढील महिन्यात होणार्‍या आपल्या निवडणुकीवरचे लक्ष ते विचलित होऊ देणार नाहीत हे नक्की.कॉग्रेस -राष्ट्रवादीनं आपल्याला त्यांच्या कोटयातला तिसरी उमेदवार म्हणून मदत करावी असा जयंत पाटील यांचा प्रयत्न आहे.तसं झालं तर त्यांचा विजय नक्की असेल.विरोधक एकत्र आले तर ते भाजपचा पराभव करू शकतात हे गोंदियाःभंडारा येथील निवडणूक निकालावरून स्पष्ट झालं आहे.त्यामुळं राज्यातील समविचारी पक्षांना बरोबर घेण्याचं कॉग्रेस,राष्ट्रवादीचं धोरण आहे.कम्युनिस्टांप्रमाणेच त्यांना शेकापही बरोबर हवा आहे.त्यामुळं कॉग्रेस किंवा राष्ट्रवादी जयंत पाटलांना नाही म्हणू शकणार नाहीत.शेकापचा रायगडबाहेर फार कुठं प्रभाव नाही हे जरी खरे असले तरी  रायगडमध्ये लोकसभेच्या दोन जागांवर त्यांची मतं निर्णायक आहेत.मागच्या वेळेस लोकसभेसाठी शेकापनं आपला उमेदवार उभा केला होता.रायगड बाहेरचा उमेदवार असताना त्याला 15 हजारांच्यावर मतं पडली होती.सुनील तटकरे अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाले होते.याचा अर्थ असा की,शेकापबरोबर असला तर रायगड आणि मावळची जागा जिंकणे राष्ट्रवादीला सहज शक्य आहे.हे गणित बघता आगामी विधान परिषदेच्या वेळेस जयंत पाटील यांना अकरावा नव्हे तर दहावा उमेदवार म्हणून कॉग्रेस-राष्ट्रवादीनं निवडून आणलं तर आश्‍चर्य वाटायला नको.

अकरावा उमेदवार म्हणून निवडून येणं तेवढं सोपं नाही.कारण कॉग्रेस-राष्ट्रवादीचे 8,शेकापचे स्वतःचे 3,अपक्ष 7 आणि अन्य छोटया पक्षांचे मिळून 9 मतं शिल्लक राहतात.ही सारीच मतं जयंत पाटील यांना मिळतील असं नाही.अकराव्या जागेसाठी आणखी एखादा भिडू मैदानात उतरला तर मग हा सामना रंगतदार ठरणार आहे.कारण भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन मतं कमी पडतात.ती दोन मतं यातूनच मिळतील.त्यामुळं मतांची पळवापळवी होऊ शकते.शिवाय शिवसेनेकडे असलेल्या तेरा मतांच्या बळावर त्यांनी एखादया धनिकाला उभे केले तर अपक्ष आणि अन्य छोटया पक्षांची दहा-बारा मतं विकत घेतली जाऊ शकतात.शेकाप आणि राष्ट्रवादीला अद्दल घडविण्यासाठी शिवसेना अशी खेळी खेळणारच नाही असं म्हणता येणार नाही.कारण राष्ट्रवादी आणि शेकापनं हातमिळवणी करून रायगडात शिवसेनेच्याविरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे.ही आघाडी शिवसेनेला ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र त्रासदायक ठरत आहे,ठरणार आहे.नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सर्व पक्षांनी एकत्र येत शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव केला.ती सल शिवसेनेच्या मनातून जाणं शक्य नाही.त्यामुळं त्यांचा भाजपवर जेवढा राग आहे तेवढाच शेकापवर असणं चुकीचं नाही.त्यामुळं त्यांची कोंडी करण्याची संधी सेना सोडणार नाही असं म्हणता येऊ शकेल.त्यामुळं सुरक्षित तिसर्‍या जागेसाठीच आपल्याला संधी द्यावी असाच आग्रह जयंत पाटील धरतील.तो मान्य होण्याची जास्त शक्यता असल्यानं तीन सदस्य असताना तिसर्‍या वेळेस जयंत पाटील विधान परिषदेवर जाणार आहेत.

कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळेल याचा अंदाज वर्तविणं अवघड असलं तरी राष्ट्रवादीकडून नरेंद्र पाटील इच्छूक असल्याचं सांगितलं जातं.परंतू निरंजन डावखरे यांंना निरोप द्यायला हे नरेंद्र पाटील भाजप कार्यालयाच्या दारापर्यंत गेले होते.त्यामुळं पक्षाची उमेदवारी त्यांना मिळेलच याची खात्री नाही.अशा स्थितीत पुन्हा एकदा सुनील तटकरे यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाईल अशीच चर्चा आहे.विधान ‘परिषदेसाठी सुनील तटकरे यांच्या घरातील उमेदवार मी शोधततोय “असा उपहासात्मक टोला लगावत भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांच्या घराणेशाहीवर प्रहार केला असला तरी त्यानं फार फरक पडेल असं नाही.शरद पवार आणि अजित पवार यांच्याबरोबर असलेले तटकरे यांचे संबंध आणि विजयी होण्याची निश्‍चिती या दोन गोष्टींमुळं भास्कर जाधव यांच्या पोटदुखीवर पक्ष श्रेष्ठी काही औषध देतील असं वाटत नाही.भास्कर जाधव जे म्हणतात ते चुकीचं नाही.सारी पदं तटकरे आपल्या घरातच वाटून घेतात अशी रायगडातही चर्चा असते.ते स्वतः,मुलगा आणि पुतण्या असे तीन आमदार त्यांच्या घरात आहेत.मुलगी आदिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत.साडू रोह्याचे नगराध्यक्ष आहेत.पुन्हा आदितीला लोकसभेसाठी उभं केलं जाण्याची शक्यता आहे.हे सारं आहेच.तरीही पक्ष त्यांनाच उमेदवारी देणार आणि सुनील तटकरे पुन्हा आमदार होणार हे नक्की. तात्पर्य राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील हे दोन्ही रायगडचे नेते पुन्हा एकदा विधान परिषदेत गेले तर कोणाला आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here