“साहित्यिक कोणत्याच मुद्यांवर काहीही भूमिका घेत नाहीत’ अशी टीका मध्यंतरी राज ठाकरे यांनी केली होती.माझं मतंही असंच आहे.पत्रकार,साहित्यिक,व्यंगचित्रकार,कवी हा असा एक घटक आहे की,त्यांनी बोलावं,लेखणीतून समाजाच्या वेदना मांडाव्यात,कुंचल्याच्या फटकार्‍यानं व्यवस्थेला नागडं करावं असं समाजाला वाटत असतं.देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी चालली आहे,व्यवस्थेच्या विरोधात बोलणार्‍यांचा आवाज बंद केला जात आहे.ट्रोलर अगदी अर्वाच्य शिविगाळ करताना दिसत आहेत.अशा स्थितीत साहित्यिक,पत्रकार,लेखक पुढं येऊन या विरोधात आवाज व्यक्त करतात असं दिसत नाही.मध्यंतरी पुरस्कार वापसीचा प्रयोग झाला त्यानंही सरकार हादरून गेलं.पण पुन्हा शांत शांत.या पार्श्‍वभूमीवर काल बडोदा येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘देशमुखी बाणा’ दाखवत ‘राजा,तू चुकत आहेस’ हे ठणकावून सांगण्याची हिंमत दाखविली त्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख याचं अभिनंदन केलं पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा होणारा संकोच,जातीय -धार्मिक कारणांवरून होणारे हल्ले,न्यूड एस.दुर्गा किंवा पद्मावत या चित्रपटाच्या निमित्तानं होणारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी साहित्यिक,पत्रकारांवर होणारे हल्ले यावरून साहित्यिकांत,पत्रकारात  मोठी अस्वस्थतः आहे. मात्र ती व्यक्त होत नसली आणि अन्य फार कोणी बोलत नसले तरी लक्ष्मीकांत देशमुख यांनी एका प्रभावी  व्यासपीठावरून सरकारला हे सारं सुनावण्याची हिंमत दाखविली ही बाब नक्कीच स्वागतार्ह आङे,साहित्य महामंडळ असो किंवा अध्यक्ष असोत अनेकदा त्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे.साहित्य संमेलनासाठी सरकार जे अनुदान देते त्यातूनही हा मिद्देपणा आलेला असू शकतो.मात्र हे अऩुदान देऊन सरकार साहित्यिकांवर उपकार करीत नाही.ती सरकारची जबाबदारी आहे.त्यामुळं अनुदान मिळते म्हणून तोंडाला कुलुप लावून बसणे मान्य होण्यासारखे नाही.लक्ष्मीकांत देशमुख यांनी याची पर्वा न करता रोखठोक भाषेत ठणकावलं ते बरं झालं.पण एक गोष्ट मात्र खटकली,त्यांनी ‘राजा’ हा शब्दप्रयोग केला.या शब्दाला सरंजामशाहीचा वास येतो.आज राजेशाही नाही तर लोकशाही आहे.मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान राजे नाहीत.त्यामुळं त्यांनी थेट मुख्यमंत्री किंवा पतप्रधान किंवा सरकार असा शब्दप्रयोग केला असता तर तो अधिक उचित ठरला असता..असो स्पष्ट शब्दात व्यक्त झाले ती आनंदाची गोष्ट आहे.आता साहित्यिकांनी,पत्रकारांनी पुरस्कार,कमिट्यांवर डोळा न ठेवता बोलायला सुरूवात केली तर समाजाचे अनेक प्रश्‍न हालके व्हायला मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here