रोह्यात तटकरे जिंकूनही हरले…

0
958

रायगडमधील निवडणूक निकालांचं एका वाक्यात विश्‍लेषण करायचं तर “जिल्हयातील शहरी मतदारांनी शेकाप-राष्ट्रवादी आघाडी मान्य केली नाही”  असं करता  येईल.शेकापचे नेते आ.जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आपले बालेकिल्ले जरूर राखले पण ते आघाडी  झाल्यामुळं नाही.अलिबाग शेकाप जिंकणारच होते.रोहा आणि श्रीवर्धनमध्येही तटकरेंना आव्हान असलं तरी ते विजयश्री खेचून आणणारच असं चित्र होतं.खोपोलीत आ.सुरेश लाड आणि दत्ताजी मसुरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.त्यांनी आपला गड सांभाळला तरीही राष्ट्रवादीच्या ताब्यातील माथेरान आणि मुरूड या दोन नगरपालिका गेलेल्या आहेत.हे या पक्षाचं मोठं नुकसान म्हणावं लागेल.म्हणजे आघाडी झाल्यानं नवं काही जिंकता आलं नाहीच जे होतं तेही गमवावं लागले आहे.मुरूड आणि माथेरान हे देखील राष्ट्रवादीचे प्रभावी किल्ले.तेथील नगराध्यक्ष पदं तर गमविलीच पण दोन-चार नगरसेवक निवडून आणतानाही आघाडीची दमछाक झाली.म्हणजे ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही’ असं राजकीय नेते म्हणून आपल्या आघाडीचे समर्थन करीत असले तरी अशा आघाड्या मतदार स्वीकारत नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.माथेरानसाऱख्या शहरात 14 नगरसेवक शिवसेने जिंकणे आणि मुरूडमध्ये ना ना क्लुप्त्या केल्यानंतरही राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या पदरात केवळ सहाच पड़ने .हा सुनील तटकरे  यांना चिंतन करायला लावणारा विषय आहे.खोपोलीही  या आघाडीला मोठा संघर्ष करावा लागला आहे.रोह्यात 17 पैकी 12 नगरसेवक तटकरेंनी नक्की निवडून आणलेत पण शेकापबरोबर आघाडी नसतानाही गेल्या वेळेस एवढे नगरसेवक राष्ट्रवादीचे होतेच.ना। मात्र या  विजयाचा निखळ आनंद तटकरे यांनी घ्यावा अशी स्थिती नक्कीच नाही.संतोष पोटफोडे हे केवळ सहा मतांनी विजयी झाले आहेत.समीर शेडगे यांचा निसटता पराभव झाला आहे.या निवडणुकांचा एकूण रागरंग बघता ही निवडणूक तटकरे विरूध्द तटकरे अशी नसून ती तटकरे विरूध्द समीर शेडगे अशी आहे असं आम्ही म्हटलं होतं ते खरं ठरलं.संदीप तटकरे उभे नसते तर समीर शेडगेंचा विजय नक्की होता.त्यामुळं रोह्यात निवडणुकी अगोदर जी चर्चा होती की,तटकरे कुटुंबातील ही लढाई लुुटुपुटुची लढाई आहे त्या चर्चेला आजच्या निकालानं पुष्टी मिळते

रोह्यात शिवसेनेची खेळी नक्कीच चुकली.त्यांनी संदीप तटकरेंऐवजी समीर शेडगेंना पाठिंबा दिला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते.रोह्यात तटकरें कुटुंबाबद्दलच एक सुप्त  नाराजी आहे. लोक त्यांना जरूर मतं देतात पण समर्थ पर्याय समोर आला तर लोक त्याच्या मागं जातात हे अपक्ष समीर शेडगे यांना ज्या पध्दतीनं मतं मिळालीत त्यावरून म्हणता येईल.तयारीला मिळालेला अत्यल्प  वेळ,यंत्रणा उभी करता आली नाही,आणि एका प्रबळ शक्तीशी एकाकी लढाई असतानाही समीर यांच्यावर  रोहेकरांनी मतांचा पाऊस पाडला हे विशेष आहे.शिवसेनेने मात्र पहिल्यापासून गोंधळ घालत “हात दाखवून अवलक्षण” करून घेतले हे नक्की.आपण तटकरेंना मोठा दणका देतोय असं सेनेला वाटत असलं तरी प्रत्यक्षात तटकरेच सेनेला खळवत होते.तटकरेंच्या या सापळ्यात सेना अडकली आणि रोहयात स्वतःची फजिती करून घेतली. या निकालानं एकमात्र होणार आहे की,अवधूत तटकरेंची झाकली मुठ आता उघड झाली आहे.पुढील काळात सुनील तटकरे उघडपणे आपल्या मुलांना पुढे चाल देतील.शिवाय अवधूत तटकरेंच्या राजकीय भवितव्याचा प्रश्‍नही आता निर्माण होणार आहे.श्रीवर्धनमधून सेनेचे उमेदवार म्हणून अवधूत तटकरे यांच्याकडं पाहिलं जात होतं.संदीप तटकरे यांना मिळालेली मतं बघता भविष्यात सेना अवधूत तटकरेंवर तसा विश्‍वास टाकेल काय ? याबद्दलही प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे.पोटफोडे यांच्या विजयानं राष्ट्रवादीची जरूर लाज राखली गेली असली संमीर शेडगे यांचा पराभव रोहेकरांच्या जिव्हारी लागणारा आहे.कारण एक प्रामाणिक,आणि उमद्या नगराध्यक्षाला रोहेकर मुकले आहेत।  समीर शेडगेच्या रूपानं एक मोठं आव्हान तटकरेंसमोर असल्याने ते पुढील काळात समीर यांना प्रत्येक ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील.तटकरेंचा हा संभाव्य विरोध लक्षात घेऊनच समीर यांना आपली राजकीय दिशा ठरवावी लागेल.रोह्या प्रमाणंच श्रीवर्धनची निवडणूकही तटकरेंसाठी महत्वाची होती.कारण तो त्यांचा विधानसभेचा मतदार संघ आहे.मात्र ही निवडणूक त्यानी सहज जिंकली. त्यांना तिकडे फारसा विरोध झालाच नाही.मतदार सेनेबरोबर आणि नेते मात्र ‘शेजारी डोकावताहेत’ अशी स्थिती तिकडे वारंवार दिसते.त्याचा फटका या पक्षाला सातत्यानं बसतो आहे.

 अलिबागवर पुन्हा लाल बावटा फडकणार हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्याची गरज नव्हती.गेली 30 वर्षे सत्तेत असलेल्या या पक्षानं पुन्हा एकदा एक हाती सत्ता घेतली आहे.शेकापच्या या यशात प्रशांत नाईक यांची लोकप्रियता जेवढी काऱणीभूत आहे तेवढंच विरोधकांचंही शेकापच्या यशात योगदान आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरता कामा नये.याचं कारण असं की,मोठ मोठ्या बढाया मारणारे विरोधक वारंवार तोंडावर आपटले तरी सुधरत नाहीत.अगोदर एकत्र येण्याच्या गोष्टी करतात ऐनवेळी सवते सुभे घेऊन उभे राहतात.विरोधी पक्षातलं हे मतविभाजन ही शेकापची मोठी ताकद आहे.विरोधकांनी एकत्र येता कामा नये असी खेळी शेकाप दरवेळी करते आणि त्यात शेकाप नेतृत्व यशस्वी ठरते.यावेळेसही असंच झालं.आपल्या शक्तीचा अंदाज न घेता सर्वांनी सवतेसुभे उबे केले.शेकापला हवं ते घडलं आणि पुन्हा एकदा अलिबाग शेकापच्या ताब्यात गेले. या निकालानं अलिबागमध्ये विरोधक शिल्लकच नसल्यानं शेकापला कोणी पराभूत करू शकत नाही हा संदेश गेला आहे.कथित विरोधी पक्षांसाठी तो कायमचा अडचणीचा ठरणार आहे.शेकापचा अलिबागमधील विजय वादातीत असला तरी इतरत्र मात्र पक्षाची साफ निराशा झाली आहे.गेली अनेक वर्षे सुनील तटकरेंच्या विरोधात लढा देणार्‍या शेकापला सुनील तटकरेंबरोबरची आघाडी महागात पडणार आहे असं भाकित काही निरिक्षकांनी व्यक्त केलं होतं.ते खरं ठरतंय.अलिबाग जिंकल्यांचा आनंद जरूर शेकापला असेल पण अन्यत्र पक्ष निष्प्रभ होताना दिसतो आहे.आघाडीच्या  खेळीनं पक्ष दहा वर्षे मागं गेला हे नक्की.कारण आघाडीमुळं अनेक ठिकाणी पक्षाला उमेदवारच देता आले नव्हते.त्यामुळं नगरसेवकांच्या क्रमवारीत पक्ष चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे,

सुनील तटकरे यांच्याबरोबरची आघाडी या पक्षाला कोठेही तारू शकली नाही.रोहा,मुरूड,खोपोली  आणि श्रीवर्धमध्ये जे कार्यकर्ते वर्षानुवर्षे कॉ्रगेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढत होते त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही सुनील तटकरेंना मदत करा असं सांगितलं गेल्यानं कार्यकर्त्यांत एक निराशा आली.त्यातून मुरूड,खोपोलीतल्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला.त्याचा फटका पक्षाला बसला.जिल्हा परिषदेला आणि नंतर येणार्‍या विधानसभेलाही पक्षाला सावरणे कठीण जाणार आहे.त्यामुळं शेकापला ही आघाडी महागात पडली आणि पडणार हे नक्की.यावर जयंत पाटील असं म्हणू शकतात की,केवळ अलिबाग नगरपालिकाच आमच्याकडं होती ती यावेळी पुर्वीपेक्षा दणक्यात जिंकली,मग नुकसान कसलं.हे खरंय पण जिल्हयात काही ठिकाणी पक्षाला खातंही उघडता आलेलं नाही तर काही ठिकाणी चुकून एखादं-दुसरा नगरसेवक विजयी झाला आहे.शिवाय आघाडीमुळं भविष्यात आपली अशीच फरफट होणार हा संदेश कार्यकर्त्यांना गेल्यानं तो फटकाही मोठा बसणार आहे.कधी शिवसेनेशी युती कर तर कधी राष्ट्रवादीबरोबर आघाडी कर असा राजकारणात तात्कालिक लाभ पक्षाला जरूर मिळाले पण दूरचा विचार करता पक्षाचं मोठं नुकसान झालं। पक्षाचं नेतृत्व रायगडच्या हाती असतानाही पक्ष जिल्ह्यात  अलिबागपुरता राहिला आहे असं म्हटलं तर नेते भडकतात पण वास्तव स्वीकारावच लागेल.

निवडणुकीत शिवसेना नक्कीच फायद्यात राहिली.दोन नगरपालिका तर पक्षाला मिळाल्याच त्याचबरोबर सर्वाधिक नगरसेवक असलेला पक्ष म्हणूनही शिवसेना यशस्वी झाली आहे.शिवसेच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी झालेली असतानाही मतदारांनी सेनेला कौल दिला हे महत्वाचे आहे.त्यामुळं रायगडमध्ये कधी काळी राष्ट्रवादी विरोधात अन्य पक्ष अशी स्थिती होती.आता शिवसेना विरोधात अन्य पक्ष अशी स्थिती आहे. सेनेला  नगरपालिकेत मिळालेल्या या यशाचा प्रभाव जिल्हा परिषदेत  नक्की दिसणार आहे.भाजपचा जिल्हयात फारसा प्रभाव नसला तरी उरणमध्ये भाजपची सत्ता आली आहे..भाजपचे जिल्हयात एकूण 23 नगरसेवक निवडून आले आहेत.हे नक्कीच चांगले यश म्हणावे लागेल.पनवेल -उरण आता भाजपच्या हाती आले आहे.जिल्हयात कॉग्रेसला पेण अणि  महाडने जिवदान दिले आहे.तेथे  माणिक जगताप यांनी विजयश्री खेचून आणली आहे.शिवसेनेचा तेथे झालेला पराभव सेनेचे आमदार भरत गोगावले यांच्यासाठी अडचणीचा ठरणारा आहे.त्यांचे पक्षांतर्गत विरोधक यातून जास्त सक्रीय होतील. आज राज्यात सर्वत्र कॉग्रेसची दारूण पीछेहाट होत असताना रायगडमध्ये पक्षाला दोन नगरपालिका ,तब्बल 27 नगरसेवक मिळाले आहेत.खाली सिधुदुर्गात कॉग्रेसची स्थिती जशी सुधारली तशीच रायगडमध्येही पक्षाने चांगली कामगिरी केली.हा पक्ष जिल्हयात स्वतंत्रपणे लढला तर नक्कीच चांगले यश मिळवू शकतो. कधी काळी कॉग्रेस हा जिल्हयातील शक्तीशाली पक्ष होता.आज पक्षाला ती ताकद राहिली नाही.तटकरेंचीही ताकद घटली आहे.त्यामुळं कॉग्रेस,शेकाप आणि राष्ट्रवादी हे समदुःखी पक्ष पुढील काळात एकत्र येत शिवसेनेच्या आव्हानाचा मुकाबला करतील असं म्हणता येईल.इथं एक गोष्ट महत्वाची आहे की,जिल्हयातून कॉग्रेसला टकमक टोक दाखविण्याचे काम बर्‍याच प्रमाणात राष्ट्रवादीने केले.तोच राष्ट्रवादी पक्ष आता कॉग्रेसची मदत घेऊन बेरजेचं राजकारण करणार आहे.अर्थात त्याना त्याशिवाय पर्यायही नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here