रायगडकर पत्रकारांचे ‘लाखमोला’चे कार्य
दिवंगत पत्रकार अमोल जंगमच्या
कुटुंबियांना एक लाखाची मदत
अमोल जंगम.रायगड जिल्हयातील म्हसळा येथील तरूण पत्रकार.वय अवघं 32.हे काय जाण्याचं वय झालं? मात्र तो अचानक गेला.सारं कुटुंब रस्त्यावर आलं.पत्नी समोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला.जंगम हा आमच्या प्रत्येक चळवळीतला शिलेदार.धडाकेबाज आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार असा लौकीक असलेला.त्याच्या जाण्यानं स्वाभाविकपणे सारेच दुःखात बुडाले.पण केवळ शोक व्यक्त करणं,शोकसभा घेऊन नक्राश्रू गाळल्यानं अमोल जंगमच्या कुटुंबाचं दुःख आणि समोरचे प्रश्न कमी होणारे नव्हते.नेहमी प्रमाणं रायगडचे सारे पत्रकार एकवटले.कोणी 500 दिले.कोणी 1000 दिले तर कोणी 5000 .बाहेरूनही काही पत्रकार मित्रांनी मदत केली.अशा प्रसंगी जिल्हयातील सारे पत्रकार आपसातील मतभेद विसरतात,संघटनाभेद बाजुला ठेवतात आणि पत्रकारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे येतात.प्रकाश काटदरे गेले तेव्हा हेच दिसलं.अमोल जंगमच्या निधनानंतरही पत्रकारांमधील हीच एकजूट पुन्हा एकदा दिसली.थेट एक लाखावर रक्कम जमली.मी परिषदेच्यावतीने काही रक्कम जाहीर केली.मी या सर्वात निमित्तमात्र होतो.मात्र रायगडच्या पत्रकारांनी हा जो पायंडा पाडला आहे तो पत्रकारांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष कऱणार्या सरकारला सणसणीत थप्पड लगावणारा आहे.मला वाटतं पत्रकार संघटनांचं काम काय गरजू पण प्रामाणिक पत्रकारांच्या किंवा त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी उभं राहणं.तुम्ही एकटे नाही आहात सार्या महाराष्ट्रातील पत्रकार तुमच्या पाठिशी आहेत हा विश्वास देणं हे आहे .ते काम रायगडच्या पत्रकारांनी केलं आहे.जे खरे पत्रकार आहेत त्यांना सरकारी मदत मिळत नाही.सरकारी मदत मिळले केवळ राज्यातील सात-आठ टक्के पत्रकारांना म्हणजे अधिस्वीकृतीधारकांना .जंगम जवळ अधिस्वीकृती नव्हती तरी तो पत्रकार होता आणि हाडाचा पत्रकार होता.सरकारच्या मदतीची कोणतीही अपेक्षा न ठेवता रायगडच्या पत्रकारांनी एकत्र येत जो आदर्श घालून दिलाय तो अनुकरणीय आहे.यापुर्वी सातारा,पुणे,नगर आणि अन्य काही जिल्हयातील पत्रकारांनी गरजू पत्रकारांना अशीच मदत केलेली आहे.यापुढेही कोणताही पत्रकार अडचणीत आला तर आपण सारे त्याच्या पाठिशी उभे राहणार आहोत.मराठी पत्रकार परिषदेने हे मिशन म्हणूनच काम हाती घेतले आहे.गेल्या वर्षभऱात अशा 19 गरजू पत्रकारांना आपण मदत करू शकलो याचा आनंद नक्कीच आम्हाला आहे.राज्यातील पत्रकारांनी यापुढंही आपलं काम निर्धारानं,निर्भयपणं करावं.मराठी पत्रकार परिषद आणि आम्ही सारे तुमच्या पाठिशी आहोत.रायगडच्या पत्रकारांनी एका पत्रकाराच्या कुटुंबाला जो आधार दिला त्याबद्दल मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि व्यक्तीगत माझ्यावतीने जिल्हयातील तमाम पत्रकारांचे मनःपूर्वक आभार
—————————————————————————————–
रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे यांची खालील पोस्ट आहे.त्यांनी माझ्यामुळं हे शक्य झाल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.मात्र ते खरं नाही.मी निमित्तमात्र आहे.मदत करण्याचे आवाहन मी जरूर केलं मात्र संतोष पेरणे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आणि आपल्या पत्रकार बांधवाच्या कुटुंबाला आधार आणि विश्वास दिला.संतोष तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार.
एसएम सरांची एक हाक ‘लाखमोलाची’
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील तरुण पत्रकार 32 वर्षीय अमोल जंगम यांचे हृदयविकाराच्या धक्य्याने निधन झाले. म्हसळा तालुक्यातील डॅशिंग आणि सामाजिक भान ठेवून पत्रकारिता करणारा पत्रकार म्हणून त्यांनी समाजात आपला ठसा उमटविला होता. रायगड प्रेस क्लब या मा. एस एम देशमुख साहेब यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे ते म्हसळा तालुका युनिटचे अध्यक्ष होते.आर्थिक कोंडीत सापडले असताना देखील त्यांनी आपल्या कामात कधीही ती बाब समोर येऊ दिली नाही.पण काळजी घेतली नाही की घात होतो याचा अनुभव आज जंगम कुटुंब घेत आहे.16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अमोल हृदयविकाराच्या धक्क्याने आपल्याला सोडून गेला.हि घटना रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसाठी धक्कादायक अशीच होती.
या धक्क्यातून जसे पत्रकार हादरून गेले,त्यावेळी जंगम कुटुंबासाठी तर दुःखाचा डोंगर कोसळणारी घटना असल्याने त्यांना सावरण्यासाठी मा. देशमुख साहेब यांनी सूचना केली आणि दिवंगत अमोल जंगम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा ओघ निर्माण झाला.विद्यमान पदाधिकारी यांच्यासह संतोष पवार,मिलिंद अष्टीवकर, दीपक शिंदे,अभय आपटे, विजय पवार यांनी आवाहन केल्यानंतर आठवड्यात लाखाची मदत उभी राहिली. त्यात जिल्ह्याबाहेरील मराठी पत्रकार परिषद,बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्यासह कर्जत प्रेस क्लब, खालापूर प्रेस क्लब, माणगाव प्रेस क्लब,अलिबाग मधील पत्रकार, श्रीवर्धन प्रेस क्लब, रोहा प्रेस क्लब,रसायनी प्रेस क्लब,माथेरान प्रेस क्लब,महाड प्रेस असोसिएशन,पेण प्रेस क्लब, म्हसळा प्रेस क्लब,पनवेल प्रेस क्लब, उरण प्रेस क्लब,तळा प्रेस क्लब,नागोठणे पत्रकार संघ, यांनी मदत संकलित करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. त्याचवेळी म्हसळा येथील अनेक दात्यांनी आपली मदत देऊ केली आहे.आपल्या संघटनेतील धर्मानंद गायकवाड, राजेंद्र जाधव,प्रवीण जाधव,यांनी आपल्या सहकार्याचे कुटुंब उभे राहावे यासाठी आर्थिक हातभार लावला आहे.
लाख रुपयांपेक्षा जास्त जमा झालेली मदत आज 1 मार्च रोजी एकत्रित करण्यात आली. त्यातील काही रोख रक्कम दिवंगत पत्रकार सहकारी अमोल जंगम यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली.आणखी काही मदत येत असल्याने एका मोठ्या रकमेबद्दल राज्याला आदर्शवत ठरेल असा निर्णय मा. देशमुख साहेब यांच्याशी चर्चा करून अविनाश अमोल जंगम या 5 वर्षाच्या मुलाच्या नावे एफडी काढण्याचा निर्णय म्हसळा येथे आज घेण्यात आला. गोळा झालेले धनादेश आणि रोख रक्कम प्रथम म्हसळा प्रेस क्लबच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल आणि गोळा होणारी एकत्रित रकमेची एफडी काढली जाणार आहे. एफडी रक्कम देखील लाखभर असणार आहे. एसएम सरांची हाक हि रायगड प्रेस क्लबच्या वाटचालीत नेहमीच लाखमोलाची ठरली आहे. त्यांची अमोल जंगम यांच्यासाठीची हाक देखील अल्पावधीत लाखमोलाची बनली आहे.
म्हसळा येथे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव विजय मोकल, खजिनदार अनिल भोळे, जिल्हा संघटक विजय गिरी,यांच्यासह
म्हसळा येथील जेष्ठ सहकारी उदय कळस, अशोक काते, तरुण सहकारी निकेश कोकचा, अंकुश गाणेकर, महेश पवार,आदींसह अनेक सहकारी उपस्थित होते. जिल्ह्यातून माणगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रवीण गोरेगावकर,कार्यध्यक्ष पद्माकर उभारे,श्रीवर्धन प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रसाद नाझरे, तसेच भारत चोगले, संजय मांजरेकर,प्रशांत पोतदार,रसायनी प्रेस क्लबचे अध्यक्ष नागेश कदम,तसेच बी एस कुलकर्णी,
तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष कृष्णा भोसले, तसेच संजय रिकामे, माथेरान प्रेस क्लबचे कार्यध्यक्ष दत्तात्रय शिंदे,कर्जत प्रेस क्लबचे खजिनदार गणेश पवार,यांच्यासह जिल्ह्यातील अनेक सहकारी उपस्थित होते.म्हसळा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती पाटील,नाझीम हसवारे यांची देखील उपस्थिती होती.