रत्नागिरी,कोल्हापूर,बेळगाव पुन्हा परिषदेच्या छत्राखाली

0
692

रत्नागिरी,कोल्हापूर,बेळगाव पुन्हा परिषदेच्या छत्राखाली

रत्नागिरी,कोल्हापूर आणि बेळगाव हे तीन जिल्हे मराठी पत्रकार परिषदेशी पहिल्यापासूनच जोडलेले होते.मात्र काही ठिकाणी पदाधिकारी संस्थानिक बनले,काही ठिकाणी संपर्क तुटत गेला तर काही ठिकाणी पदाधिकार्‍यांच्या अडचणीमुळे संघटनेचं काम ढेपाळलं.त्यामुळं या तीनही जिल्हयात परिषदेचं काम थंडावलं होतं.मात्र आता हे तीनही जिल्हे नव्याने परिषदेशी जोडले गेले असून तीनही जिल्हे सक्रीय झाले आहेत.

आमच्या कोकण दौर्‍यात रत्नागिरीतील पत्रकारांची दापोली येथे बैठक घेतली.जवळपास दीडशे पत्रकार उपस्थित होते.या वेळी रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून चिपळूणचे धडाडीचे पत्रकार सुभाष कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.हेमंत वणजू हे कार्याध्यक्ष निवडले गेले.सारा जिल्हा आता परिषदेच्या छत्राखाली एकवटला असून तरूण पत्रकारांची चांगली टीम रत्नागिरीत तयार झाली आहे.हे सारं होण्यासाठी किरण नाईक,मिलिंद अष्टीवकर,धनश्री पालांडे यांनी विशेष प्रयत्न केले.

कोल्हापूरची अवस्था थोडी अशीच होती.काही पदाधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या,काही निवृत्त झाले.त्यामुळे गेली सात-आठ वर्षे पत्रकार संघ मृतावस्थेत होता.काल आम्ही जिल्हयातील पत्रकारांची बैठक घेऊन चारूदत्त जोशी यांची कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.जोशी पुढील महिन्याभरात  सदस्य नोंदणी करतील आणि नवी कार्यकारिणी निवडतील.त्यामुळे कोल्हापूरमध्ये देखील आता परिषद सक्रीय झालेली आहे.कोल्हापूरचे युनिट सुरू होण्यासाठी विभागीय सचिव समीर देशपांडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

बेळगावची स्थिती अशीच आहे.बेळगावला आचार्य अत्रे अध्यक्ष असताना 1950 मध्ये अधिवेशन झाले होते.त्यानंतर 1979 ला देखील अधिवेशन झाले होते.मात्र अलिकडे गेली दहा-बारा वर्षे बेळगावच्या मंडळीशी परिषदेचा संपर्क राहिला नव्हता.त्यामुळं बेळगावच्या पदाधिकार्‍यांना आम्ही कोल्हापूरला बोलावून त्यांना पुन्हा एकदा परिषदेबरोबर येण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली.काल बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर,सुहास हुद्दार,सदानंद सामंत,प्रकाश माने ही मंडळी आम्हाला भेटली.त्यांचे काही प्रश्‍न आहेत.त्यावरही चर्चा झाली.बेळगावची जबाबदारी समीर देशपांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्यामुळं हे युनिटही आता नव्याने परिषदेबरोबर आले आहे.गेल्या दोन महिन्यात पालघर,रत्नागिरी,कोल्हापूर आणि बेळगाव परिषदेबरोबर आलेले आहेत.पत्रकार एकत्र येत आहेत,एकत्र आले पाहिजे अशी जाणीव त्यांच्यात निर्माण होत आहे ही गोष्ट माझ्यासाठी लाख मोलाची आहे.रत्नागिरी,पालघर,कोल्हापूर,आणि बेळगावच्या पत्रकारांचे मनापासून आभार.आणि परिषदेच्या कुटुंबात नव्यानं स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here