पत्रकारांनाही विदर्भाच्या गुचक्या…

0
811

 स्वतंत्र विदर्भावरून पत्रकारात दोन गट 

दिल्लीत श्रीहरी अणे यांच्यावर शाईफेक नाट्य चर्चेत असतानाच इकडं मुंबईत काही विदर्भवादी पत्रकारांनी एकत्र येत अणे यांनी नव्याने सुरू केलेली स्वतंत्र विदर्भाची लढाई पुढे कशी न्यायची यावर काल एकत्र येत खलबतं केली.या बैठकीला काही सरकारी समित्यांचे सदस्य आणि अध्यक्षही उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे.विदर्भवादी पत्रकारांनी अशी बैठक घेतल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली.त्यावर स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली.संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता असलेल्या एका पत्रकाराने मग व्हॉटसअ‍ॅपवर पोस्ट फिरविली.त्यात म्हटले आहे की,’अणे सरकारी पदावर असताना वेगळ्या विदर्भाची भाषा बोलतात म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला,म्हणजे त्यांनी विदर्भासाठी पद सोडले.आता काही पत्रकार वेगळ्या विदर्भासाठी बैठका घेत आहेत.अशा विदर्भवादी पत्रकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या सरकारी समित्यावर राहावे की विदर्भ प्रेमापोटी या समित्यांचा त्याग करावा?  पद सोडा अथवा न सोडा पण चर्चा तर झालीच पाहिजे”

 या पोस्टवर मग स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणार्‍या एका पत्रकाराने दुसरी पोस्ट टाकली .त्यात तो म्हणतो,”पत्रकार समित्या ही सरकारी नोकरी नाही.हाच तर्क पुढे न्यायचा असेल तर सरकारी समित्यांवर असलेल्यांनी सरकारच्या विरोधात लिहू नये असेही म्हटले जाईल.संयुक्त महाराष्ट्राचे नेतृत्व विदर्भवादी फडणवीस करू शकतात तर विदर्भवादी पत्रकारांनी ते का करू नये आज कॉग्रेसला शिव्या घालणारे अनेक पत्रकार कॉग्रेस सरकारच्या विविध समित्यांवर होते.वैचारिक भूमिका आणि पत्रकारिता वेगवेगळे विषय आहेत असे मला वाटते.मी स्वतः कोणत्याही समितीवर नसल्याने जे आहेत त्यांनी निर्णय घ्यावा “.

आम्हाला काय वाटते ?

महाराष्ट्र तोडण्याची भूमिका कोणी आणि का घ्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.लोकशाहीत हे विचार स्वातंत्र्य आपण मान्य केले पाहिजे.,देवेंद्र फडणवीस यांची भूमिकाही छोट्या राज्यांना पुरक अशीच आहे.मात्र त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ‘स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे’ असं मत किमान जाहीररित्या तरी व्यक्त केलेलं नाही. मुख्यमंत्री असे पर्यंत ते तसं मत व्यक्तही करू शकत नाहीत. .म्हणजे पदाची प्रतिष्ठा जपत आहेत .श्रीहरी अणे यांनी ते भान ठेवले नाही म्हणून त्यांना पद सोडावे लागले.या दोन्ही घटनांचा अर्थ असा होतो की,कोणी नोकरी करीत असो ,किंवा कोणी मुख्यमंत्री अथवा समित्यांचे प्रमुख किंवा सदस्य असोत ते त्या पदावर असे पर्यंन्त महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू शकत नाहीत किंवा संकेत म्हणून त्यांनी ती करू नये.विचार स्वातंत्र्याचा फारच उमाळा आला असेल तर मग सरळ आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग स्वतंत्र विदर्भासाठीच्या लढ्याचं नेतृत्वही करावं कुणाची हरकत असण्याचं कारण नाही.

राज्यातील पत्रकारांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष केला आहे.मराठी पत्रकार परिषदेने दिनू रणदिवे यांचा नुकताच सत्कार केला त्यांनीही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आहे.हा इतिहास ज्या पत्रकारांना माहिती आहे ते पत्रकार तरी महाराष्ट्र तोडण्याच्या चळवळीचे समर्थन करू शकणार नाहीत.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी पत्रकार परिषदेचेही मोठे योगदान आहे.परिषदेचे बहुसंख्य अध्यक्ष संयुक्त महाराष्ट्रवादीच होते.आजही व्यक्तिगतरित्या माझी भूमिका तीच आहे.स्वतंत्र विदर्भाची मागणी ही मुठभरांची मागणी असून आम जनतेचा या मागणीस पाठिंबा नाही हे वारंवार पुढं आलेलं आहे.

एस एम देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here