नवी दिल्ली – पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपतर्फे खास पत्रकारांसाठी आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात सहभाग घेतला. अर्थात त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे नेहमीप्रमाणे टाळले. बिहार निवडणुकीनंतर, अहंकारी मोदींचा करिष्मा संपला, मोदी लाट पुरती ओसरली, मोदी सरकारच्या काळात देशात किती ही असहिष्णुता वाढलेय, वगैरे विलापयुक्त कंठशोष करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींमध्येच मोदींबरोबर “सेल्फी‘ काढण्यासाठी प्रचंड गर्दीच नव्हे, तर अक्षरशः रेटारेटी झाली…. इतकी रेटारेटी सहन करणे ही प्रधानमंत्र्यांची व त्यांच्या सुरक्षायंत्रणेचीही “सहिष्णुता‘च नव्हे का? अशी उपरोधिक प्रतिक्रिया नंतर व्यक्त झाली.
मोदी यांनी सलग दुसऱ्या वर्षी पत्रकारांसाठी दिवाळीच्या कार्यक्रमात भाग घेतला व संवादही साधला. अर्थात मोदी यांच्या पद्धतीप्रमाणे हा पूर्ण एकतर्फी संवाद होता व पंतप्रधानांना प्रश्न विचारायला सक्त मनाई केली गेली. भाजपच्या माध्यम विभागाने खरे तर दिवाळीनंतर लगेचच हा दीपावली मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, मोदी नेहमीप्रमाणे विदेशाच्या दौऱ्यावर असल्याने हा कार्यक्रम झाला नव्हता. स्वतः मोदींनीही, दिवाळीनंतर हा कार्यक्रम झाला असता तर जास्त चांगले झाले असते असे सांगितले. भाजप मुख्यालयाशेजारी, 9-अशोक रस्ता येथे झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अरुण जेटली, नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, स्मृती इराणी, रविशंकर प्रसाद हे मंत्री, माध्यम विभाग प्रमुख श्रीकांत शर्मा व शाहनवाज हुसेनसह भाजपचे सारे राष्ट्रीय प्रवक्ते हजर होते.
आजच्या कार्यक्रमात प्रसिद्ध संपादक, ज्येष्ठ प्रतिनिधी, वार्ताहर आदी देशभरातील प्रमुख वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार सहभागी झाले होते. मोदी यांनी सुरवातीला बोलताना सांगितले, की आमचे सण-उत्सव समाजात गती, उमंग व उत्साह प्रदान करतात. उत्सवांचे सामाजिक-आर्थिक विश्लेषण झाले तर किती चांगल्या बातम्या निघतील हे सांगताना मोदींनी कुंभमेळ्याचे उदाहरण दिले. या मेळ्यासाठी गंगाकिनारी जेवढे भाविक जमतात ती संख्या युरोपातील एका देशाच्या लोकसंख्येइतकी असते. यामुळेच समाजात चेतना जागविण्यासाठी पूर्वजांनी सण व उत्सवांची निर्मिती केली, असेही मोदी म्हणाले.