मॅग्रोजची वाढ होत असेल तर ते चांगले की वाईट?,सामांन्य माणूस आणि पर्यावरण प्रेमी याचं स्वागतच करतील.कारण मॅग्रोजची बेकायदा कत्तल होत असल्यामुळे पर्यावरण धोक्यात आलंय आणि समुद्राची देखील नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू आहे.त्यामुळे मॅग्रोज वाचवा अशीच हाक पर्यावरण प्रेमी देत आहेत.रायगडमधील एका आमदाराला मात्र हे मान्य नाही.रायगड जिल्हयातील खारेपाट भागात मोठ्या प्रमाणात मॅग्रोजची वाढ झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा दावा या आमदार महोदयांनी थेट सभागृहातच केला आहे.समुद्राच्या भरतीमुळे मॅग्रोजचे बी शेतीमध्ये सर्वत्र पसरते आणि त्यामुळे मॅग्रोजची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन भातशेती नष्ट होते ( मॅग्रोजमुळे भातशेती नष्ट होत असल्याची तक्रार कोणीही केलेली नाही.) एवढेच नव्हे तर मॅग्रोजमुळे रानडुकराचा प्रादुर्भाव होऊन शेतकर्यांना त्रास होतो असा जावईशोध आमदार महोदयांनी लावला आहे.आता म्हणे 10 जानेवारीला त्यावर बैठक होत आहे. या बैठकीत “मॅग्रोजची वाढ रोखण्याबरोबरच आहेत त्या मॅग्रोजची कत्तल करा” असा निर्णय झाला नाही म्हणजे मिळविली. मॅग्रोजचे महत्व किमान समुद्राच्या काठावर वास्तव्य करून असणारे आणि पर्यावरण प्रेमी यांना नव्याने सांगण्याची गरज नाही.संरक्षक भिंत म्हणूनच मॅग्रोजची भूमिका असते.मात्र हे मॅग्रोज तोडून तेथील जमिनी ताब्यात घेण्याचा खटाटोप सर्वत्र सुरू आहे.अशा स्थितीत रायगडमधील खारेपाट भागात मॅग्रोज वाढत असेल तर त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याची वाढ रोखा असं जर कोणी सागत असेल तर त्याच्या हेतूबद्दलच संशय येतो.बर्याचदा लोकप्रतिनिधी व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा विशिष्ट गटाच्या हितासाठी लोकविरोधी भूमिका घेताना दिसतात.मॅग्रोजच्या बाबतीत असंच होताना दिसतंय त्याला विरोध झाला पाहिजे.
रायगडमधील शेतकर्याची हजारो एकर शेती समुद्राचं पाणी शेतीत घुसल्याने नापीक किंवा खारलॅन्ड झाली आहे.पुर्वी समुद्राचं पाणी शेतीत येऊ नये यासाठी गाव एकत्र येऊन बाधबंधिस्ती करीत. त्याला हाळीची पध्दत म्हटलं जायचं.म्हणजे कुठं खांड पडली की,सारं गाव एकत्र येऊन ती खांड किंवा बांध भरून काढायचे. खारलॅन्ड हा विभाग सुरू झाल्यापासून हे काम या विभागाचं आहे असं समजून गावकीनं या कामाकडं दुर्लक्ष करायला सुरूवात केली .परंतू गावकी काही करीत नाही आणि खारभूमी विभागाकडं निधी नाही अशा स्थितीमुळे हजारो एकर जमिन खारलॅन्ड झाली आहे. ती वाचविण्यासाठी रायगडमधील एकही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरत नाही,किंवा जनआंदोलनाच्या माध्यमातून समुद्राचं पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करीत नाही.एकट्या रायगडमध्ये 32 हजार हेक्टर खारलॅन्ड आहे आणि दरवर्षी त्यात वाढ होत आहे.त्यामुळे हे संकंट किती गहिरे आहे याचा आपण अंदाज करू शकतो.मॅग्रोज समुद्राचं पाणी सुपीक जमिनीत येण्यापासून,जमिन खारलॅन्ड होण्यापासून रोखतात असं आपल्याला सांगितलं जातं. एवढंच नव्हे तर सुनामी किंवा अन्य कारणांनी उसळणार्या लाटा रोखण्याचं किंवा त्यांची तीव्रता कमी करण्याचं काम हे मॅग्रोजच करतात असं अनेक प्रसंगी दिसून आलेलं आहे.त्यामुळं मॅग्रोज वाढली पाहिजेत आणि त्याची होणारी कत्तलही रोखली पाहिजे असेच प्रयत्न जगभर सुरू आहेत..इथं तर मॅग्रोजमुळं जमिन खारलॅन्ड होते असा तर्क लढविला जात आहे.वास्तवाला छेद देणार्या या तर्कामागे नक्कीच काही तरी काळेबेरे आहे. मॅग्रोजची वाढ रोखा अशी मागणी होत असल्याने खारेपाटातील जमिनीवर तर कोणाचा डोळा नाही ना अशी रास्त शंका घेता येऊ शकते.जनतेने अशा मागण्यांपासून सावध राहिले पाहिजे.