मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

0
3470

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची उदासिनता यामुळे एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पत्रकारांनी महामार्ग चौपदरीकरणासाठी सतत पाच वर्षे आंदोलनं केली.. फलस्वरूप पनवेल ते इंदापूर या पहिल्या टपपयास २००७ मध्ये मान्यता मिळाली.. २०१०मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले.. बारा वर्षे झाली तरी ८१ किलो मिटरचं ८० टक्केच काम पूर्ण झालंय एवढंच सरकार सांगतंय.. इंदापूर ते झारप या टप्प्याच्या कामाचं असंच रडगाणं सुरू आहे..
एन. एच. ६६ म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? माहिती नाही.. यापुर्वी सरकारने सहा वेळा वायदे केले.. ते पूर्ण झाले नाहीत.. या संदर्भात सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस नॅशनल हाय वे अॅथोरिटीने मार्च २०२२ मध्ये महामार्गाचं काम पूर्ण होईल असं न्यायालयाला वचन दिलं.. मात्र जानेवारी२२ मध्ये गोव्यात एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी “२ वर्षात म्हणजे २०२४ ला काम पूर्ण होईल” असं सांगितलं.. कामाची कुर्मगती आणि अनेक पुलांची आणि बोगदयाचं रखडलेली काम बघता २०२४ ला तरी काम पूर्ण होईल का याबद्दल साशंकता आहे.
तब्बल १२ वर्षे झालीत.. का रखडला हा प्रकल्प? नितीन गडकरी यांनी जी कारणं दिलीत ती बघा.. गडकरी म्हणतात,” वन विभागाच्या परवानग्या वेळेत मिळाल्या नाहीत, आणि भूसंपादनही वेळेत न झाल्याने काम रखडलं” ही दोन कारणं असू ही शकतात पण, वारंवार ठेकेदार बदलत गेले, काहींना सरकारने टर्मिनेट केले, काहींनी स्वतः हून कामं सोडली, काही जण न्यायालयात गेले.. परिणामत कामाचा खेळखंडोबा झाला.. हे ही एक महत्वाचं कारण आहेच..
मुंबई – गोवा महामार्ग कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरू शकतो.. मात्र स्थानिक पुढारी या रस्त्याबाबत कायम उदासिन आहेत.. ४७५ हा महामार्ग १२ वर्षे रखडला, कोणत्याच नेत्याला, पक्षाला काही वाटत नाही? कोणी रस्त्यावर उतरत नाही, आंदोलन करीत नाही.. असं का? त्यांना अन्य प्रकल्पात रस आहे.. किनारपट्टीला चिकटून कोकण एक्स्प्रेस वे व्हावा..अशी स्थानिक नेत्यांची इच्छा आहे.. मध्यंतरी तर सरकारने सरकारने ७० हजार कोटींच्या “ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे” ची घोषणा केली.. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारचे चांगलेच कान उपटले.. “मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही नव्या प्रकल्पांना परवानगी देणार नाही” अशी स्पष्ट तंबीच न्यायालयाने दिली.. राज्यकर्ते एनएच ६६ बाबत का उदासिन आहेत? . या संदर्भात हा लढा लढलेले ज्येष्ठ पत्रकार एस. एम देशमुख सांगतात, “किनारपट्टी भागात बहुतेक पुढारयांनी जमिनी खरेदी करून ठेवलेल्या आहेत. अशा स्थितीत या जमिनी जवळून सागरी महामार्ग गेला तर जमिनीला सोनयापेक्षाही जास्त दर येईल.. म्हणून सागरी महामार्गाचं खूळ.. सागरी महामार्गाला आमचा विरोध नाही पण त्याचा फायदा कोकणाला होणार नाही मुंबईहून थेट गोव्याला जाणारया पर्यटकांसाठी तो मार्ग सोयीचा होईल मात्र एनएच ६६ ही कोकणची जीवन वाहिनी आहे.. तेरा तालुके आणि अनेक पर्यटन स्थळं याच मार्गावर असल्याने कोकणच्या विकासाला गती येईल, पर्यटक वाढतील.. म्हणून या मार्गाचे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे”..
काम रखडलयाचे काय परिणाम होत आहेत? कोकणच्या विकासाला खिळ बसली, कोकणातले रस्ते जीवघेणे असल्याची प्रसिध्दी झाल्याने गेल्या काही वर्षात कोकणात येणारया पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली.. अगदी कोकणी माणसाला गावाकडं जायचं झालं तरी ते सातारा, कोल्हापूर मार्गे जातात.. एच एच ६६ वरून जाण्याची हिंमत करीत नाहीत.. त्याचा फटका कोकणी अर्थ व्यवस्थेला बसला.. चिंता वाटावी एवढ्या संख्येनं अपघात वाढले.. रस्त्यावर पडलेला राडा रोडा, गुडघ्याला लागतील एवढे खड्डे, अचानक समोर येणारे डायव्होर्सन आणि ट्रॅफिक जॅममुळे सतत अपघात होत असतात.. .. सरकारनेच न्यायालयात सांगितले की, “गेल्या दहा वर्षात झालेल्या ४५०० अपघातात २५०० निष्पाप पर्यटक किंवा स्थानिकांचे बळी गेले” .. जे कायम जखमी झाले त्यांची संख्या यापेक्षा किती तरी मोठी आहे.. प्रश्न आहे सरकार आणखी किती बळी जाण्याची वाट पहात आहे? नितीन गडकरी यांची प्रतिमा झटपट निर्णय आणि वेगवान काम करणारे मंत्री अशी आहे.. त्यांनी सावित्री नदीवरचा फूल अवध्या तीन महिन्यात बांधण्याचा विक्रम करून आपल्या कामाची चुणूक दाखविली होती.. अनेक महामार्ग त्यांनी निर्धारित वेळेपुर्वी पूर्ण करण्याचा पराक्रम केला.. मात्र मुंबई – गोवा महामार्गाच्या बाबतीत गडकरी देखील हतबल दिसतात.. निधीची कमतरता नाही असे वारंवार सांगितले जाते.. ते खरं असेल तर राजकीय इच्छा शक्तीची कमतरता हेच एकमेव कारण हा प्रकल्प रखडण्यामागं असू शकतं.. कारण पुणे – नाशिक मार्गाचं काम किती तरी उशिरा झालं, असंख्य अडथळे पार करीत ते वेळेत पूर्ण झालं मग कोकणावरच असा अन्याय का? असा संतप्त सवाल पत्रकार मिलिंद अष्टीवकर विचारतात.. “हा महामार्ग लवकर पूर्ण झाला नाही तर पत्रकारांना एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा रस्त्यावर उतरावे असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजनकर यांनी दिलाय” सरकार आमच्यावर ती वेळ येऊ देणार नाही अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त त्यांनी केलीय..

शोभना देशमुख, पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here