गँगस्टर रवी पुजारीचा पत्रकारांनी ‘चिंधी चोर’ असा उल्लेख केल्याने पुजारी भडकल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय. याच कारणामुळे सध्या पुजारीने आपल्या शार्पशूटर्सला मुंबईतील काही पत्रकरांना संपवण्याची सुपारी दिल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच पुजारी टोळीच्या काही गुंडांना अटक करण्यात आली असून मुंबईमध्ये एका पत्रकाराची हत्या करण्यासाठी आल्याची कबूली या गुंडांनी दिली.
पुजारी टोळीच्या गुंडांच्या खुलाश्यानंतर मुंबई पोलिसांनी काही पत्रकारांना सुरक्षा दिली आहे. अंडर्वल्डमध्ये ‘चिंधी चोर’ म्हणजे खूपच खालच्या दर्जाचा असे मानले जाते, यामुळे चिंधी चोर शब्दावरुन अनेकदा तुरुंगांमध्ये रक्त सांडेपर्यंत हाणामा-या झाल्या असल्याची माहिती मारिया यांनी दिली.
काही दिवसापूर्वी चित्रपट निर्माता करीम मोरानी यांच्या जुहूमधील बंगल्याबाहेर पुजारी टोळीच्या गुंडानी गोळीबार केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी ‘चिंधी चोर’ रवी पुजारीच्या गुंडांनी हल्ला केल्याचं म्हटलं होतं. ‘चिंधी चोर’ म्हणून हिणवल्याने भडकलेल्या रवी पुजारीने ‘चिंधी चोर’ लिहीणा-या पत्रकारांना संपवण्याची सुपारी दिली. आधी या धमकीकडे पत्रकारांनी दूर्लक्ष केलं. मात्र, घर तसंच ऑफीसजवळ काही व्यक्ती संशयीत रित्या फिरताना दिसल्याची माहिती संबंधीत पत्रकारांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून त्यांच्याकडून काही पत्रकारांचे फोटोही सापडलेत.
सध्या दाऊद आणि छोटा राजन शांत असल्याने रवी पुजारी आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत जणकारांनी व्यक्त केलं आहे. पत्रकारांच्या सुपा-या देऊन बातम्यांमध्ये राहण्याचा पुजारीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. ( मटावरून साभार )