मिलिंदः रायगडचा’स्टार पत्रकार’

0
958

मिलिंद अष्टीवकरच्या  मुकुटात एका पाठोपाठ एक मानाचे तुरे रोवले जात आहेत.अगोदर अधिस्वीकृती समिती,मग समितीचे विभागीय अध्यक्षपद,नंतर मराठी पत्रकार परिषदेचे “अखिल भारतीय कोषाध्यक्षपद”  आता लोकमतचा “स्टार रिपोर्टर पुरस्कार”या सर्वाचा आनंद तर आहेच शिवाय मिलिंदचा मला अभिमानही वाटतो.कारण त्याचं सारं करिअर माझ्यासमोर घडलंय.परिस्थितीशी चार हात करीत आणि येणार्‍या संकटावर मात करीत मिलिंदनं हा टप्पा गाठला आहे.स्वाभिमानी स्वभाव,व्यवस्थेशी चार हात करायची धमक  आणि अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची मानसिकता असल्यानं त्याची ही वाटचाल सोपी नव्हती .  खडतर होती पण निर्धार आणि कामांवरील  निष्ठा या बळावर त्याला हे यश मिळविता आलं.मिलिंद हा चांगला संघटक आहे.त्यामुळं रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकाराचं एक  भक्कम  संघटन त्यानं रायगडात उभं केलं आहे.रायगड प्रेस क्लब आज केवळ पत्रकारांची संघटना राहिली नसून ती एक सामाजिक चळवळ झालेली आहे.यामध्ये मिलिंदचा मोठा वाटा आहे हे नाकारता येणार नाही.स्वतः सामांन्य वर्गातून पुढं आलेला असल्यानं सामांन्यांच्याबद्दल वाटणार्‍या तळमळीतून लोकोपयोगी अनेक कामं त्यांनी हाती घेतली आणि अनेकांना आधारही दिला.स्वतः प्रसिध्दीपासून अलिप्त राहणारा मिलिंद फोटो,स्टेज म्हटलं तरी पळ काढतो.मग त्याला शोधून फोटोत घ्यावं लागतं किंवा स्टेजवर बसवावं लागतं. .स्वतः पडद्याआड राहून इतरांवर फोकस पडेल याची काळजी घेणारी माणसं आज दुर्मिळ आहेत.मिलिंद अशा पैकी एक आहे.प्रसिध्दीपासून दूर राहणार्‍या मिलिंदच्या निष्ठा अविचल असतात.हल्ली माणसं वारं येईल तसं बदलतात.निष्ठा हा शब्दही टिंगलेचा विषय झालेला आहे.माणसं शर्ट बदलावा अशा तर्‍हेनं आपल्या निष्ठा बदलतात. .मिलिंदच्या निष्ठा मात्र अढळ असतात.त्यानं एखाद्याला आपलं म्हटलं की मग तो क ायमसाठी त्याच्याबरोबर असतो. मिलिंदच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हाती घेतलेलं काम तो निर्धारानं पुर्ण करतो.त्यामुळं मिलिंदवर एखादी जबाबदारी सोपविली की,निश्‍चित व्हायला हरकत नसते..याचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे.

                              भ्रमंतीची प्रचंड आवड असलेला मिलिंद सारखा भारतभर फिरत असतो.पण त्यामुळं व्यवसाय आणि पत्रकारिता याकडे त्यानं कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही.त्यामुळंच तो विविध पुरस्कारांचा तसेच पदांचा मानकरी ठरला आहे.आता परिषदेचा कोषाध्यक्ष म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे.परिषदेचा कोष खालीच आहे.तो जमा करायचा आणि त्याचा चोख हिशोब ठेवायचा ही दोन्ही कामं फार महत्वाची आहेत.मात्र मला खात्रीय की,मिलिंद ही दोन्ही कामं निर्धारपूर्वक पार पाडणार आहे.पुढील वाटचाल करताना एका गोष्टीची मात्र त्याला काळजी घ्यावी लागेल.तो स्वतः प्रामाणिक असल्यानं समोरचा व्यक्तीही आपल्यासारखाच प्रामाणिक आहे असं त्याला वाटतं.त्यातून तो लगेच कुणावरही विश्‍वास ठेवतो.त्याचा अनेकदा फटका मिलिंद बसलेला आहे .समोरची व्यक्ती विश्‍वासास  पात्र नसेल तर आपली फसगत होते.याची जाणीव ठेवत पुढील .महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडताना आता  त्याला या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.माणसं पारखूनच निवडावी लागतील.

                        मिलिंदसह  रायगडमधील तरूण पत्रकारांच्या टीमचा मला नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे.उत्कृष्ठ पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्तुपाठही या पोरांनी महाराष्ट्राला घालून दिला आहे. ही सारी मुलं एखादया कुटुंबासारखी वागतात.त्यांना एकत्र ठेवण्यात मिलिंदचा रोल महत्वाचा असतो.मिलिंदची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, त्याची होणारी प्रगती पाहून मला आनंद घेण्याची संधी मिळत राहो एवढीच मनोकामना..मिलिंदच्या या यशात त्याच्या कुटुंबाचाही मोठा वाटा आहे त्यामुळं मलिंदचं आणि  त्यांचेही  अभिनंदन.(एस एम ) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here