माझ्या गावात होतंय…

0
701

महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हयाच्या ठिकाणी पत्रकार भवन ं उभी राहिली आहेत.मात्र तालुक्यात पत्रकार भवन नाहीत. अलिकडे दैनिकांची संख्या वाढली आणि त्याच बरोबर तालुकास्तरावर देखील पत्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली . त्यामुळे तालुका स्तरावर देखील पत्रकार भवनाची गराज भासू लागली.ही गरज लक्षात घेऊन मुळशी तालुका पत्रकार संघाने पत्रकार भवन बांधायला सुरूवात केली.त्याचा पायाभरणी समारंभही माझ्या हस्ते झाला आता ती इमारत पूर्ण व्हायच्या मार्गावर आहे, मला वाटतं हा राज्यातील पहिला प्रयत्न असावा .त्यासाठी दत्तात्रय सुर्वे ,मारणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

मुळशीतला प्रकल्प पाहून मलाही माझ्या तालुक्यात पत्रकार भवन व्हावे असे वाटत होते.माझी ही इच्छा आता पूर्ण होत आहे. वडवणी येथे पत्रकार भवनाची इमारत उभी राहात आहे.वडवणीतील एक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलिम दिलावर यांनी आपल्या जागेतून चाळीस बाय चाळीसचा प्लॉट तालुका पत्रकार संघाला देणगीच्या स्वरूपात दिला आहे.साधारणतः सहा महिन्यापूर्वीच त्यांनी या जागेची रजिस्ट्री पत्रकार संघाच्या नावे करून दिली.मात्र निधी अभावी काम सुरू होत नव्हते.आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या फंडातून 10 लाख रूपये पत्रकार भवनासाठी दिले आहेत.त्यामुळे ही इमारत उभी राहणार आहे.इमारतीच्या कामाचे भूमीपूजन येत्या मंगळवारी सकाळी 10 वाजता वडवणी येथे होत आहे.भूमीपूजन कार्यक्रम प्रकाश सोळंके यांच्या हस्ते होत आहे.या कार्यक्रमास मी देखील आवर्जून उपस्थित राहात आहे.
पत्रकार भवन होण्यासाठी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जानकीराम उजगरे, वडवणी तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आणि पत्रकार संघाचे सचिव अनिल वाघमारे,तसेच रामेश्वर लंगे,विनोद जोशी,बाबुराव जेधे वडवणीतील सर्वच पत्रकारांनी यााचा पाठपुरावा केला.मी वडवणीतील सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो तसेच त्यांना शूभेच्छा ही देतो.तालुक्याच्या ठिकाणी उभे राहत असलेले वडवणीचे पत्रकार भवन हे मराठवाड्यातील पहिलेच पत्रकार भवन आहे.हा मान माझ्या तालुक्याला मिळतोय ही माझ्यादृष्टीनं फार महत्वाची गोष्ट आहे.पत्रकार भवनाला जागा दिल्याबद्दल सय्यद सलिम आणि निधी दिल्याबद्दल आ.प्रकाश सोळंके यांना धन्यवाद.
या कार्यक्रमासाठी बीड जिल्हयातील पत्रकारांनी मोठ्या संख्यनें उपस्थित राहावे ही विनंती.( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here