नाशिक येथील पत्रकार महेंद्र महाजन यांना मारहाण करणार्या पोलिस उपायुक्तांवर सोमवारपर्यंत कारवाई न झाल्यास मंगळवारी नाशिक आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढून तेथे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी आज दिला आहे.महेंद्र महाजन यांच्यावर पोलिस अधिकार्याने केलेल्या हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून ठिकठिकाणी निषेध होत आहेत.
नाशिक येथील पत्रकारांनी आज डीपीडीसीच्या बैठकीतही घुसून पालकमंत्र्यांचे झालेल्या प्रकाराकडे लक्ष वेधले आणि पत्रकारास मारहाण करणार्या पोलिस अधिकार्यांवर कारवाई कऱण्याची मागणी केली.पंढरपूरमध्येही पत्रकारांनी या प्रश्नावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना धारेवर धरले तर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी महेंद्र महाजन यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत हा विषय आपण येत्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे जाहीर केले आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे ,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेऱणे,ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पटणे यांनीही पत्रक काढून महेंद्र महाजन यांच्यावरील हल्ल्लयाचा निषेध केला आहे.