महाराजांचा रायगड पुन्हा अंधारात  

0
797
 रायगड पुन्हा अंधारात

महाराजांचा रायगड पुन्हा एकदा अंधारात आहे.ही “कृपा” अर्थातच बिनडोक पुरातत्व विभागाची.काही दिवसांपुर्वी  वीज बिल न भरल्यानं वीज मंडळानं गडावरील लाईट तोडली होती.29 हजाराचं हे बिल नंतर पनवेलच्या एका शिवभक्तानं भरलं.तेव्हा विषय थेट राज्यपालांपर्यत पोहोचला होता.नंतर रायगडच्या पत्रकारांनी या विषयी आवाज उठविला.एक दिवस गडावर मुक्काम ठोकुन तेथील स्थिती अनुभवली.अंधाराचं साम्रज्या पाहिलं.त्यानंतर पत्रकारांनी पाठपुरावा केला.जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेला निवेदनं दिली.मग जिल्हा परिषदेनं गडावरील होळीचा माळ,राज दरबार आणि समाधी स्थळाजवळ सौर उर्जेवर चालणारे दिवे बसविले.गडावर थोडा उजेड झाला.मात्र हे दिवे पुरातत्व विभागाच्या डोळ्यात खुपत होते.नंतर एक दिवस पुरातत्व विभागाने हे दिवे उखडले आणि हत्तीखाना परिसरात नेऊन टाकले.महाराजांचा प्रिय रायगड पुन्हा एकदा अंधारात गेला.”स्वतः काही करायचं नाही,इतरांनाही काही करू द्यायचं नाही” ही पुरातत्वची पध्दत आहे.या विरोधात आता कोकण कडा मित्र मंडळ रस्त्यावर उतरत असून मंडळाचे मार्गदर्शक दीपक शिंदे आणि अध्यक्ष सुरेश पवार यांनी 2  ऑगस्टपासून चितदरवाजा येथे साखळी उपोषण कऱण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व शिव भक्तांनी या आंदोलनास पाठींबा दिला पाहिजे .पुरातत्व  विभागाला गडावर करता येण्यासाऱख्या अनेक गोष्टी आहेत मात्र ते स्वतः काहीच करीत नाही.अडथळे मात्र आणते.याचं आणखी एक उदाहरण म्हणजे एमटीडीसीच्या रूम्सवर पत्रे टाकायलाही पुरातत्वनं विरोध केला आहे.अनेक शिवभक्त रात्री एमटीडीसीच्या खोल्यांमधून गडावर मुक्काम करीत आहेत.त्याची ही सोयही नष्ट कऱण्याचा डाव पुरातत्व विभागाचा आहे.किल्ल्यावरचा कचरा महाडचे महसूल खाते आणि स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारानं साफ केला जातो.तेव्हा पुरातत्व खातं कुठं दिसत नाही.फक्त करातून मिळणारा पैसा वसूल करण्याचं काम हे खातं करीत आहे.गडावर दररोज हजारो शिवभक्त,पर्यटक आणि अभ्यासक येत असतात.गडावरची अनास्था पाहून हे सारेच अस्वस्थ होतात.या विरोधात अनेकदा चर्चा झाली,वाद झाले पण पुरात्तव खाते सुधारायला तयार नाही.पुरात्तव खाते आता साखळी उपोषणाची दखल घेते की त्याकडं दुर्लक्ष करून गडावर अंधार कायम ठेवते ते पहायचे आहे.

मानवंदना नाहीच 

आणखी एक महत्वाचा मुद्दा.होळीच्या माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला मानवंदना दिली जायची.चार पोलिस रोज सकाळी गडावर येऊन मानवंदना द्यायचे.पण आर्थिक  तरतूद नसल्याचं काऱण देत ही मानवंदना बंद झाली होती.हा विषय नागपूर अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मी उपस्थित केल्यानंतर आणि वाहिन्यांनी तो उचलून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानवंदना पुन्हा सुरु  कऱण्याचं आश्‍वासन दिलं होतं.संतापाची गोष्ट अशी की,आजही मानवंदना सुरू झालेली नाही.भिडे गुरूजींची माणसं मात्र दररोज सकाळी येऊन पुतळ्याला अभिषेक करतात.एकीकडं शंभर कोटी रूपये खर्च करून समुद्रात स्मारक उभारण्याच्या गोष्टी होत असताना महाराजांचं जे खरं-खुऱं स्मारक आहे त्याकडं दुर्लक्ष होत आहे ते संतापजनक आहे.समुद्रात होणार्‍या स्मारकाला आमचा विरोध नाही मात्र तिथं स्मारक होतंय म्हणून महाराजांची राजधानी असलेलं रायगड अंधारात असलं पाहिजे असं नाही.सरकारनं रायगडची होणारी हेळसांड तातडीनं थाबविली पाहिजे.अन्यथा त्याविरोधात सर्वांनी एकत्र येत आंदोलन करण्याची गरज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here