मुंबईः मराठी भाषा टिकायची असेल तर मराठी वृत्तपत्रे जगली पाहिजेत आणि त्यासाठी सरकारनं वृत्तपत्रांकडं आपलेपणानं पाहून त्यांच्या समस्यांचे निवारण केले पाहिजे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्यावतीने एस.एम.देशमुख यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्काराने काल मुंबईत नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.त्याप्रसंगी देशमुख बोलत होते.संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर,ज्येष्ठ कवी ए.के.शेख,परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव बापुसाहेब गोरे आदि उपस्थित यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात देशमुख यांनी वृत्तपत्रांचे खप,वाचक संख्या वाढल्याचे डांगोरे मोठी वृत्तपत्रे एबीसीच्या हवाल्याने पिटत  असली  तरी ते खरं नाही.आमची वृत्तपत्र वितरकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा मोठ्या दैनिकांचे खपही 30-35 टक्क्यांनी घटल्याचे ते सांगतात..अशा स्थितीत मुद्रीत माध्यमांसमोरील पुढचा काळ धोक्याचा असल्याने छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांनी तातडीने डिजिटल मिडियाची कास धरली पाहिजे तरच स्पर्धेत त्यांचा निभाव लागेल असे मत व्यक्त केले .. देशमुख पुढे म्हणाले,सामाजिक बांधिलकी हा पत्रकारितेचा आत्मा असून महाराष्ट्रातील अनेक पत्रकार सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत केवळ पत्रकारिताच करतात असे नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्‍नांची तड लावण्याची देखील भूमिका घेतात ही बाब आनंदाची आहे.यासंदर्भात देशमुख यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणासाठी कोकणातील पत्रकारांनी दिलेला प्रदीर्घ लढा तसेच कणकवलीतील पत्रकारांनी उभारलेले वनराई बंधारे किंवा दैनिक सकाळने मराठवाडयाच्या बीड जिल्हयात देवडी येथे उभारलेल्या भव्य बंधार्‍याचा  हवाला दिला . 

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून देशमुख यांनी हा कायदा देशभर व्हावा यासाठी आपण पुढील काळात प्रयत्न करणार असून त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच पणजीत गोव्याच्या मुख्यमत्र्यांची भेट घेऊन गोव्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू कऱण्याची मागणी केली.ती त्यांनी मान्य केल्याचेही देशमुख यानी स्पष्ट केले.

सुकृत खांडेकर यांनी देशमुख यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतूक केले.अत्यंत निस्पृहपणे आणि तळमळीने देशमुख पत्रकारांच्या प्रश्‍नासाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले.मुद्रित माध्यमांच्या भवितव्याबद्दल त्यांनीही आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली.

LEAVE A REPLY