सरकार छोटया वृत्तपत्रांच्या पाठिशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही,परिषदेच्या आंदोलनाचे यश

महाराष्ट्रत ब आणि क वर्गातले तीनशे-साडेतीनशे वर्तमानपत्र आहेत.राज्याच्या कानाकोपर्‍यात राहून लोककल्याणाचं काम करणारी ही पत्र आज विविध समस्यांना तोंड देत आहेत.सरकारचे काही अधिकारी या पत्रांची लंगोटी पेपर अशा शब्दात निर्भत्सना करीत असल्याने सरकारचा या पत्रांकडं बघण्याचा दृष्टीकोनही नकारात्मक बनला होता.या विरोधात 16 नोव्हेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी राज्यभर आंदोलन केलं.आंदोलनास नेहमीसारखाच जोरदार प्रतिसाद मिळाला.मुख्यमंत्री आणि माहिती महासंचालकांना बारा हजारांवर एसएमएस पाठवून छोटया पत्रांच्या समस्यांची दखल सरकारनं घ्यावी अशी मागणी केली गेली.त्या अगोदरही परिषदेच्यावतीने राज्यातील ब आण क वर्गाच्या वृत्तपत्रांचा एक मेळावा पुण्यात घेण्यात आला होता.या सर्व प्रयत्नांची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली.बीड येथील झुंजार नेताच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी छोटया वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांमध्ये आपण स्वतः लक्ष घालून त्यांचे प्रश्‍न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.एवढंच नव्हे तर सरकार छोटया वृत्तपत्रांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याचा हा परिणाम आहे.बीडमधील परिषदेशी संलग्न सर्व छोटया वृत्तपत्रांनी देखील आज एक जाहिरात प्रसिध्द करून या प्रश्‍नाकडं मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.त्याचीही दखल सरकारला घ्यावीच लागली.पत्रकारांच्या एकजुटीचा हा विजय आहे.ब आणि क वर्गातील वृत्तपत्रांचे प्रश्‍न सुटेपर्यंत परिषद याचा पाठपुरावा करीत राहणार आहे.

 दैनिक झुंजार नेता वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सव सोहळयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार प्रितम मुंडे, आमदार विनायक मेटे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार भिमराव धोंडे, आदी उपस्थित होते.
           मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमे  लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनमत घडविण्याचे काम करत असतात. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कमी होत असून प्रसारमाध्यमांसमोर विश्वासार्हता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. प्रसारमाध्यमांनी नकारात्मक व सकारात्मक बातम्यांचा समतोल  साधला पाहिजे अशी अपेक्षाही  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
           स्वातंत्र्यपुर्व काळात वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यासाठी महत्वाची भूमिका बजावली तर स्वातंत्र्योत्तर काळात समाजातील वाईट प्रवृत्तीवर हल्ला करुन समाजाचे परिवर्तन करण्याचे काम केले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
           दैनिक झुंजार नेताच्या कार्यालयाला भेट दिली असता तेथील वृत्तपत्रांचे जुने अंक पाहून या वृत्तपत्राने जनतेचा आवाज म्हणून केलेल्या कामाची पावती मिळते. या वृत्तपत्राने पुढेही असेच काम करण्याचे आवाहन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वृत्तपत्राला शुभेच्छा दिल्या.
           याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दैनिक झुंजार नेता वृत्तपत्राच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड येथील सामान्य रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी गृहविभागाकडे असलेली जमीन उपलब्ध करुन दिल्याबदल त्यांचे आभार मानले. रुग्णालयाच्या विस्तारीकरणामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
           प्रारंभी दैनिक झुंजार नेता महोत्सव सोहळयाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर दैनिक झुंजार नेताच्या दिवाळी अंकाचे, महिला जगत पुरवणीचे, बालजगत पुरवणीचे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वर्षपूर्ती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दैनिक झुंजार नेताच्या लाईव्ह न्युज पोर्टलचे उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक अजित वरपे यांनी केले.  संचालक  विजय वरपे यांनी आभार मानले.
           कार्यक्रमास विविध स्तरातील मान्यवर, व  नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here