पोलिसांच्या विरोधात बातम्या देतोस ?
नागडं करून चौकात फटकविन
मंगळवेढ्याच्या पत्रकारांना पोलिसांच्या धमक्या
एखादया शहरात पोलिसांच्या कृपेनं अवैद्य धंदे सुरू असतील आणि त्याच्या विरोधात बातमी दिली तर तो गुन्हा होऊ शकतो काय ?ते पत्रकाराचं कामच आहे.मात्र पत्रकारांचं हे समाजस्वास्थ्यासाठीचं आवश्यक योगदान मंगळवेढा पोलिसांना मान्य नाही.त्यामुळं त्यांनी पत्रकार समाधान फुगारे यांना नागडं करून चौकात मारण्याची धमकी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक महोदय एवढ्यावच थांबले नाहीत तर ‘तुझ्या विरोधात वाळू वाल्याची तक्रार घेऊन तुझ्यावर 392 चा गुन्हा दाखल करेल’ अशीही धमकी दिली आहे.त्यामुळं मंगळवेढा येथील सर्व पत्रकार संतप्त झाले आहेत.
मानदेश नगरी या दैनिकाच्या 10 डिसेंबरच्या अंकात ‘अवैद्य धंदे जोरात,पोलीस प्रशासन कोमात’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली आहे.या बातमीमुळं सहय्यक पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे यांचे माथे भडकले आणि त्यानी समाधान फुगारे यांना ‘तु पोलिसांच्या विरोधात बातम्या देतोस काय? म्हणत खोटे गुन्हे दाखल कऱण्याच्या धमक्या दिल्या आहेत.शिंदे यांच्या या अरेरावीच्या विरोधात मंगळवेढा येथील पत्रकारांनी उद्या डीवायएसपी आणि एसपींना भेटण्याचा निर्णय घेतला आहे.या घटनेचा पत्रकारांनी निषेधही केला असून पोलीस स्टेशनच्या इनचार्जकडे लेखी तक्रार केली आहे.या घटनेची गंभीर दखल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने घेतली असून याची माहिती गृहराज्यमंत्री केसरकर यांना देण्यात आली आहे.महाराष्ट्रातील पत्रकार आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद या संपूर्ण प्रकरणात मंगळवेढा येथील पत्रकारांबरोबर आहेत.