लंडन – ब्रिटनमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत होत असताना स्थानिक प्रसिद्धिमाध्यमांपैकी काहींनी मात्र टीकेचा सूर धरला आहे. यामध्ये “द मिरर‘, “गार्डियन‘, “हफिंग्टन पोस्ट‘, “ेलिग्राफ‘सारख्या वृत्तपत्रांचा समावेश आहे. यांपैकी काहींनी अग्रलेखांतून, तर काहींनी इतरांचे लेख प्रसिद्ध करून ही टीका केली आहे.
 
भारतात “हिंदू तालिबान‘चे राज्य : “द गार्डियन‘ 
अनीश कपूर या प्रसिद्ध शिल्पकार आणि लेखकाने “द गार्डियन‘मध्ये हा लेख लिहिला आहे. “भारतामध्ये हिंदू तालिबानचे राज्य आहे. त्यांच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्‍यात येणे आणि असहिष्णुता वाढणे यांसारख्या मुद्यांकडे मोदी गंभीर दृष्टिकोनातून पाहत नाहीत. ब्रिटनने याविरोधात आवाज उठविणे आवश्‍यक आहे. भारतातील मानवी हक्कांची गळचेपी लक्षात घेता डेव्हिड कॅमेरून यांनी मोदींबरोबर कोणताही व्यवहार करू नये. भारतामध्ये लेखक, बुद्धिजीवी, पत्रकार आणि नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मोदींनी जाहीररित्या बोलावे,‘ असा सूर कपूर यांच्या लेखात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सह्यांची मोहीम राबविण्यामध्ये कपूर यांचाही सहभाग होता. ब्रिटनमध्येही ते अनेक कारणांमुळे वादात सापडले आहेत. 
 
इतर वृत्तपत्रांनी काय म्हटले? 
गुजरातमध्ये झालेल्या दंगलीत हजारो मुसलमानांचे मृत्यू झाले, त्या वेळी मोदी मुख्यमंत्री होते. ब्रिटनच्या संसदेमध्ये मोदी भाषण करत असताना रस्त्यावर त्यांच्याविरोधात निदर्शनेही होत होती. एका निदर्शकाने मोदी यांचा उल्लेख “दहशतवादी‘ असा केला, एकाने “गेल्या 30 वर्षांतील सर्वांत धोकादायक नेता‘ असा उल्लेख केला. इतक्‍या वादग्रस्त नेत्यासाठी ब्रिटन “रेड कार्पेट‘ का घालत आहे आणि इतके भव्य स्वागत का केले जात आहे? 
– द मिरर 
 
भारतामध्ये सिव्हिल सोसायटीच्या संघटनांवर होणारे हल्ले मोदींनी रोखावेत. गेल्याच आठवड्यामध्ये मोदी सरकारने भारतामधील “ग्रीनपीस‘ संघटनेची मान्यता रद्द केली. “ग्रीनपीस‘ आणि इतर संघटनांवर केले जाणारे हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. 
– “ग्रीनपीस इंडिया‘च्या कार्यकारी संचालक विनिता गोपाळ यांनी “हफिंग्टन पोस्ट‘मध्ये लिहिलेला लेख 
 
मोदी हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा आहे. गुजरातच्या दंगलीमध्ये ब्रिटनच्या तीन नागरिकांच्या झालेल्या मृत्यूचा विषय डेव्हिड कॅमेरून यांनी बैठकीत उपस्थित केला पाहिजे. त्या दंगलींमुळे 2012 पर्यंत मोदींना ब्रिटनमध्ये पाऊल टाकण्यास मनाई केली होती. गुजरातमधील हिंसा रोखण्यासाठी मोदींनी पावले उचलली नाहीत, असे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मत होते. 
– “टेलिग्राफ‘ 
पुणे सकाळवरून साभार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here