बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकाचे काम मार्गी लागणार1 कोटी 55 लाखांचा उर्वरित निधी उपलब्ध
मुंबई दि.31 ः सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आद्य पत्रकार,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठीचा 1 कोटी 55 लाख रूपयांचा उर्वरित निधी सरकारने आज उपलब्ध करून दिल्याने स्मारकाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे..स्मारक लवकर पूर्ण व्हावे यासाठी सरकारने केलेल्या मदतीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यानी एका पत्रकाव्दारे राज्य सरकारचे आभार मानले आहेत..आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांच्याच जन्मभूमीत ओरोस येथे स्मारक व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद गेली वीस वर्षे सातत्यानं प्रयत्न करीत आहे.याची दाखल अखेर सरकारने घेतली आणि स्मारकासाठी साडेपाच कोटी रूपये मंजूर केले.त्यातील चार कोटी रूपये स्थानिक बांधकाम विभागाकडे वर्गही झाले .त्यातून स्मारकाची इमारत उभी राहिली.रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले ..मात्र उर्वरित 1 कोटी 55 लाख रूपयांचा निधी मिळत नसल्याने फर्निचर,साऊंडसिस्टीम,पुतळ्याचे काम रखडले होते.त्यासाठी मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या पदाधिकारयांनी सहयाद्रीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती.त्यानंतर वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा केला होता.पुढील काळात ग्रामविकास मंत्री हसन मुऋीफ,पालकमंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यानीही पुढाकार घेत स्मारकासाठीची निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले होते…जिल्हाधिकारयांनी देखील स्मारकाचे काम व्हावे यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती.या सर्वांचा परिणाम स्वरूप आज उर्वरित निधी उपलब्ध झाला आहे.वित्त विभागाने 1 कोटी 55 लाख रूपये जिल्हा नियोजन विभागाकडे वर्ग केले आहेत..आता हा निधी कोषागार कार्यालयामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणार आहेे.त्यातून उर्वरित काम पुर्ण होईल आणि लवकरात लवकर स्मारकाचे काम पूर्ण होऊन स्मारकाचे उद्दघाटन करण्यात येईल.बाळशास्त्रींचे स्मारक व्हावे हे राज्यातील पत्रकारांचे जुने स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याबद्दल एस.एम.देशमुख.विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,जिल्हा संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी आनंद व्यक्त केला आहे.स्मारक पूर्ण व्हावे यासाठी मदत करणार्या सर्वांचे परिषदेने आभार मानले आहेत..मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक जिल्हा संघाचे अध्यक्ष गणेश जेठेे आणि त्यांच्या सहकार्यांनी चिवटपणे पाठपुरावा केल्याने हे काम पुर्ण होत असल्याबद्दल परिषदेच्या पत्रकात त्यांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे..