खरे बाळशास्त्री

0
1064

राठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज पुण्यतिथी आहे.त्यानिमित्त फेसबुक आणि व्हॉटस्‌ऍपवरून बाळशास्त्रीचे वेगवेगळे चार-पाच फोटो प्रसिध्द झाले आहेत.त्यातील एक छायाचित्र सरकारनं अधिकृत म्हणून मान्यता दिलेलं आहे तर अन्य एक छायाचित्र मराठी पत्रकार परिषदेनं प्रसिध्द केलेलं आहे इतरही छायाचित्रं आलेली आहेत.या.चार-पाच वेगवेळ्या छायाचित्रांतून  खरे बाळशास्त्री कोणते? हा आता चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे.खरं तर हा वाद आजचा नाही.त्याला पंधरा वर्षांची पार्श्वभूमी आहे.बाळशास्त्रींचे म्हणून सरकार जे छायाचित्र प्रसिध्द करते ते बाळशास्त्रींचे छायाचित्र असूच शकत नाही असा आक्षेप घेणारे एक पत्र मराठी पत्रकार परिषदेच्यावतीनं 1999मध्येच तत्कालिन मुख्यमंत्र्यांना दिले होते.जे पत्र दिले होते त्यात ़छायाचित्राला आक्षेप कशामुळं आहे याचीही  कारणं स्पष्ट केलेली होती.बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजीचा..प्राथमिक शिक्षण पोभुर्ल्यातच झाल्यानंतर ते वयाच्या बाराव्या वर्षी मुंबईत आले.त्यानंतर खऱ्या अर्थान त्यांची कारकीर्द ं सुरू झाली. वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केलं.त्यामुळं आपल्याला त्यांची ओळख आद्य पत्रकार म्हणून असली तरी ते प्रकांड पंडित होते. तेरा देशी विदेशी भाषांचं ज्ञान असलेले भाषाप्रभू होते.शिक्षण तज्ज्ञ होते.स्त्री शिक्षणाचे अग्रदूत होते.समाजसुधारक म्हणूनही त्यांचा नावलौकीक होता.त्याकाळातील एक विद्वान म्हणून ते ओळखले जात.त्यांच्या  या विद्‌त्वत्ततेचे तेज त्याच्या चेहऱ्यावर विलसत असे.सरकार जे ़छाया चित्र अधिकृत म्हणून वापरते त्या चित्रात बाळशास्त्रींच्या विद्वत्ततेचं तेज चित्रकाराला चित्रात दाखविता आलेलं नाही.ते थकलेले,कृश झालेले,चिंताक्रांत दिसतात. वस्तुस्थिती तशी नव्हती. बाळशास्त्रींची घरची गरिबी जरूर होती पण त्यांच्या चेहऱ्यावरचं  बुध्दीचं तेज लपत नव्हतं.बाळशास्त्री अल्पायुषी ठरले.वयाच्या 32 व्या वर्षी म्हणजे 1844-45 च्या सुमारास त्याचं निधन झालं.सरकार जे चित्र वापरते त्यात बाळशास्त्री साठ वर्षांचे वृध्द वाटतात.सरकार आपल्या माथी चुकीचे बाळशास्त्री मारताहेत असं मराठी पत्रकार परिषदेच्या निदर्शनास आल्यानंतर बाळशास्त्रींच्या चरित्राचा अभ्यास करून छायाचित्रकार मुकुंद बहुलेकर यांनी बाळशास्त्रींच्या चरित्राशी सुसंगत वाटावे अशे  छायाचित्र काढले.1999 मध्ये पुण्यात बालगंधर्वमध्य झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते  या छायाचित्राचं अनावरण केलं गेलं.बाळासाहेबांनी छायाचित्र पाहून “हेच खरे,बाळशास्त्री” अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.जाहीरपणे त्यांनी छायाचित्राचं कौतुक केलं होतं.बाळासाहेबांसारखा एका विख्यात व्यंगचित्रकार,छायाचित्रकाराने दिलेली ही पावती लाखमोलाची होती.

बाळासाहेबांनी मान्यतेची मोहर उठविल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेच्यावतीनं  सरकारकडं एक निवेदन देण्यात आलंं.”सरकार जे छायाचित्र वापरत आहे ते चुकीचं आहे,त्याला कोणताही आधार नाही आणि बाळशास्त्रींच्या व्यक्तिमत्वाशी  ते सुसंगतही नाही” ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली गेली.बाळशास्त्रींेचे छायाचित्र स्वीकारताना सरकारनं कुणाशी चर्चा केल्याचं किंवा जाणकाराकडून ते चित्र तपासून घेतल्याचं ऐकिवात नाही.बाळशास्त्रींचे मुळचे छायाचित्र कोठेच उपलब्ध नाही.जी छायाचित्रं आहेत ती कल्पनेतून काढलेली आहेत.कल्पनेतून काढलेली ही चित्रं बाळशास्त्रींच्या व्यक्तिमत्वाच्या जवळ जाणारी देखील नाहीत.कोणी तरी छायाचित्र आणून दिलं,ते स्वीकारावं म्हणून दबाब आणला गेला आणि  माहिती आणि जनसंपर्क विभागातल्या अधिकाऱ्यांनीही कोणतीही शहानिशा न करताच ते स्वीकारलं. एवढा सहज घडलेला हा मामला आहे.सरकार आज आपल्या जाहिरातीतून किंवा अन्य ठिकाणी बाळशास्त्रीचे तेच छायाचित्र अधिकृत  म्हणून वापरते.ते चुकीचे आणि अत्यंत आक्षेपार्ह आहे.

जोपर्यत छायाचित्राबद्दल कोणाची तक्रार किंवा आक्षेप नव्हता तोपर्यत ते ठीक होतं.मात्र मराठी पत्रकार परिषदेनं तक्रार नोंदविल्यानंतर तरी सरकारनं दोन्ही बाजू समजून घेऊन,तज्ज्ञांशी चर्चा करून  योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित होतं.परंतू सरकारनं त्याकडं अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि आक्षेप घेतल्यानंतरही जुनेच आणि अत्यंत चुकीचे छायाचित्र वापरणं सुरूच ठेवलं.या संदर्भात आता नव्यानं मराठी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांकडं निवेदन देणार असून सरकारनं योग्य ते छायाचित्रच वापरावे असा आग्रह धरणार आहे.नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर यांनीही याबाबत पाठपुरावा कऱण्याचं मान्य केलं आहे.”आम्ही म्हणतो तेच छायाचित्र खरे असा आमचा आग्रह नाही.मराठी पत्रकार परिषद जे छायाचित्र वापरते ते देखील कल्पनेतूनच रेखाटले गेलेले आहे.मात्र ते बाळशास्त्रींच्या व्यक्तिमत्वाच्या अधिक जवळ जाणारे असल्यानं तेच छायाचित्र योग्य आहे असा आमचा आग्रह आहे”.तरीही सरकारनं सर्व संबंधितांशी चर्चा करून येत्या 6 जानेवारी पुर्वी हा वाद संपवावा आणि संपूर्ण महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांचं एकच छायाचित्र वापरले जाईल आणि ते अधिकृत असेल अशी व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here