वृत्तपत्रं आणि वाचक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून वृत्तपत्र वितरक काम करीत असतो.हा घटक म्हणजे वृत्तपत्र व्यवसायाचा कणाच.मध्यरात्री छापलेले वृत्तपत्र सकाळी सकाळी वाचकांच्या घरी पोहोचविण्याचं महत्वाचं तेवढंच जिकरीचं काम वृत्तपत्र वितरक करीत असतात.उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळ्यातही त्यांची ही वाचक सेवा अखंडपणे चालू असते.पेपर टाकणारा पोर्‍या म्हणून सुपरिचित असलेल्या या पोर्‍याच्या आयुष्यात डोकावून पाहण्याची तो जगतो कसा,दिवसभर करतो काय,झोपतो कधी याची काळजी करण्याची गरज ना वाचकांना कधी भासली ना,सरकारला ना वृत्तपत्रांच्या मालकांना कधी भासली.त्यांचे प्रश्‍न,त्यांची दुःख त्यांच्या वेदना समजावून घेण्याचीही गरज कोणालाच कधी वाटली नसल्यानं प्रसिध्दी माध्यमांशी निगडीत असलेला हा घटक कमालीचा वंचित आणि उपेक्षितच राहिला.गरजेनुसार ही मंडळी संघटीत जरूर झाली,मात्र वृत्तपत्र व्यवसायातला शेवटचा घटक असल्यानं त्यांचा आवाज मुक-बधिर सरकारच्या कानापर्यंत कधी गेलाच नाही.त्यामुळं वितरकांच्या कल्याणासाठी सरकारनं कधीच काही केलेलं नाही.उलटपक्षी कुणाला तरी लहर येते आणि रस्त्यावरचे वितरकांचे स्टॉल्स उखडून फेकले जातात.कधी एखादया बडया वृत्तपत्रांना वितरकांची मस्ती (?) मोडून काढण्याची हुक्की येते आणि व्हेंडर मशिनचे प्रयोग केले जातात.मात्र हे सारे प्रयोग आजपर्यंत यशस्वी झालेले नाहीत .या वर्गाच्या राहण्यापासून आरोग्यापर्यंतचे अनेक प्रश्‍न आहेत,त्याची दखल घेऊन त्यांच्यासाठी काही कऱण्याची वेळ आता आलेली आहे.पत्रकार संघटनांनी देखील वितरकांची उपेक्षाच केलेली आहे.त्यांचे प्रश्‍न वेशिवर टांकण्याचं कामही पत्रकारांनी केलं नाही.पण उशिरा का होईना ही चूक आता संघटनांच्या लक्षात येऊ लागल्यानं परवा नांदेडमध्ये सेहद संस्थेच्या सहकार्यानं नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं वितरकांना स्वेटरचं वाटप केलं आहे.कडाक्याच्या थंडीत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं वितरकांना दिलेली ही मायेची उब नक्कीच आश्‍वासक आहे.वितरक दुसरे कोणी नाहीत ते आमचेच व्यवसाय बंधू आहेत ही भावना जपण्याचा जो प्रयत्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं केला तो कौतूकास्पद नक्कीच आहे.त्याबद्दल नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे आणि त्यांच्या टीमचे तसेच प्रसिध्द डॉक्टर तळेगावकर यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे.अत्यंत देखण्या,आपुलकीनं ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमास मला उपस्थित राहून नांदेडमधील वितरकांशी सुसंवाद साधता आला याचा आनंद मलाही आहे.यापुढे वितरकांचे प्रश्‍न शासनाच्या कानी घालण्यासाठी तसेच त्याना न्याय मिळवून देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद नक्कीच प्रयत्न करेल असा शब्द मी त्याना दिला आहे.मला जाणीव आहे की,वृत्तपत्र वितरकांची संघटना आणि मराठी पत्रकार परिषद जर एकत्र आले तर नक्कीच एक मोठा दबाव गट तयार होऊ शकेल आणि दोन्हीची ताकद दोन्ही घटकांचे प्रश्‍न सोडविणयासाठी परस्पर पूुरक ठरणार आहे.त्यामुळं राज्य पातळीवरील वितरकांची संघटना आणि मराठी पत्रकार परिषदेची एक संयुक्त बैठक घेऊन चर्चा कऱण्याचा मनोदयही मी बोलून दाखविला आहे.बघू काय होतंय ते..मात्र वृत्तपत्र वितरकांच्या प्रत्येक लढ्यात मराठी पत्रकार परिषद यापुढे त्यांच्याबरोबर असणार आहे.-

फोटो कॅप्शन

नांदेडमध्ये वृत्तपत्र वितरक संघटनेच्यावतीने बालाजी पवार यांनी माझा सत्कार केला आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या.आम्ही वृत्तपत्र वितरकांबरोबर आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here