नोटाबंदीच्या निर्णयानंतरही या जिल्ह्य़ात चार नगरपालिका निवडणुकीत ‘पेड न्यूज’ धडाक्यात सुरू असून राजुराचे विदर्भ विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वामी येरोलवार यांना या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.  राज्य निवडणूक आयोगाचेही पेडन्यूजवर लक्ष असून वर्तमानपत्रांच्या जिल्हा आवृत्त्या थेट मुंबईला मागविण्यात येत आहेत.

या जिल्ह्य़ात बल्लारपूर, राजुरा, मूल, वरोरा या चार नगर पालिका व सिंदेवाही नगर पंचायतची निवडणूक होत असून २७ नोव्हेंबरला मतदान होत असल्याने प्रचाराच्या मधल्या टप्प्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी काही वर्तमानपत्राच्या जिल्हा आवृत्त्यांमधून पेड न्यूजचा धडाका लावलेला आहे. विशेष म्हणजे, एकाच उमेदवाराच्या बातम्या सातत्याने प्रसिध्दीला दिल्या जात आहेत. राजुरा, मूल, बल्लारपूर व वरोरा या चार पालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात असतांना सातत्याने काही ठराविक उमेदवारांच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे झाली. वर्तमानपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांची पाने पाठवूनच या तक्रारी झाल्याने राज्य निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेऊन रोजच्या रोज ही वर्तमानपत्रे बोलविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, यात काही उमेदवारांच्या बातम्यांचे सातत्य बघून या पेड न्यूज आहेत, याची गंभीर दखलही निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती आहे. सर्व वर्तमानपत्र व बातम्यांवर स्थानिक पातळीवरही जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात यासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी रोजची माहिती निवडणूक आयोगाकडे देत आहेत.

दरम्यान, राजुराचे विदर्भ विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वामी येरोलवार यांच्या पेड न्यूजची लेखी तक्रार कॉंग्रेसच्या वतीने निवडणूक अधिकारी व तहसीलदार धर्मेश पुसाटे यांच्याकडे करण्यात आली. पुसाटे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत स्वामी येरोलवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, येरोलवार यांनी पेड न्यूज असल्या तरी त्या जाहिरात स्वरूपात असल्याची आणि त्याचा खर्च विदर्भ विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या खर्चात दाखविण्यात येणार असल्याचे उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, येरोलवार यांच्या उत्तराने असमाधानी असल्याचा निर्वाळा निवडणूक विभागाने दिला , तर ज्या वृत्तपत्रांमध्ये अशा जाहिराती व बातम्या प्रकाशित होत आहेत त्यांनाही नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती पुसाटे यांनी दिली. काही वर्तमानपत्राचे प्रतिनिधीच येरोलवार यांचे प्रचार कार्य करत असून त्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  मूल येथे भाजप व कॉंग्रेस, तर वरोरा येथे भाजप व शिवसेना उमेदवार व बल्लारपुरात कॉंग्रेस उमेदवाराच्या बातम्यांवर लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

प्रलोभनांची चौकशी

राजुरा, बल्लारपूर, वरोरा व मूल येथे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मतदारांना आमिष व प्रलोभन देणे सुरू केले आहे. यासंदर्भातही निवडणूक कार्यालयाकडे तक्रारी आल्या आहेत. पेड न्यूजसोबतच प्रलोभने व आमिषांचीही चौकशी होणार आहे. (लोकसत्तावरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here