रायगडचं संवर्धन आणि पुनर्विकासासाठी सरकारनं म्हणे एक आराखडा तयार केलाय,त्यासाठी 520 कोटींची तरतूद केल्याच्या बातम्याही आल्या.नंतर 9 सप्टेंबर रोजी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तातडीने 50 कोटी रूपये उपलब्ध करून दिले जातील असंही सांगितलं.त्याच्याही बातम्या झळकल्या.प्रत्यक्षात रायगड आजही बेवारस आहे.गेल्या दोन दिवसात रायगडवरून ज्या बातम्या येत आहेत त्या अस्वस्थ करणार्‍या आणि शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणार्‍यांचे मुखवटे उघडे करणार्‍या आहेत.किल्ले रायगडचे बुरूज ढासळताहेत,दारूडयांचा  तेथे धिंगाणा सुरू आहे,तेथील लाईट कापण्याचा उद्यामपणा वीज महामंडळ करीत आहे या सार्‍या बातम्या आपण सातत्यानं ऐकत असतो आता थेट महाराजांच्या तलवारीला हात घालण्याची हिंमत दाखविली जात आहे त्याकडंही फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही हे संतापजनक आहे.मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.त्यांच्या हातातील तलवारीचे म्यान काल तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.40 इंच लांबीच्या तलवारीपैकी सात-आठ इंच तलवारीचा भाग चोरीला गेल्याचे दिसून आलं.पुरातत्व खात्याला बातमी कळल्यानंतर ती पोलिसांना दिली गेली.पोलीस आले.  चोरीचा गुन्हा वगैरे दाखल झाला.आता वाद असा आहे की,जो भाग तुटला तो नैसर्गिकरित्या तुटला असं पोलिस सांगतात,शिल्पकार सतीश घारगे यांना हे मान्य नाही.तलवार पाच ते सव्वापाच फुट लांब असून पूर्णपणे ताब्याची तलवार असल्यानं ती सहजगत्या तुटणे किंवा निखळणे शक्य नाही असं त्याचं म्हणणं आहे.वाद नको म्हणू अशी थेरी तयार केलेली असू शकते.मात्र त्यानं विषयाचं गांभीर्य जराही कमी होत नाही. जर तलवार नैसर्गिकरित्या दुभंगली असेल तर प्रश्‍न असा पडतो की,दररोज हजारो शिवभक्त ज्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतात त्या पुतळ्याजवळची ही तलवार खराब झालीय हे पुरातत्व विभागाच्या लक्षात कसं आलं नाही ? .तलवार चोरीचा प्रयत्न झाला असेल तर पुरातत्व खातं काय करतंय हा प्रश्‍न पुन्हा उपस्थित होतो.म्हणजे काहीही झालं तरी पुरातत्व विभागाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.प्रत्यक्षात हा विभाग कोणतीच जबाबदारी स्वीकारायला कधी तयार नसतो.तलवारीचा प्रकार काल उघडकीस आला त्याच्या एक दिवस अगोदर जळगावचे काही हरामखोर रायगडावर बाटल्या घेऊन आल्याची क्लीप व्हायरल झाली होती.तो प्रकार जेव्हा स्थानिक शिवभक्तांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी त्या पर्यटकांना चांगलाच चोप दिला. या बाबतीतही पुरातत्व विभाग मुग गिळून आहे.कोणी किल्ल्यावर काही विधायक करायचं म्हटलं की,हेच पुरातत्व खाते आडवा पाय घालते.मात्र अशा टग्यांवर कारवाई करायची म्हटलं की,त्यांच्याकडं निधी नसतो,मनुष्यबळ नसतं,हिंमतही नसते.त्यामुळं महाराजांच्या किल्ल्याची अवस्था निराधारासारखी झाली आहे.सरकारला आणि संपूर्ण महाराष्ट्राला शरम वाटावी असा हा प्रकार आहे.

आपणास स्मरत असेल की,पंचवीस हजारचं वीज बिल थकल्यामुळं साधारणतः एका वर्षापूर्वी किल्ल्यावरील लाईट वीज मंडळानं कापली होती.नंतर त्यावर बरीच ओरड झाल्यानंतर एका खासगी व्यक्तीने ते बिज भरले आणि पुन्हा वीज जोडली गेली.मध्यंतरी सोलर दिवे बसविले होते तेही चोरीला तरी गेले किंवा बंद तरी पडले त्याकडंही दुर्लक्ष आहे.किल्ल्याची ही अवस्था तर राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.समाधी स्थळाजवळ सुरक्षा रक्षक नाही आणि वीज ही नसल्यानं तेथील पुतळा ९ ऑगस्ट २००९ ला  चोरीला गेला होता.त्यावरून शिवभक्तांमध्ये मोठीच संतापाची लाट उसळली होती.त्यानंतर नवा पुतळा बसविला गेला . आता पुन्हा तेथे वीज नाही . किल्ल्याची लाईट तोडल्याची घटना जशी घडली होती त्याच पध्दतीनं चार महिने लाईट बिल न भरल्यानं समाधी स्थळाजवळचे मीटर काढून नेले गेल्याची बातमी आहे.मात्र गावकर्‍यांनी अधिकार्‍याला धारेवर धरल्यावर घाई घाईने वीज बिल भरले गेले.समाधी स्थळाच्या जागेवरूनही वाद आहे.या स्थळाची मालकी नेमकी कोणाकडं आहे? असा प्रश्‍न आहे.वनखात्यानं तीन महिन्यापुर्वी हा परिसर बांधकाम विभागाकडं हस्तांतरीत केल्याचं सांगितलं जातंय.त्या अगोदर पुरातत्व विभागाची लुडबुड येथे चालायची.मात्र बांधकाम विभागाकडं हा परिसर हस्तांतरीत झाल्यानंतरही अवस्था जैसे थेच आहे.चीर महिने लाईट नसल्यानं परिसरातील बगीचा सुकून गेला आहे,त्यामुळं स्थानिक प्रचंड संतापलेले आहेत.समाधी परिसर आमच्या ताब्यात द्यावा असा ग्रामस्थांचा आग्रह आहे.त्यासाठी आंदोलन कऱण्याची देखील तयारी त्यांनी चालविली आहे.

थोडक्यात काय तर समुद्रात स्मारक उभारायचं म्हणत शिवप्रेमींना झुलवत ठेवायचं,रायगडसाठी 520 कोटी दिल्याची घोषणा करून आम्ही काही करतो आहोत हे दाखवायचं प्रत्यक्षात करायचं काहीच नाही ही सरकारची नीती आहे.मागच्या वर्षी नागपूर अधिवेशनातच शिवरायांच्या पुतळ्यासमोरच्या सरकारी मानवंदनेचा मुद्दा उपस्थित झाला होता.आठ दिवसात पुन्हा मानवंदना सुरू होईल असंही तेव्हा सांगितलं गेलं होतं.प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही.कारण त्यासाठी मनुुष्यबळ आणि नीधी नाही. ते खरे नाही  इच्छा शक्तीच नाही ही महत्वाची गोष्ट आहे.महाराजांच्या कर्तुत्वाचे साक्षीदार असलेले किल्ले असे उपक्षित असल्यानं काही ठिकाणी बुरूज कोसळत आहेत तर काही ठिकाणी तोफा चोरीला जात आहेत.सरकार मात्र घोषणा शिवाय काहीच करीत नाही.शिवाजी महाराजांच्या तलवारीचंही रक्षण सरकारला करता येत नाही हे केवळ लाजीरवाणंच नाही तर चीड आणणारं आहे.विरोधकांंनी सरकारला जाब विचारलाच पाहिजे.

रायगडच्या बाबतीत सातत्यानं नकारात्मक बातम्या येत असतात.सरकार तेवढ्यापुरते थातूर-मातूर उत्तर देऊन वेळ मारून नेते.मग सारेच विसरतात.तलवारीच्या बाबतीत देखील असंच होणार आहे.मुद्दा असा आहे की,नेमकं काय झालंय ते लकोांना समजलं पाहिजे.तलवार नैसर्गिकरित्या दुभंगली असो किंवा चोरांनी ती तोडली असो हे दोन्ही प्रकार गंभीर आणि दुर्लक्ष करता येणारे नाहीत हे नक्की.सरकारनं याचा जाब दिलाच पाहिजे.

 एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here