राज्यात गेल्या पाच दिवसात पुणे,यवतमाळ ,दौड आदि ठिकाणी पाच पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका बातमीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी यांची बाजू समजून घेण्यासाठी एसआरएच्या कार्यालयात गेलेले महाराष्ट्र वन न्यूज चॅनलचे अश्विनी डोके आणि नितीन नगरकर यांना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की तर केलीच शिवाय त्यांना तब्बल पाऊणतास डांबुन ठेवले गेले. त्याना अर्वाच्य भाषेत शिविगाळही करण्यात आली.पत्रकारांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पत्रकारांची सुटका केली गेली.
पुणे जिल्हयातील दौड येथील पत्रकार अब्बास शेख यांनी वीज चोरीबाबतची बातमी प्रसिध्द केल्यानंत महावितरणने संबंधित ग्राहकाची वीज चोरी पकडली.पत्रकारामुळेच आपण पकडले गेलोचा राग मनात धरून अब्बास शेख यांच्यावर हल्ला केला गेला.या हल्ल्यात त्यांचा भाऊ आणि चुलताही सहभागी झाले होते,.त्यांच्या आईलाही मारहाण केली गेल्याने त्यांची प्रकृत्ती खालावली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक कांबळे यांच्यासह शहरातील पत्रकारांनी आज पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्यावर आरोपींवर कारावाई करावी अशी मागणी केली आहे.ही घटना केडगाव येथे घडली.
यवतमाळ येथील एका शाळेत मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचारानंतर तेथे उसळलेल्या जनक्षोभाची बातमी घेण्यासाठी गेलेले टीव्ही-9चे प्रतिनिधी विवेक गावडे आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी मनोज जैस्वाल यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला.छायाचित्रण कऱणार्या कॅमेर्यांचीही मोडतोड करण्यात आली.