पवार भाजपला “कात्रजचा घाट” दाखविणार ?

0
1278

एक चर्चा आहे.त्यात किती तथ्य आहे माहिती नाही.पण राष्ट्रवादीने भाजपला कात्रजचा घाट दाखविण्याचं ठरवलंय म्हणे.राष्ट्रवादीनं निकालाच्या दिवशीच भाजपला एकतर्फी पाठिंबा दिला होता.नंतर विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात उपस्थित राहणार नाहीत असं शरद पवार यांनी जाहीर केलं होतं. सरकारला स्थैर्य मिळावे यासाठी आपण हा पाठिंबा देत आहोत असं राष्ट्रवादीने जाहीर केलेले असले तरी जर सरकार स्थिर राहिले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत हे पवारांना पक्क माहिती असल्यानं सरकार अस्थिर असण्यातच राष्ट्रवादीचे हित आहे हे देखील पवार जाणून आहेत. त्यामुळे हे सरकार अस्थिर करण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याची योजना पवारांनी आखल्याचे सांगितले जात आहे.पवारांच्या डोक्यातील या योजनेवर चर्चा कऱण्यासाठी आज शरद पवार यानी पक्षातील वरिष्ठ नेत्याबरोबर बैठक घेतली. चर्चेचा तपशील बाहेर आलेला नसला तरी भाजपला कात्रजचा घाट दाखविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे असे संकेत मिळत आहेत.म्हणजे राष्ट्रवादीने अधिकृतपणे वेगळी भूमिका घ्यायची पण ती आमदारांनी मान्य करायची नाही.काही आमदारांनी सभागृहात बसून विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करायचे . असे झाले तर देवेंद्र फडणवीस याचं सरकार कोसळणार आणि भाजपचीही देशभर नाचक्की होईल.सरकार अस्थिर होईल.पवारांचा गतइतिहास बघता पवार कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि शब्द फिरविण्यातही त्यांचा हातखंडा असल्याने अशक्य वाटणारी ही योजना प्रत्यक्षात आली तर जराही धक्का बसण्याचं कारण नाही.या चचेर्र्ला पुष्टी देणारी आणखी एक बातमी आजच आलीय.शिवसेनेच्या तीन नेत्यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची भेट घेतल्याबाबतची ती बातमी आहे.विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉग्रेस एकत्र येत असल्याचे त्या बातमीत म्हटले आहे.अजित पवार यांची सेना नेत्यांनी भेट घेणे हे भाजपवर दबाव आणण्याच्या राजकारणाचा एक भाग असल्याचे काहींचे म्हणणे असले तरी गोष्टी वाटतात तेवढ्या साध्या नाहीत.त्यामुळे येत्या 12 तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते हे नक्की.अर्थात तत्पुर्वी सेना-भाजपचे सूत जुळले तर मग शरद पवारांच्या साऱ्या योजना केवळ त्यांच्या डोक्यातच विश्रांती घेत राहतील हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here