‘परिषदेशी जोडलेला कोणताही पत्रकार एकाकी नाही’ याचा असा आला प्रत्यय…

पुणेः ‘मराठी पत्रकार परिषद किंवा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीबरोबर जोडला गेलेला कोणताही पत्रकार एकाकी नाही,एकटा नाही परिषदेशी प्रचंड शक्ती त्याच्या पाठिशी असते’ याचा प्रत्यय आज नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा तमाम पत्रकारांना आणि महाराष्ट्राला आला.दोन पत्रकार एकत्र येत नाहीत हा राजकारण्यांच्या डोक्यात असलेला परंपरागत समज आज तोष्णीवाल यांच्या मदतीसाठी जे हजारो हात धावून आले त्यामुळं दूर व्हायला हरकत नसावी.

हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तोष्णीवाल कळमनुरी येथे वास्तव्य करून असतात.काल रात्री साडेआठच्या   सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला.ही बातमी पुण्यात एस.एम.देशमुख आणि मुंबईत किरण नाईक यांना रात्री साडेनऊच्या सुमारास परिषदेचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विजय दगडू यांच्याकडून समजली.त्यानंतर देशमुख आणि नाईक यांनी परिषदेची सारी शक्ती तोष्णीवाल यांच्या पाठिशी उभी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.तोष्णीवाल यांच्यावर तातडीने उपचार होणे अगत्याचे होते.त्यामुळं त्यांना नांदेडला हलविण्याची व्यवस्था विजय दगडू यांच्या मार्फत केली गेली.रात्री साडेअकराच्या सुमारास तोष्णीवाल नांदेडला ऋुतूराज जाधव यांच्या रूग्णालयात पोहोचले.तेथे देशमुख यांच्या सूचनेवरून काही पत्रकार उपस्थित होते.स्वतः विजय दगडू रात्री उशिरापर्यंत तोष्णीवाल यांच्या समवेत होते.तर देशमुख आणि नाईक रात्री उशिरापर्यंत तोष्णीवाल यांच्या मुलाच्या संपर्कात होते.आज सकाळी परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी,परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी यांनी रूग्णालयात जाऊन तोष्णीवाल यांची भेट घेऊन उपचार व्यवस्थित होतील याची काळजी घेतली.आज सायंकाळी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया केली गेली.आता तोष्णीवाल यांची प्रकृत्ती सुधारत आहे.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुुख तसेच परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांना ही बातमी समजल्यानंतर ती लगोलग मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली ..हिंगोलीचे जिल्हा पोलीस प्रमुख तसेच कळमनुरीचे पीआय ,चौकशी अधिकार्‍यांशी संपर्क साधून आरोपींना  तातडीने अटक व्हावी अशी मागणी केली .त्यानंतर आज संजीव कुलकर्णी,विजय जोशी आणि अन्य पदाधिकार्‍यांनी पोलीस महानिरिक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि आरोपींना अटक कऱण्याची मागणी केली.परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा अकोल्याला असतात.सरचिटणीस अनिल महाजन धारूरला असतात.हे दोघेही आज अगोदर हिंगोलीला पोहोचले.माजी अध्यक्ष माधवराव अभोंरेही हिंगोलीत आले.तेथे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन निवदेन दिले.परिषदेचे हे पदाधिकारी नंतर कळमनुरीला गेले .तेथे स्थानिक पोलीस अधिकार्‍यांची आणि पत्रकारांची भेट घेऊन त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन नाईक सिंधुदुर्गला असतात.त्यांनी दीपक केसरकर यांना फोन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.केसरकर यांनी एसपींना फोन करून योग्य त्या सूचना केल्या.एवढेच नव्हे तर आज व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकवरून या घटनेच्या निषेधाचा पाऊस पडला.आखाडा बाळापूर,अंबाजागोई पासून रायगड पर्यंत सर्वत्र घटनेचा निषेध केला.हजारो हात तोष्णीवाल यांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र या निमित्तानं दिसले.पोलिसांवर त्यामुळं दबाब आला आणि सारी यंत्रणा कामाला लागली.

आता कोणताही पत्रकार एकटा किंवा एकाकी नाही असं परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती वारंवार सांगत असते.त्याचा सुखद प्रत्यय आज आला.यातून राजकारणयांचा दोन पत्रकार कधी एकत्र येत नाहीत हा परंपरागत समज तर खोटा ठरलाच पण वेळ आली की,हे सारे एकत्र येतात हा संदेश या निमित्तानं सर्वाना पोहोचला आहे.पत्रकारांवर हल्ला झाला,पत्रकार आजारी असेल,पत्रकार आर्थिक अडचणीत असेल तर परिषद आणि हल्ला विरोधी समिती धावून येते याची जाणीव पत्रकारांना झाली असून हा फारच सुखद बदल पाहून पत्रकारांमध्ये नवा आत्मविश्‍वास आला आहे.

तोष्णीवाल यांच्यावर हल्ला नेमका कश्यामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही.मारेकरीही अद्याप सापडले नाहीत.हा हल्ला शेतात आणि अंधारात घडल्यामुळे तोष्णीवाल यांनी आरोपींना पाहिलेले नाही.मारेकरी तोंडं झाकून आलेले होते.पोलिसांच्या चौकशीतून सारा प्रकार समोर येईल.( मराठी पत्रकार परिषद सोशल मिडिया कक्ष ) –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here