परिषदेच्या आंदोलनास अभूतपूर्व यश

0
635

जाहिरात दरवाढ,पेन्शन,संरक्षण कायदा आणि मजिठियासाठी हल्ला बोल  

मराठी पत्रकार परिषदेच्या आंदोलनास अभूतपूर्व यश

27 जिल्हयात डीआयओ कार्यालयासमोर पत्रकारांची निदर्शने 

मुंबई दिनांक 25 ( प्रतिनिधी) छोट्या वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात  वाढ करावी,पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा,पत्रकार पेन्शन योजना सुरू करावी आणि मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी आदि मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या महाराष्ट्र व्यापी आंदोलनास आज सर्वत्र भरघोष पाठिंबा मिळाला. राज्यातील  27 जिल्हयातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयासमोर पत्रकारांनी आज निदर्शने करून आपला आक्रोश व्यक्त केल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज येथे एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात गेली कित्येक वर्षे वाढ केली नाही,तसेच गेली पाच पाच वर्षे सरकारी जाहिरातीची बिलंही दिली गेली नाहीत.त्यामुळे वृत्तपत्रे चालविणे कठिण होत आहे.त्याबद्दल राज्यभर पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या मालकांच्या मनात मोठा असंतोष आहे.जाहिरात धोरणात सुसूत्रता आणून छोटी वृत्तपत्रे जगली पाहिजेत अशा पध्दतीनं जाहिरातींचं वितरण करावं अशी परिषदेची मागणी आहे. त्याच बरोबर निवृत्त पत्रकारांना पेन्शन सुरू कऱण्याचे  चॉकलेट सरकार देत आहे.केवळ  वायदे केले जात आहेत प्रत्यक्षात पेन्शन सुरू केली जात नसल्यानेही मोठा असंतोष आहे.त्याबद्दलही सरकारला जाग आणण्याचा उद्ेश आजच्या आंदोलनामागे होता.महाराष्ट्रात दर तीन दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो.हे वास्तव वेळोवेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कायदा करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.याबाबतही सरकार कालापव्यय करीत असल्याबद्दल पत्रकारांमध्ये मोठी नाराजी असून सरकार कायदा करीत नसल्याने हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.ही बाबही सरकारच्या निदर्शनास आणून दिली गेली आहे.शिवाय सर्वोच्च न्यायालयाने मजिठिया आयोगाच्या शिफारशींबाबत अंतिम आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने श्रमिक पत्रकारांमध्ये मोठी अस्वस्थतः आहे.या विषयावर कामगार मंत्री सर्व संबंधित घटकांची बैठक घेऊन मार्ग काढतील असे आश्‍वासन सभागृहात दिल्यानंतरही कामगार मंत्री बैठक घ्यायला तयार नाहीत.दोन वेळा ठरलेली बैठक ऐनवेळी रद्द केली गेली.त्याबद्दलही पत्रकारांनी आज संताप व्यक्त केला.

27 जिल्हयातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी आज जोरदार निदर्शने केली आणि मागण्यांचे निवेदन जिल्हा माहिती अधिकार्‍यांना दिले.पुण्यात परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.पन्नासच्यावर पत्रकारांनी जोरदार घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. अकोल्यात कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,नाशिकमध्ये सरचिटणीस यशवंत पवार,रायगडमध्ये कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर,सांगली,लातूर,बीड,परभणी,नंदूरबार,,पालघर,ठाणे,जळगाव ,भंडारा ,गडचिरोली , अहमदनगर ,बुलढाणा,यवतमाळ,अमरावती,धुळे नासिकसह 27 जिल्हयात हे आंदोलन झाले.सातार्‍यात जिल्हा माहिती अधिकारी यांना फुल देऊन आणि डोक्यावर टोपी घालून गांधीगीरीच्या मार्गाने आंदोलन केले गेले.मराठवाड्यातील काही जिल्हयात कलेक्टर घोषित सुटी असल्याने तेथे आंदोलन उद्या केले जाणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या  या आंदोलनानंतरही .पत्रकारांचा हा असंतोष सरकारने गंभीरपणे घेतला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन कऱण्याचा इशारा मराठी पत्रकार परिषदेने दिला आहे.आजचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल अध्यक्ष एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर तसेच विभागीय सचिवांनी विविध जिल्हा अध्यक्ष,तेथील पदाधिकारी तसेच परिषदेचे सदस्य आणि आंदोलनात सहभागी झालेल्या  तमाम पत्रकारांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here