जिंतूर येथील देशोन्नतीचे वार्ताहर राजू देशमुख आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या जीवघेण्याहल्ल्यामुळे संतप्त झालेल्या परभणी येथील पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.राजू देशमुख यांच्यावर हल्ला कऱणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,आणि पत्रकार संरक्षण कायदा करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले आहे.झी-24 तासच्या प्रतिनिधी कल्पना मुंदडा यांनी त्या आजारी असताना शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून मदतीसाठी अर्ज केलेला असतानाही तो अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला त्याबद्दल नाराजी व्यक्त करून पत्रकारांनी मुंदडा यांच्या नातेवाईकांना तातडीने मदत करावी अशी मागणीही आजच्या बैठकीत केली आहे.परभणीतील बहुसंख्य पत्रकार बैठकीला उपस्थित होते. या आंदोलनास महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने आपला पाठिंबा व्यक्त केला असून हे प्रकरण गृह राज्यमंत्री श्री.राम शिंदे यांच्याही कानावर घालण्यात आले आहे.
दरम्यान राजू देशमुख आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य काही आरोपी फरार आहेत.त्यांच्यावर 307 कलमाखाली गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.