हे राम !

तब्बल 1 वर्षे 4 महिने मृत्यूशी झुंज देणार्‍या जिगरबाज पत्रकार राम खटके याची मंगळवारी दुपारी प्राणज्योत मालवली आणि अनेकांनी हळहळ व्यक्त केली.रामच्या अकाली निधनामुळे अनेकजण शोकसागरात बुडाले आहेत.त्याचे जाणे अनेकांच्या मनाला चटका लावणारे आहे
राम खटके याचे वय साधारण 30 ते 32 वर्षे. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडीच्या एका शेतकरी कुटुंंबात रामचा जन्म झाला.घरात पत्रकारितेचा कसलाही वारसा नसताना रामने पत्रकारितेची पदवी घेतली.सुरूवातीस गावकरी,त्यानंतर यशवंत आणि नंतर दिव्य मराठीत तो पत्रकार म्हणून कार्यरत होता.यशवंतमध्ये 3 हजार रूपयावर काम करणार्‍या रामला दिव्य मराठीने सुरूवातीस बारा हजार रूपये पगार दिला.त्यानंतर त्याने लग्न केले.लग्नानंतर त्यास एक मुलगाही झाला,सुखाचे दोन घास असताना काळाने त्याच्यावर घाला घातला.
दि.5 सप्टेंबर 2015 रोजी तो मोटारसायकलवरून घराकडून ऑफीसकडे जात असताना समोरून येणार्‍या मोटारसायकलस्वाराने त्याला जोरदार धडक दिली,त्यात तो मोटारसायकलवरून खाली पडला आणि त्यास डोक्यास आणि पर्यायाने जबर मेंदूस मार बसला.तो गंभीर जख्मी असताना त्यास उपचारासाठी सोलापूरच्या काटीकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.उपचाराचा खर्च मोठा होता.त्यामुळे रामला आर्थिक मदत मिळावी यासाठी मी प्रयत्न सुरू केले.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,मंगेश चिवटे आणि विनोद जगदाळे यांच्या प्रयत्नामुळे रामच्या उपाचारासाठी मुख्यमंत्री निधीतून 1 लाख 90 हजार मिळाले,तसेच दिव्य मराठी प्रशासनानेही मोठी मदत केली.तब्बत एक वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्याच्या डोक्याची कवटी तीनदा काढून पुन्हा बसवण्यात आली होती.मात्र तो फक्त जिवंत होता,त्याच्या सर्व हालचाली मंदावल्या होत्या.या काळात त्याच्या पत्नीने आणि वडीलांनी त्यांची सर्व देखभाल केली.भावाने आणि त्याच्या मेहुण्यानेही मदत केली,मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.रामच्या पत्नीने गेल्या 1 वर्षे 4 महिन्यात जो त्रास सहन केला,त्याची तुलना पुराणातील सावित्रीशीच करावी लागेल.या भगिनीला सलाम.
रामने हेल्मेट वापरले असते तर राम वाचला असता असे अनेकांचे म्हणणे,परंतु जर -तरला काळाचे उत्तर नाही.राम सर्वांना सोडून गेला आहे.त्याचे आकाली जाणे त्याच्या सर्व मित्रपरिवाराला मोठा धक्का आहे.एक चांगला मित्र हरपला आहे,नव्हे काळाने हिरावून घेतला आहे.आता रामच्या पत्नीस आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तीच रामला खरी श्रध्दांजली ठरेल.

– सुनील ढेपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here