पत्रकार प्रवीण पुरोचा उरणला सत्कार

0
838

 

काल उरणमध्ये होतो.विधीमंडळ आणि वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण पुरो यांचा माझ्या हस्ते सत्कार झाला.अघ्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येणं,सत्कार समिती स्थापन करणं आणि ह्रद्य असा सत्कार सोहळा आयोजित करणं हे भाग्य फारच थोड्या पत्रकारांच्या वाट्याला येत असेल.हॉल गच्च भरला होता.सर्व स्तरातील सर्वपक्षीय मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती.विशेष म्हणजे प्रवीणच्या वृध्द मातोश्री लक्ष्मीबाई पुरो उपस्थित होत्या.आईसमोर मुलाचा सत्कार होणं हे त्या मातेसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो.तो आनंद प्रवीणच्या आईला मिळाला होता.यावेळी साऱ्यांचीच भाषणं भावणारी होती.
माझ्यासाठीही उरणचा कार्यक्रम आनंदाचा होता.रायगडात असताना बऱ्याचदा उरणला गेलो होतो.अलिकडं चार-पाच वर्षात उऱणला जाता आलं नाही.काही वर्षांपूर्वी आम्ही रायगडच्या पत्रकारानी उरणच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाचर्चा नावाचा कार्यक्रम घेतला होता.उरणमधील अनेक प्रश्नांची तेथे चर्चा झाली होती.पण उरणमध्ये असताना त्यापैकी एकही प्रश्न मार्गी लागलाय असं दिसलं नाही.याचं कारण उरणला पूर्ण आमदार कधी मिळालाच नाही.अगोदर उरण अलिबागला जोडलेले होते,नंतर ते पनवेलला जोडले गेले,आता उरण स्वतंत्र मतदार संघ झाला असला तरी या मतदार संघाला पनवेलचा मोठा भाग जोडलेला आहे.त्यामुळे विद्यमान आमदारांचेही पनवेलकडेच जास्त लक्ष असते.ही खंतही अनेक वक्त्यांनी बोलून दाखविली.तसेच प्रवीण हा हाडाचा पत्रकार आहे.कार्यकर्ता पत्रकार आहे,चळवळीतही त्याचा सहभाग असतो त्यामुळे उरणचा प्रतिनिधी म्हणूनच तो विधानसभेत काम करेल अशी अपेक्षा उपस्थित साऱ्यांनीच व्यक्त केली.
माझ्या हस्ते सत्कार झाल्यानंतर असंख्य उरणकरांनी प्रवीणला पुुष्पगुच्छ देऊन आणि शाल घालून त्यांचा सत्कार केला.चांगल्या काय्रक्रमास उपस्थित राहिल्याचा आनंद मलाही झाला.
पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बातम्या वाचून अस्वस्थ होणाऱ्या माझ्या मनाला एका पत्रकाराचा एवड्या अपुलकीन सत्कारही होऊ शकतो हे चित्र मला नक्कीच आनंद देणारे होते.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रत्येक पत्रकाराच्या पाठिशी समाजनं उभं राहिलं पाहिजे ही अपेक्षा मी उरणलाही व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here