पत्रकारांच्या आरोग्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. प्रकृतीकडे पत्रकारांचे होणारे दुर्लक्ष हेच याचे कारण आहे. या निष्काळजीपणाची जबर किंमत राज्यात काही तरूण पत्रकारांना मोजावी लागली आहे.यावर मार्ग काढण्यासाठी दोन वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेने राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी अभियान सुरू केलेले आहे.दर वर्षी 3 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी आपल्या सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी अशी या अभियानामागची कल्पना आहे.3 डिसेंबर 2015 रोजी राज्यातील बहुतेक जिल्हा संघांनी आरोग्य तपासणी शिबिरं घेतली होती.मात्र तेव्हा ही शिबिरं घेणं ज्यांना शक्य झालं नाही अशा जिल्हा आणि तालुका संघांनी 6 जानेवारी रोजी शिबिरांचे आयोजन केलं आहे.त्यात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघांचा समावेश आहे.रायगडमधील सर्व पत्रकारांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी केले आहे.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकात जिल्हयातील जास्तीत जास्त पत्रकारांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.एक चांगला उपक्रम आहे.जास्तीत जास्त पत्रकारांनी याचा लाभ घेऊन डायबेटीस पासून अन्य चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.प्रकृत्तीकडं दुर्लक्ष म्हणजे थेट मृत्युशी गाठ हे सार्यांनी लक्षात ठेवावं.या शिबिरांमधून एखादया पत्रकारास गंभीर आजार असल्याचे निष्प्ण्ण झालं तर त्याच्यावर मुंबईत उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांची एक आरोग्य कक्ष स्थापन केला असून मुंबईत पत्रकार रूग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचा या कक्षाचा प्रयत्न असणार आहे.–