गोंधळाची बातमी दिली, मनपान
पत्रकार गॅलरीला ठोकले कुलूप
नांदेड, दि. २६ (प्रतिनिधी)-कै.डॉ.शंकरराव चव्हाण नगराध्यक्ष असल्यापासून राममनोहर लोहिया सभागृह ते आताचे कै.शंकरराव चव्हाण सभागृह महापालिका यामध्ये पत्रकारांना बसण्यासाठी व वार्तांकन करण्यासाठी तसेच छायाचित्रीकरणासाठी कधीही मज्जाव करण्यात आला नव्हता. मात्र आज अचानक महापालिकेने चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची मुस्कटदाबी करुन सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी व वार्तांकनासाठी गॅलरीमध्ये मज्जाव केला. याचा मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते, अशा भावना मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव तथा सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत.
आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात विजय जोशी यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी सबंध देशभरात व महाराष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी विविध सभागृहात व स्थानिक स्वराज्य संस्थात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहापासून ते विधानसभेच्या सभागृहातही पत्रकारांना प्रवेश दिला जातो. तेथे सन्मान केल्या जातो, मात्र आज नांदेड वाघाळा महापालिकेने लोकशाहीच्या या चौथा स्तंभाचा गळाच घोटला आहे. मागच्या सभेच्यावेळी एका नगरसेवकाने केलेल्या गोंधळाचे चित्रीकरण सर्व चॅनलनी प्रसिध्द केल्यानंतर चिडलेल्या महापालिकेने गुपचूपपणे पत्रकारांची गॅलरी बंद करुन त्याला सिल ठोकले आहे. पत्रकारांचा आवाज पूर्णपणे बंद करण्यासाठी केलेली ही कृती निषेधार्ह आहे. महापालिकेच्या कारभाराचे वार्तांकन करुन जनतेसमोर आणण्याचा पत्रकारांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. सभागृहात नेमके काय चालते, याची माहिती आम जनतेला व्हावी, यासाठी सर्वच सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश ठेवण्यात आला आहे. महापालिकेची वास्तू निर्माण झाल्यानंतर शंकरराव चव्हाण सभागृह महापालिका याठिकाणी नगरसेवकांचे पती व नागरिक तसेच पत्रकारांसाठी विशेष दालन निर्माण करण्यात आले आहे. मात्र आज ते दालन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. लोकशाहीचा आवाज दाबण्यासाठी व वस्तूस्थिती समोर आणण्यासाठी पत्रकार याठिकाणी येत असतात. मात्र चिडलेल्या मनपा पदाधिकारी प्रशासनाने आज हे दालन बंद करुन लोकशाहीचीच मुस्कटदाबी केली आहे. याचा मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून, यापुढे महापालिकांच्या बातम्यावर तसेच प्रसिध्दी पत्रकावर पत्रकारांनी बहिष्कार घालावा, असे आवाहनही विजय जोशी यांनी केले आहे.