पत्रकार इसाक मुजावर यांचे निधन

0
867

मुंबईत पाच दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीवर सातत्याने लिखाण करणारे ज्येष्ठ सिनेअभ्यासक, पत्रकार इसाक मुजावर यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी आणि सामान्य वाचकांमधील ‘दुवा’ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

१९५५ पासून मुजावर यांनी सातत्याने सिनेसृष्टीवर लिखाण केले. सिनेसृष्टीची बित्तमबातमी त्यांच्याकडे असायची. सिनेसृष्टीवर लिहिलेले असंख्य लेख, तब्बल २० पेक्षा अधिक पुस्तकं आणि अमाप लोकसंचय ही मुजावर यांनी जमवलेली पुंजी. त्यांची सुवर्ण महोत्सवी कारकीर्द लक्षात घेऊन चित्रपट महामंडळाने गेल्यावर्षीच त्यांचा चित्रभूषण पुस्कार देऊन गौरव केला. सिनेसृष्टीतल्या योगदानाबद्दल कलाकार, तंत्रज्ञांचा सत्कार वारंवार होत असतो. उलट या सृष्टीला लोकांसमोर आणणाऱ्या पत्रकाराची दखल या बाबतीत फारशी घेतली जात नाही. मात्र, मुजावर यांच्यासाठी चित्रपट महामंडळाने हा पायंडा मोडला. चित्रभूषण पुरस्कार देऊन मुजावर यांनी सिनसृष्टीला दिलेल्या योगदानाची महामंडळाने कदर केली.

मुजावर मूळचे कोल्हापूरचे. १९५० च्या दशकात सुरुवातीपासून ते एका सिनेसाप्ताहिकात कार्यरत होते. र. गो. सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लिखाण सुरू केलं. तेव्हा अवघी मराठी सिनेसृष्टी कलापुरात एकवटली होती. सिनेविश्वात असलेली मुजावर यांची रुची लक्षात घेऊन १९५८ च्या आसपास त्यांना ‘रसरंग’ने कार्यकारी संपादकपद दिलं. त्यावेळेपासून या पत्रकाराने आपली लेखणी घेऊन चौफेर मुशाफिरी सुरू केली. अनेक वृत्तपत्रात त्यांनी लेखन केलं. भालजी, व्ही. शांताराम, अनंत माने यांच्यापासून सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी अशा असंख्य माणसांशी त्यांनी मैत्री केली आणि त्या मैत्रीतून उलगडणाऱ्या आठवणी केवळ आपल्यापुरत्या न ठेवता सिनेसृष्टीवर अपार प्रेम करणाऱ्या मराठी वाचकांसाठी खुल्या केल्या त्या आपल्या पुस्तकांमधून. ‘एका सोंगाड्याची बतावणी’, ‘चित्रमाऊली’, ‘मीनाकुमारी’, ‘मुखवटा’ आदी पुस्तकांपासून अगदी अलीकडे त्यांनी मराठी सिनेमाचा ८०० पानी इतिहासही आजच्या पिढीसमोर ठेवला आहे.

हिंदीसृष्टीबाबतही मुजावर यांनी विपुल लेखन केलंय. मुजावर यांचं सर्व लिखाण निरीक्षण स्वानुभावावर बेतलेलं आहे. त्यांनी सिनेसृष्टीतल्या कलाकारांना प्रसिद्धी दिलीच, परंतु सामान्य वाचक आणि कलाकार यांच्यात आपल्या लेखणीने दुवाही साधला. दुर्दैवाने मुजावर यांच्या जाण्याने हा दुवा आज निखळला आहे.

भालजींची मुलाखत मुजावरांनी दिली!

मुजावर आणि सिनेसृष्टी यांचं अतुट नातं होतं. त्याचे अनेक दाखलेही आहेत. भालजी पेंढारकर अगदी आजारी असतानाची एक गोष्ट आहे. भालजींना धड बोलता येत नव्हतं. विस्मरण व्हायचं. त्यावेळी काही पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला गेले. तेव्हा भालजी त्यांना म्हणाले, ‘मला आता नीट बोलता येत नाही. लक्षातही रहात नाही. तुम्ही असं करा, इसाककडे जा आणि माझ्यासाठी काढलेले प्रश्न त्याला विचारा. तो जे बोलेल ते छापा. कारण माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त त्याला माहिती आहे.’ एकटे भालजीच नाही सर्वांचाच मुजावर यांच्यावर दृढ विश्वास होता.(मटा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here