पत्रकारांवरील हल्ल्यांची सहा महिन्यात ‘ हाफ सेंच्युरी’

पत्रकार संरक्षण कायदा करण्यास सरकार टाळाटाळ

करती असल्याने हल्ले वाढलेः एस.एम.देशमुख 

मुंबई दिनांक 18  (प्रतिनिधी) पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्यानेच राज्यात पत्रकारांवरील हल्ल्लयांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गावातच नागपुरमध्ये आज पाच पत्रकारांवर संस्था चालकांनी केलेल्या हल्ल्याचा एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे   तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. हिंगणा येथील आहित्याबाई होळकर आश्रम शाळेतील गैरव्यवहारची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र वनचे ब्युरो चीफ गजानन उमाटे,कॅमेरामन सौरभ होले तसेच आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर सुरभी शिरपूरकर,कॅमेरामन प्रशांत मोहिते,आणि सुनील लोढे गेले असता संस्था चालकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.ही घटना संतापजनक असून संबंधित हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणार्‍या अशा हल्ल्याची ही पहिलीच घटना नसून गेल्या सहा महिन्यात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या तब्बल पन्नास घटना घडल्या असून त्यात 61 पत्रकारांना मारहाण केली गेली आहे.त्यात चार महिला पत्रकारांचाही समावेश आहे.या शिवाय पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीच्या 21 घटना घडल्या असून खोटे  गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याची 13 प्रकरणे समितीकडे आलेली आहेत. सरासरी चार दिवसाला पत्रकारांवरील हल्ल्याची एक  घटना राज्यात घडत आहे.तेव्हा सरकारने आता पत्रकारांचा जास्त अंत न बघता याच अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा करावा अशी मागणीही देशमुख यानी केली आहे।

पत्रकारांवरी हल्ल्याच्या घटना  मुंबई,पुणे,नागपूर या महानगरांबरोबरच हिंगोली,नासिक,गंगाखेड,नांदेड,घाटकोपर,भोकरदन,जत,चंद्रपूर,पथराड जळगाव,औरंगाबाद,उल्हासनगर,औरादशहाजनी,आष्टी,मालेगाव,बीड,मालवण,नवीमुंबई,खामगाव,कोल्हापूपेठ,इंदापूर,फुलसांगवी,शिरोळ,पोलादपूर,भिवंडी,बारामती,सोलापूर,तेर,सुरगणा,वाठोडा शुक्लेश्‍वर,यवतमाळ,दौड आदि ठिकाणी घडल्या आहेत. गेल्या वर्षी पत्रकारांवरील हल्ल्याच्या 72 घटना घडल्या होत्या.यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांनी अर्धेशतक गाठल्याने नव्या सरकारच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखायचे असतील तर पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी पत्रकार सातत्यानं करीत असून त्यासाठी सनदशीर मार्गाने पत्रकारांनी वेळोवेळी आंदोलनंही केली आहेत.मागील अधिवेशन काळात पत्रकारांच्या या मागणीस समर्थन देणारी 160 सर्वपक्षीय आमदारांची पत्रे देखील मुख्यमंत्र्यांना सादर केली  आहेत.या संदर्भात सरकारने कायद्याचा एक मसुदाही तयार केला असून त्यावरील आक्षेप आणि सूचनाही पत्रकार संघटनांनी सरकारला सादर केलेल्या आहेत मात्र अजूनही कायद्याचा विषय संरकार फार गंभीरपणे घेत आहे असे दिसत नाही.सरकारने या अधिवेशन काळात पत्रकार संरक्षण कायदा केला नाही तर  लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी राज्यभर पत्रकार तीव्र आंदोलन करतील असा इशाराही   एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

LEAVE A REPLY