केंद्र सरकार म्हणतेय,महाराष्ट्रात केवळ एकाच पत्रकारावर हल्ला
“खोटं बोल पण रेटून बोल” असा वाक्प्रचार ग्रामीण भागात रूढ आहे.सरकारचं एकूण वर्तन असंच आहे.किती थापा माराव्यात आणि त्याही लोकसभेत याला काही अंत राहिलेला नाही.पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या देशात चिंता वाटावी एवढी वाढली आहे.एकटया महाराष्ट्रात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो आहे,त्याचा नावासह आणि घटनास्थळासहचा तपशील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडं असताना,रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डस किंवा कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट सारख्या अंतरराष्ट्रीय संस्था भारतातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त करीत असताना देशाचे गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांना मात्र देशातील पत्रकार निर्धोकपणे आपलं काम बजावत आहेत असं वाटतं म्हणूनच त्यांनी नाना पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रासह देशातील पत्रकारांवरील हल्ल्यामध्ये घट झाल्याचे ठोकून दिले आहे.
बेकायदेशीर खनन, विविध क्षेत्रांतील गैरव्यवहार आदींबाबत सडेतोड वार्तांकन करणा-या देशातील पत्रकारांवरील हल्यांसंदर्भात श्री. पटोले यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्न विचारला होता. केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी या संदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात वर्ष २०१५ मध्ये देशात पत्रकारांवरील हल्यांच्या एकूण २८ घटनांची नोंद झाली असून या प्रकरणांमध्ये ४१ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांवरील हल्यासंदर्भात प्रत्येकी एका घटनेची नोंद झाली आहे. मध्यप्रदेशात पत्रकारांवरील हल्याच्या १९ घटनांची नोंद झाली असून या संदर्भात ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. मणीपूर मध्ये ९ जणांना अटक करण्यात आली. राजस्थान मध्ये पत्रकारांवरील हल्याच्या ५ घटनांची नोंद झाली आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेश वगळता देशातील अन्य राज्य व एकाही केंद्र शासीत प्रदेशात पत्रकारांवरील हल्याच्या घटनेची नोंद झाली नसल्याचे गृहमंत्रालयाच्या माहितीत समोर आले आहे. राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची नुसार ‘पोलिस’ आणि ‘लोक व्यवस्था’ हा राज्यांचा विषय असून पत्रकारांसह राज्यातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधीत राज्यांची आहे. यासंदर्भातील वर्तमान कायदाच उपयुक्त आणि प्रभावी असल्याचे गृहमंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
याशिवाय, २००५ च्या ‘रिपोर्टर्स विदाउट बोर्डस’ या अहवालानुसार देशात पत्रकारांसाठी असुरक्षित वातावरण असल्याची माहिती संदिग्ध असल्याचे गृह मंत्रालयाने श्री. पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे. या अहवालासाठी वापरण्यात आलेली पध्दती चुकीची आहे. तसेच, भारत देशात प्रसार माध्यमांना असलेल्या स्वातंत्र्याची खरी माहिती या अहवालात अधोरेखीत झाली नसल्याचे गृहमंत्रालयाच्या माहितीत म्हटले आहे.
हसंराज अहिर यानी दिलेली माहिती चुकीची,दिशाभूल करणारी आणि राज्यातील आणि देशातील पत्रकारांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.महाराष्ट्रात केवळ एकच हल्ला झालेला आहे म्हणणारे अहिर वस्तुस्थितीचा विपर्यास करीत आहेत.राज्यात गेल्या वर्षी 63 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत आणि यावर्षीच्या अकरा महिन्यात 74 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.त्याची तपशीलवार माहिती अहिर यांना हवी असल्यास आम्ही द्यायला तयार आहोत.सारे अलबेल सुरू आहे,देशातील पत्रकार मुक्तपणे आपले कर्तव्य बजावत आहेत हे दाखविण्यासाठी अधिकृतपणे खोटी माहिती देण्याचा प्रयत्न अहिर यांनी केला असून तो संतापजनक आहे.एकीकडे प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष देशातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यबद्दल चिंता व्यक्त करून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची गरज प्रतिपादन करतात,राज्याचे माहिती सचिव महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याच्यादृष्टीने तयारी पूर्ण झाल्याचे सांगतात आणि अहिर मात्र राज्यात केवळ एकाच पत्रकारांवर हल्ला झाल्याचे सांगून विषयाचे गांभीर्यच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतात हे नक्कीच चीड आणणारे आहे.हे करताना आंतरराष्ट्रीय संस्थांना देखील खोटं ठरविणयाचा त्यांचा प्रयत्न आहे.विरोधी पक्षाच्या खासदारांनी याविरोधात आवाज उठविला पाहिजे.
“पत्रकार संरक्षण कायदा केंद्रानेच करावा” अशी मागणी परवाच मुंबईत प्रेस कौन्सिलच्या काही सदस्यांनी केली आहे.मात्र अहिर यांच्या उत्तरानं या मागणीला ‘वाटाण्याच्या अक्षता’ दिल्या गेल्या आहेत.त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की,’पोलीस आणि लोकव्यवस्था हा राज्यांचा विषय असून पत्रकारांसह राज्यातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सबंधित राज्यांची आहे’ असं सांगून त्यांनी केंद्र सरकार असा कायदा करणार नसल्याचे सूचित केले आहे.’वर्तमान कायदाच अधिक प्रभावी आणि उपयुक्त’ असल्याची टिपणीही त्यांनी केली आहे.दिल्लीतील पत्रकारांच्या अनेक संघटनांनी या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला आहे.मात्र सरकार आता हात झटकताना दिसते आहे.