मुंबईः पत्रकारांची भूमिका नेहमीच विरोधी पक्षाची असते.तशी ती असावी.मात्र सत्ताधार्यांना हे मान्य नसते.पत्रकारांनी सत्तेपुढं लाचार व्हावं,सत्ता जे सांगेल तेच छापावं किंवा दाखवावं असं सत्ताधार्यांना वाटत असतं.हे जेव्हा होत नाही आणि पत्रकार जेव्हा सत्य जगासमोर आणतात तेव्हा सत्ताधार्यांना मग पत्रकार नंबर एकचे शत्रू वाटतात.मग कोणी यांना दंडुक्यानं ठोकलं पाहिजेची भाषा करते तर कोणी पत्रकारांपेक्षा विरोधक बरे अशी भाषा करते.सत्ताधारी कोणीही असो पत्रकारांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन मात्र समान असतो.महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा हेच दाखवून दिलंय .
गोष्टय जळगावची.दुष्काळी परिस्थितीची पाहणी कऱण्यासाठी चंद्रकांत पाटील काल जळगाव जिल्हयाच्या दौर्यावर होते.या दौर्यात पत्रकारांनी टँकरनं पाणी पुऱवठा होणार नाही काय ? असा प्रश्न करताच चंद्रकांत पाटील संतापले आमि ‘पत्रकारांपेक्षा विरोधक बरे’ असे त्यांनी वक्तव्य केलं.टँकरनं पाणी पुरवठा करणं तांत्रिकदृष्टया योग्य नसल्यानं पाण्याचे नवीन स्त्रोत शोधून काढावे लागतील आणि पाणीपुरवठा करावा लागेल असं मत व्यक्त केलं होतं.पण आजच घरात पाणी नाही तेव्हा हे स्त्रोत शोधणार कधी ?आणि पाणी पुरवठा करणार कधी? असा प्रश्न पत्रकारांना पडला होता.त्यातून टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी सूचना पत्रकारांनी केली होती.यावरून चंद्रकांत पाटील पत्रकारांवरच घसरले.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो.पत्रकारांवर अनेकदा ते सरकार धार्जिने आहेत असा आरोप केला जातो.सत्ताधारी पक्षातील क्रमांक दोनचा मंत्रीच हे मान्य करीत नसेल तर पत्रकार आपली भूमिका व्यवस्थित पार पाडत आहेत असा त्याचा अर्थ होतो.शिवाय चंद्रकात पाटील यांच्या वक्त्यवातून दुसराही एक अर्थ असा निघू शकतो की,राज्यातील विरोधी पक्ष आपल्या भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत.त्यामुळं विरोधी पक्षाची पोकळी पत्रकारांना भरून काढावी लागते.चंद्रकांत पाटील याचं वक्तव्य भलेही पत्रकारांच्या विरोधातलं असलं तरी ती पत्रकारांच्या चोख कामाची पोचपावती आहे असंच आम्हाला वाटत.