संपादकांनी चमचे चोरले असं म्हटलं तर कोणाचा विश्‍वास बसेल काय? नाही ना..पण हे सत्य आहे.एका नेत्याबरोबर परदेश दौर्‍यावर गेलेल्या पत्रकारांनी चक्क चमचे चोरले आणि त्यांना दंडही भरावा लागला.या चमचेचोरांमध्ये बहुतेक बडया दैनिकाचे संपादक आहेत किंवा वरिष्ठ पत्रकार..आता बोला..सातत्यानं पत्रकारांवर टिकेचे वार करणार्‍यांसाठी ही बातमी नक्कीच गुदगुल्या करणारी आहे..–

कोलकाता :

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत लंडन दौऱ्यावर गेलेल्या काही वरिष्ठ पत्रकारांनी एका हॉटेलमध्ये डिनरदरम्यान चांदीचे चमचे चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या पत्रकारांची चोरी पकडली गेली आणि या गुन्ह्यासाठी ५० पौंडांचा दंड या सर्वांना भरावा लागला.

ममता यांच्या दौऱ्यात जे पत्रकार गेले होते त्यातील बहुतेकजण संपादक आहेत. मात्र, चांदीचे चमचे पाहून या महाशयांना मोह आवरला नाही. बंगाली भाषेतून निघणाऱ्या एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराने सर्वात आधी चमचा चोरला. त्यानंतर बहुतेक सर्वांनीच या चमच्यांवर डल्ला मारला. त्यानंतर डिनर आटोपून ही मंडळी निघाली खरी पण सुरक्षारक्षकांच्या कचाट्यातून मात्र ते सुटू शकले नाहीत.

या पत्रकारांनी चमचे चोरल्याचे आधीच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले होते. त्यांनी झडती घेताच या मंडळींना चमचे परत करावे लागले. त्यातही एक पत्रकार तर बराच वेळ या सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालत होता. चमचा चोरताना कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असतानाही हा महाभाग मानायला तयार नव्हता. मात्र, त्यालाही नंतर दंड भरावा लागला.

याबाबत आउटलूकने वृत्त दिले असून या प्रकाराने पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला मात्र मोठा धक्का बसला आहे.

( महाराष्ट्र टाइम्सवरून साभार )

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here