उद्योगपती विजय मल्ल्या आणि काँग्रेस उपाध्याक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता पत्रकारांचे टि्वटर अकाउंट्स हॅक व्हायला सुरुवात झाली आहे. एनडीटीव्हीचे पत्रकार बरखा दत्त आणि रवीश कुमार यांचे टि्वटर अकाउंटही हॅक झाले आहेत. ‘लेजिन’ या हॅकर्स ग्रुपने हे केले आहे.
 
बरखा दत्त आणि रवीश कुमार यांचे ईमेल अकाउंट्स आधी हॅक करण्यात आले, नंतर त्यांचे @ravishndtv आणि @BDUTT हे टि्वटर हॅंडल हॅक झाले. या अकाउंट्सवर हॅकर्सनी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. दत्त यांच्या मेलमधील १.२ जीबी ची माहितीही हॅकर्सनी सार्वजनिक केली.
 
‘एनटीडीव्ही्च्या दोन वरिष्ठ पत्रकारांचे अकाउंट हॅक झाले आहेत. त्यांचे ईमेल वापरण्याचे प्रयत्न झाले आहेत. हॅकर्सविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही कोर्टासह सर्व संबंधित यंत्रणांकडे केली आहे,’ असे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
 
हॅकर्सनी रवीश कुमार यांच्या अकाउंटवरून अशी पोस्ट केली आहे – ‘आम्ही टि्वटर लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून वापरतो. आम्ही केवळ अकाउंट हॅक करत नाही, त्यात जाऊन माहिती घेतो. जर आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास १ टीबीहून जास्त गोपनीय माहिती लिक होईल. – लेजिन’
 
आम्ही @BJP4India किंवा @PMOIndia साठी काम करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावर रवीश कुमार यांनी अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे की, ‘आमच्यासारख्या पत्रकारांच्या गोपनीयतेवर घाला म्हणजेच सामान्य माणसांवरचाच घाला आहे. जर आमची प्रायव्हसी हा तुमच्या चिंतेचा विषय नसेल, तर, हे लक्षात ठेवा की उद्या ही वेळ तुमच्यावरही येईल.’ रवीश कुमार यांनी वर्षभरापूर्वी त्यांना टि्वटरवर धमक्या येऊ लागल्याने टि्वटर वापरणे थांबवले होते. रवीश कुमार यांच्या अकाउंटवर हॅकर्सनी पुढचे हॅक झालेले अकाउंट ललित मोदी यांचे असेल असा इशाराही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here