पत्रकारांची युवा पिढी अधिक सक्षम

0
827
नागपूर – पत्रकारितेतील युवा पिढी कार्यप्रवण आणि अधिक सक्षम आहे. आपली विश्‍वासार्हता गहाण न ठेवणारी आहे. त्यामुळे देश आणि समाजाचे हित साधले जाईल असेच लिखाण त्यांच्या हातून घडेल, असा विश्‍वास ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद यांनी आज येथे व्यक्‍त केला.
शंकरनगरातील साई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार व भाजपचे नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, खासदार विजय दर्डा, माजी आमदार एस. क्‍यू. झमा, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, प्रसिध्द उद्योजक प्रफुल्ल गाडगे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, जोसेफ राव, पौर्णिमा पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस. एन. विनोद यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. ते म्हणाले की, पत्रकाराने प्रलोभनापासून दूर राहण्याची आवश्‍यकता आहे. तसेच कोणत्याही माहितीची पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय त्याची बातमी करु नये. “ब्रेकिंग न्यूज‘च्या मागे न लागता विश्‍वासर्ह माहितीला प्राधान्य हवे. संपादक आणि पत्रकार यांचा परस्परांवरील विश्‍वास कमी झाला असल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले की, पत्रकारांनी निर्भिड आणि नि:पक्षपणे लेखणी चालवावी कारण विश्‍वासार्हता हीच वर्तमानपत्राची सर्वात मोठी शिदोरी आहे. 
 
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, देशाला स्वातंत्र मिळून 68 वर्षे झाली. मात्र अजूनही कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविता आलेले नाही. देशाची प्रगती होत असली तरीही अजून बऱ्याच क्षेत्रांचा विकास शिल्लक आहे. हा विकास साधताना स्थानिक विशेषता जपण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एस. एन. विनोद हे पत्रकारितेतील “रोल मॉडेल‘ असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि माजी खासदार दत्ता मेघे कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी मानले. 
 
भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ 
पक्ष नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्ये केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या नागपूर भेटीवर भाजपच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी विदेशात गेल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपचा एकही स्थानिक पदाधिकारी वा नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.(सकाळवरून साभार) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here