मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे तर सागरी महामार्गाला सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांचे नाव द्यावे
एस.एम.देशमुख यांची मागणी

मुंबई :मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे तर रेवस – रेडी सागरी महामार्गाला सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.. या निवेदनाची प्रत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना ही पाठविण्यात आली आहे..
एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पत्रकारांनी सतत सहा वर्षे सनदशीर मार्गानी आंदोलनं केल्यानंतर 2012 मध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झालं. आजूनही रस्त्याचं काम 50 टक्के देखील झालेलं नाही.. काम त्वरित पूर्ण व्हावं यासाठी देखील कोकणातील पत्रकारांचा सतत पाठपुरावा सुरू आहे.. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर तो कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरणार असून अपघातांचे प्रमाण देखील कमी होणार आहे.. त्यामुळं हा महामार्ग त्वरित पूर्ण व्हावा यासाठी पत्रकार आग्रही आहेत.. केवळ पत्रकारांच्या लढयामुळेच महामार्गाचं चौपदरीकरण होत असल्यानं या महामार्गाला कोकणचे बाळशास्त्री जांभेकर महामार्ग असे नाव देणे उचित ठरणार आहे.. बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातले असून त्यांनीच मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली असल्याने महामार्गाला त्यांचे नाव देणे अधिक संयुक्तिक ठरेल असे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..
सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांचा सतत सागराशी संबंध आलेला आहे.. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर त्यांची हुकूमत होती.. स्वराज्यासाठीचे त्यांचे योगदान वादातीत असल्याने पूर्ण होत आलेल्या रेवस ते रेडी या सागरी महामार्गास सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांचं नाव देणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे.. असे मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे..
कोकणच्या दोन्ही सुपूत्रांची नावे कोणतेही वाद न होता आणि कटुता निर्माण न होता सन्मानपूर्वक दिली जावीत अशी विनंतीही एस.एम.देशमुख यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक (सिंधुदुर्ग) सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हेमंत वणजू, परिषदेच्या राज्य महिला संघटक जान्हवी पाटील (रत्नागिरी) परिषदेचे कोकण विभागीय सचिव विजय मोकल, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे, ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी (पालघर) यांनीही स्वतंत्र निवेदनाव्दारे उपरोक्त मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असे जाहीर केले आहे..
यासंदर्भात लवकरच पत्रकारांचे एक शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे यांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here