पंधरा वर्षानंतर तीन किलो मिटर…

0
1179

तीन किलो मिटरच्या रस्त्यासाठी पंधरा वर्षे प्रतिक्षा

मराठवाड्यातलं देवडी हे माझं जन्मगाव.उपेक्षित,दुर्लक्षित.वीस वर्षापूर्वी गावाला जायला एक रस्ता झाला होता.तो उखडला गेला.तो दुरूस्त करावा यासाठी मी गेली पंधरा वर्षे झटत होतो.सर्वांचे उंबरे झिजवून झाले होते.मागच्या सरकारात जयंदत्तअण्णा क्षीरसागर यांच्याकडंही पाठपुरावा केला होता.त्यांनी एका स्कीममध्ये हा रस्ता घेतल्याचं मला सांगितलं होतं.प्रत्यक्षात ते काम सुरूच झालं नाही.प्रकाश सोळंके हे पंधरा वर्षे आमच्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत होते.त्यांच्याकडंही अनेकदा शब्द टाकला पण गाडी पुढं सरकत नव्हती.पंधरा वर्षे हेच सुरू होतं.नोव्हेंबरमध्ये माझा वडवणी या माझ्या तालुक्याच्या गावी सत्कार होता.या कार्यक्रमास आजी -माजी आमदार अनुक्रमे आर.टी.देशमुख आणि प्रकाश सोळंके उपस्थित होते.मी सत्काराला उत्तर देताना गावाकडच्या रस्त्याचा विषय काढला आणि 26 जानेवारीच्या आत जर रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर 27 जानेवारीपासून उपोषणाला बसण्याचा निर्धारही बोलून दाखविला .तसं पत्रंही जिल्हाधिकार्‍यांना पाठविलं होतं.त्यानंतर सुत्रं हालली आणि गावाकडच्या रस्त्याचं टेंडर निघालं.त्यानंतरही माझा आणि गावकर्‍यांचा विश्‍वास बसत नव्हता.अखेर परवा रस्ताचं काम सुरू झाल्याचे फोन आणि फोटो आले आणि सुटकेचा निःश्‍वास सोडला.जेमतेम तीन किलो मिटरचा हा रस्ता व्हायला पंधरा वर्षे लागली.मराठवाड्याच्या मागासलेपणाचं कारण राजकारण्याच्या या निष्काळजीपणात आहे.मी कोकणात असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकऱणासाठी सतत चार वर्षे संघर्ष केला.ते काम आता सुरू झालं आहे.475 किलो मिटरचा हा रस्ता किमान चार वर्षात तरी मार्गी लागलाय पण माझ्या गावचा तीन किलो मिटरचा रस्ता व्हायला पंधरा वर्षे मला पाठपुरावा करावा लागला.हा पाठपुरावा करताना गावातील माझे बांधव आणि वडवणीचे पत्रकार अनिल वाघमारे तसेच वडवणी तालुका पत्रकार संघाच्या अन्य सदस्यांचे मला मोलाचे सहकार्य मिळाले.मी जेव्हा उपोषणाची नोटीस दिली तेव्हा वडवणी शहरातील सर्व पत्रकारांनी आम्हीही तुमच्या बरोबर उपोषणास बसणार असल्याचं सांगून विषयाचं गांर्भीर्य लोकप्रतिनिधी आणि व्यवस्थेच्या ध्यानात आणून दिलं.अनिल वाघमारे तसेच वडवणीच्या सर्व पत्रकार मित्रांना मनापासून धन्यवाद. त्यानंत आमदार आर.टी.देशमुख यांनीही पाठपुरावा करून हा रस्ता मार्गी लावला आहे.त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.आता मी घरी जाईल तेव्हा व्हह्रटमिक्सच्या रस्त्यावरून जाईल.हे स्वप्न  गेली पंधरा वर्षे पाहात होतो.हा रस्ता को होत नव्हता याचं कोडं वाचकांना पडू शकतं.तो राजकारणात अडकला होता.आमचं गाव नेहमीच सत्ताधार्‍यांच्या विरोधात राहिलेलं आहे.पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधात एक सुप्त संताप होता.त्यामुळं तीनही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी सातत्यानं घसरत गेली.जेवढी मतं घसरत गेली तेवढ्या वेगाने राष्ट्रवादीच्या नेत्याचा गावावरील रागही वाढत गेला.त्यामुळं हा रस्ता होताच कामा नये असा प्रयत्न सुरू झाला.जेव्हा मी जयदत्त क्षीरसागर यांना भेटलो तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या आमच्या भागातील एका नेत्यानं तो रस्ता करू नका कारण तिथं आपल्याला मतं मिळत नाहीत असं माझ्यासमोर सांगितलं.त्यावर मग मी देखील चिडलो.असं असेल तर आम्हाला रस्ता नको पण मग मतं मागायलाही गावात येऊ नका असं बजावलं.अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीला आपटी बसली.भाजपचे आर.टी.देशमुख विजयी झाले.ते विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या गावाकडच्या घरी आले तेव्हा त्यांना मी ही आठवण करून दिली आणि तुम्ही तरी हा रस्ता मार्गी लावा अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधातही लढा उभारावा लागेल असं सांगितलं.त्यानंतर त्यानी प्रयत्न केले.आता दीड वर्षानंतर का होईना रस्ता होताना दिसतो आहे.

मराठवाड्यातल्या गावाची ही स्थिती आहे.दुष्काळ,पाणी टंचाई,आत्महत्या या विषयांची चर्चा स्वाभाविक आहे.मात्र दळणवळणासाठी आवश्यक असलेले रस्तेही तेवढेच महत्वाचे असतात.ते मराठवाडयात नाहीत.पंधरा वर्षे रस्ताच नससल्यानं पाच हजार लोकवस्तीच्या गावात एस.टी.देखील येत नाही.एस.टी.महामंडळाची चूक नाही.गाव तिथं एस.टी.हे त्याचं ब्रिद आहे.याचा अर्थ जिथं रस्ता नाही तिथं एस.टी नाही.एस.टी.चं महत्व आणि ती येत नसल्यानं होत असलेले हाल हा सांगून समजण्यासारखे नाहीत ते अनुभवलेच पाहिजेत.माझ्या गावचे ग्रामस्थ गेली पंधरा वर्षे हे अनुभव घेत आहेत.त्यासाठी अनेक पातळ्यावर प्रयत्न करूनही काही होत नाही हे आणखी एक दुर्दॅव्य आहे.–

 .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here