राज्यातील पोलीस यंत्रणा आणि नोकरशाही कधी नव्हे एवढी उन्मत्त झाली आहे.नोकरशाहीशी पत्रकारांचा रोज संबंध असतो.मात्र येणारे अनुभव विदारक असतात.तालुका ,जिल्हा पातळीवर या नोकरशाहीचा जो अनुभव पत्रकारांना येतो तसाच अनुभव मंत्रालयातही येतो.मंत्रालयात तर अशा अरेरावांची मोठी गर्दी आहे.त्यामुळं अनेक पत्रकारांनी मंत्रालयातच जाणं सोडलं आहे.सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याच्या कार्यक्रमाचा तर हा भाग नसावा अशी शंका नेहमी येते.एका पत्रकाराला पोलिसांचा आलेला अनुभव त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळविला आहे.तो वाचण्यासारखा असल्याने मुद्दाम येथे देत आहोत.
एका पत्रकाराचा असाही अनुभव
देवेंद्रजी!, आपले पोलीस ‘थोडे’ (तरी) सौजन्यशील होतील का?….
आदरणीय मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी,
सविनय-सस्नेह नमस्कार.
देवेंद्रजी!, आधीच अनेक राजकीय ताण-तणाव, रूसवे-फुगवे अन अनेक व्यापांमुळं आपण नेहमीच हैराण झालेले असताच. साहेब, राज्यातील ‘चौथा स्तंभ’ असणारी माध्यमं अन पत्रकारही सध्या अगदी अशीच तुमच्यासारखीच ‘हैराण’ आहेत. पण, तुमच्या अन आमच्या ‘हैराणी’तला फरक तुलनात्मक वेगळा तर आहेच, पण तो आमच्या स्वाभिमानाशीही जूळलेला आहेय. आम्ही हैराण आहोत तुमच्या नोकरशाहीकडून आम्हाला मिळणार्या अतिशय हिन अन असौजन्यशील वागणुकीमूळं. तुमच्या अनेक भाषणांत नेहमीच ‘चौथ्या स्तंभा’च्या आवश्यकतेविषयी, तिच्या गौरवशाली परंपरेविषयी अभ्यासपूर्ण विवेचन असतं. तुमच्या भाषणातील या सुहृदयतेमुळं अनेकदा मनंही भरून येतंय. पण, हे फक्त ‘बोलाचीच कडी’ आहे काय?, असा संभ्रम अलिकडे होतो आहेय. कारण, अनेक ठिकाणी तुमच्या नोकरशाहीकडून पत्रकारांचा वारंवार होणारा अपमान…. आमचा स्वाभिमान, आमची मुल्य अन सामाजिक बांधिलकीला नख लावत आमचा अपमान करण्याचं सध्या ‘होलसेल काँन्ट्रेक्ट’ घेतलंय ते तुमच्या ताब्यात असणाऱ्या पोलीस दलातील काही अधिकारी-कर्मचार्यांनी…. मी अगदी नोकरशाहीतल्या सर्वांबद्दल हे सरसकट निश्चितच लिहित नाही. प्रशासनाचा गाडा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी अनेक कर्मचारी-अधिकारी दिवसरात्र झटत असतात. त्यांना या देशाचा-राज्याचा सर्वसामान्य नागरिक अन पत्रकार म्हणून माझा सदैव सलामच आहेय. मात्र, माध्यमं म्हणून काम करतांना अलिकडच्या काळात पोलीस दलाचा येत असलेला अनुभव आम्हाला नाऊमेद करणारा तर आहेच. यासोबतच तो आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारा आहेय. तुमच्या काही अधिकाऱ्यांची बेबंदशाही, झुंडशाही अन बेमुवर्तखोरपणा किती वाढला हे सांगणारं माझ्यासोबत घडलेलं प्रकरण मी तुम्हाला सांगतोय.
अकोला येथील जिल्हा शासकीय क्रीडा संकुलात मुकेश तुंडलायत नामक जिम्नॅस्टिक प्रशिक्षकानच आपल्याकडे शिकणाऱ्या काही विद्यार्थांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे हा प्रकार पिडीत विद्यार्थ्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कानावर टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. रामदासपेठ पोलिसांनी या नराधमावर १३ डिसेंबरलाच गुन्हा दाखल केलाय अन अटकही केलीय. मात्र, पॉस्को कायद्यातील काही तरतुदींचा बाऊ करीत पोलिसांनी तब्बल सहा दिवस या प्रकरणाची माहिती माध्यमांना दिलीच नाही, अगदी आरोपीचं नावही. मात्र, खरी गोम वेगळीच होतीय. अधिवेशन सुरू असतांना हे प्रकरण गाजलं तर सरकार अन गेल्या चार वर्षांपासून हा गोरखधंदा करणाऱ्या तुंडलायतला पाठिशी घालणारे काही अधिकारी यात अडचणीत येणार होतेय. त्यांनाच वाचवण्याच्या प्रयत्नात रामदासपेठ पोलीसांत असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांच्या ‘दासां’नी माध्यमांची दिशाभूल करीत असं काहीच झालं नसल्याची मखलाशी केलीय. यामध्ये येथील ठाणेदार अन (कु)’ख्यातनाम’ पोलीस अधिकारी प्रकाश सावकार आघाडीवर होते. राजा हरिश्चंद्रानं कलियुगात यांच्याच रूपात जन्म घेतल्याचा आव आणणारे सावकारसाहेब नेहमीच पत्रकार, अकोलेरांचा अगदी ‘कमरेखाल’च्या शब्दांनी उद्धार करतात. त्यांच्या भन्नाट, जगावेगळ्या ‘कारनाम्यां’नी अनेकदा अकोल्यातील अनेक वृत्तपत्रांची पानंच्या पानं भरलीत. मात्र, कारवाईऐवजी प्रत्येकदा त्यांच्या पदरात पडली ती ‘मलाईदार’ ठिकाणांची बक्षिसी… १९ तारखेला मी त्यांना माहितीसाठी फोन केला. पण त्यांच्या संवादाची सुरूवातच झाली ती त्यांच्या अरेरावीनं…”तुला माहिती द्यायला मी बांधील नाही. तुम्ही अकोल्यातले पत्रकार गोड-गोड बोलता अन —-मारता. मला माहित आहे”… आणखी पुढे बरंच काही… मी अतिशय विनम्रतेनं त्यांना शब्द चांगले वापरण्याची विनंती केली. तरीही ते अखेरपर्यंत आपल्याच मग्रूरी अन तोऱ्यातच होते. मी लगेच हा प्रकार जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना साहेबांच्या कानावर घातला. त्यांनी माझं म्हणनं ऐकून घेत त्यांना समज देतो, असं सांगितलं.
१९ तारखेच्या या घटनेनंतर २२ डिसेंबरला अकोला येथील विश्रामग्रूहावर आमचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची पत्रकार परिषद होतीय. पत्रकार परिषदेनंतर डॉ. रणजित पाटील लगेच तेथेच अँटी चेंबरमध्ये मिटींग घ्यायला बसलेत. माझी सहजच तेथे उपस्थित पोलीस अधिक्षक मिना साहेबांशी भेट झाली. सहजच त्या दिवशी सावकारांच्या अरेरावीच्या भाषेचा अन प्रकरणाची माहिती दडविण्याचा मी परत उल्लेख अधिक्षकांकडे करतो न करतो तेच पोलीस निरिक्षक प्रकाश सावकार थेट माझ्या अंगावरच धावून आलेत. अन तेही थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांसमोरच… तर येथेच अगदी दहा फूटावर असणार्या अँटी चेंबरमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्रीही बसलेले होते. सावकारांना शांत राहण्याचं फर्मान पोलिस अधिक्षकांनी दिल्यानंतरही ते परत दुसऱ्यांदाही माझ्या अंगावर धावूम आलेय, अन त्यांच्याबद्दल न बोलण्याची धमकीही दिलीय. याठिकाणी अकोल्यातील जवळपास सर्वच पत्रकार होतेय. त्यांनी सावकारांना आवरत थेट अधिक्षकांनाच सावकारांच्या ‘दादा’गिरी बद्दल जाब विचारला. आमची पत्रकारमंडळी नसती तर माहिती का विचारतो?, असं म्हणत सावकारांनी मला निश्चितच मारलं असतंय. सावकारांसारख्या कर्तव्यशून्य, वादग्रस्त अन ‘खल रक्षणाय:’ अशी स्वत:च्या सोईची पोलीसींगची नवी व्याख्या करू पाहणाऱ्या अधिकाऱ्याला एव्हढ्या ‘माज’ अन ‘मस्ती’ची हिंमत यावी तरी का?. ‘शिस्त’ हा प्राण असणाऱ्या आमच्या पोलीस दलातला एक अधिकारी आपल्या जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकाऱ्यांसमोर इतका ‘मग्रूर’ वागतो तरी कसा?. पोलिस दलातील अशा ‘सावकारी’ प्रव्रूत्तींची हिंमत खरेच वाढत आहे काय?. राज्याचे गृहराज्यमंत्री खुद्द बाजूला बसलेले असल्याची भितीही त्यांना वाटू नये, हे सर्व प्रश्न कालपासून मला प्रचंड अस्वस्थ करीत आहेत. त्यामूळेच हा पत्रप्रपंच…..
आदरणीय देवेंद्रजी!, आमच्यातील काही पत्रकारितेतील परंपरा पायदळी तुडवत असतील, हरामखोऱ्या करीत असतील, त्यांना शिक्षा करा अन प्रसंगी अगदी जोड्यानं-बुटानं’ही मारा… ही माझी कुणाबद्गलची वैयक्तिक तक्रार नक्कीच नाही. पण, राज्यात माझ्यासारखं काम करणाऱ्या पत्रकारितेतील अनेक उमेश अलोणेंना दररोजच तुमच्या कुठल्या-ना-कुठल्या नोकरशाहीकडून हा अपमान, मानखंडना सहन करावी लागतेय. अनेकदा यातून नाउमेद झाल्यासारखंही वाटतंय. तुम्ही मुख्यमंत्री-गृहमंत्री झालात, माध्यमांना आमचा ‘देवेंद्रभाऊ’, ‘देवेन’ तिथे त्या पदावर गेल्याचा आनंद झाला. कारण, तुमचा राजकीय उत्कर्षाचे साक्षीदार अलिकडच्या पिढीतले बहूधा सर्वचजण असतील. देवेंद्रभाऊ, तुम्ही अलिकडच्या प्रचाराच्या दगदगीनं, सुरूवातीपासून सुरू असलेल्या ओढाताणीनं खुप दमला असाल याची कल्पनाही आहेच. परंतू, या राज्याचे अन ग्रूहखात्याचे पालक अन ‘आपला माणूस’ म्हणून ही खदखद, अस्वस्थता स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच मन मोकळं केलंय. देवेंद्रजी!, आपली नेकरशाही अन आपले पोलीस अगदी ‘थोडे’ तरी सौजन्यशील होतील, अशी माफक अपेक्षा अन आशा आपल्याकडून आहे. कधी यातील ‘सौजन्याचं वावडं’ असणार्यांसाठी ‘सौजन्यशील बनूयात, महा’राष्ट्र’ घडवूया’, याची शिकवण देणारा ‘वर्ग’ अन ‘बौद्धिक’ नक्की घ्याच… अन हो, शेवटी जीता-जाता एकच विनंती की, आमच्या प्रलंबित असलेल्या ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चंही तेवढं बघा ना साहेब…. येथेच थांबतो!…
धन्यवाद!… जय महाराष्ट्र!!!….
आपलाच पत्रकारबंधू,
उमेश अलोणे,
जिल्हा प्रतिनिधी,
ए.बी.पी. माझा,
अकोला.
मोबाईल क्रमांक : 9922650067